उन्हाळी भुईमूग पिकावरील महत्त्वाच्या रस शोषणाऱ्या किडींचे व्यवस्थापन कसे करावे, वाचा सविस्तर

0

शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग पिकावर प्रामुख्याने खालील रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येऊ शकतो त्या अनुषंगाने या किडीची ओळख व व्यवस्थापन योजना या विषयी थोडे जाणून घेऊया.

(1) मावा : भुईमूग पिकावरील मावा आकाराने अंडाकृती आणि लहान तर रंगाने काळपट लालसर तपकिरी किंवा पिवळसर रंगाचा असतो. भुईमूग पिकावरील मावा या किडीची प्रौढ व पिल्ले अवस्था पानातून रस शोषण करते व साखरेसारखा गोड चिकट स्त्राव शरीरातून बाहेर टाकते व त्यामुळे पानावर काळी बुरशी वाढते व पाने चिकट होतात व त्यामुळे उन्हाळी भुईमुग पिकात प्रकाश संश्लेषण क्रियेत बाधा पडून झाडाची वाढ खुंटते व मावा किडीच्या तीव्र प्रादुर्भाव झाल्यास झाडाची पाने पिवळी पडून कालांतराने संपूर्ण झाड वाळून जाऊ शकते. शेतकरी बंधूंनो भुईमूग पिकावरील मावा ही कीड भुईमूग पिकावरील स्ट्राइप विषाणू, रोजेट विषाणू तसेच पर्णगुच्छ या रोगाचा वाहक म्हणून सुद्धा कार्य करते. भुईमुगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत साधारणता पाच ते दहा मावा प्रति शेंडा ही शास्त्रज्ञांनी या किडी करता नोंद केलेली आर्थिक नुकसानीची पातळी आहे.

(2) फुलकिडे : शेतकरी बंधूंनो भुईमूग पिकावरील फुलकिडे आकाराने लहान असून त्यांचा मागील भाग निमुळता असतो. फुलकिडे भुईमूग पिकात साधारणता कोवळ्या शेंड्यावर किंवा पानावर आढळतात. लहान तसेच पूर्ण वाढ झालेले फुलकिडे पानांचा पृष्ठभाग ओरबडतात आणि त्यातून निघालेला अन्नरस शोषण करतात त्यामुळे पानावर वरच्या बाजूस पांढरे पिवळसर फिक्कट चट्टे पडतात आणि पानाचा कालचा भाग तपकिरी रंगाचा होऊन चकाकतो. भुईमूग पिकावरील फुलकिडे ही किड शेंडे मर किंवा बड नेक्रोसिस या रोगाचा वाहक म्हणून सुद्धा कार्य करते. भुईमुगाच्या घडी केलेल्या पानात पाच फुलकिडे प्रती शेंडा ही शास्त्रज्ञांनी भुईमूग पिकावरील फुल किडीच्या आर्थिक नुकसानीच्या पातळीची नोंद केली आहे.

(3) तुडतुडे : उन्हाळी भुईमूग पिकावरील तुडतुडे हिरव्या रंगाचे, पाचरीच्या आकाराचे असून पानाच्या खालील बाजूने आढळून येतात. तुडतुडे पानातील रस शोषण करतात त्यामुळे पाने पिवळी पडतात तसेच पानाच्या शेंड्यावर व्ही आकाराचे चट्टे दिसून येतात. साधारणता उन्हाळी हंगामात फेब्रुवारी मार्च महिन्यात या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. या किडी करिता शास्त्रज्ञांनी साधारणता सुरुवातीच्या अवस्थेत तीस दिवसापर्यंत पाच ते दहा तुडतुडे प्रति झाड व त्यानंतर पंधरा ते वीस तुडतुडे प्रति झाड या आर्थिक नुकसानीच्या पातळीची नोंद केली आहे.

शेतकरी बंधूंनो वर निर्देशित भुईमूग पिकावरील महत्त्वाच्या रस शोषणाऱ्या किडी संदर्भात आपले शेतात प्रादुर्भाव आढळल्यास योग्य निदान करून प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन उन्हाळी भुईमूग पिकावरील रस शोषणाऱ्या किडी करता खालील एकात्मिक किड व्यवस्थापन योजनेचा गरजेनुसार अंगीकार करावा.

(1) शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग पिकाच्या चारही बाजूंनी चवळी सोयाबीन एरंडी यासारख्या सापळा पिकाची लागवड केल्यास मावा व तुडतुडे यासारख्या किडीचा प्रादुर्भाव उन्हाळी भुईमूग या मुख्य पिकावर कमी आढळून येतो तसेच उन्हाळी भुईमूग पिकांमध्ये प्रत्येक दहा ओळी नंतर एक ओळ चवळी या सापळा पिकांची लागवड केल्यास रस शोषण करणाऱ्या किडी वर जगणार्‍या मित्र कीटकांचे संवर्धन होण्यास मदत होते. मका या पिकाचे आंतरपीक उन्हाळी भुईमूग पिकात घेतल्यास फुल किड किडीच्या व्यवस्थापनाकरिता फायदा होतो.

(2) शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग पिकात रस शोषण करणाऱ्या किडी च्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता एकरी पंधरा ते वीस पिवळे निळे चिकट सापळे शेतात लावावेत.

(3) शेतकरी बंधूंनो रस शोषणाऱ्या किडी च्या प्रतिबंध करता भुईमुगाचे शेत पेरणीनंतर कमीत कमी 40 दिवस पर्यंत तणविरहित ठेवावे. उन्हाळी भुईमूग पिकाच्या बांधावर बावची किंवा इतर पर्याय खाद्य आढळल्यास ती उपटून नष्ट करावीत.

(4) शेतकरी बंधूंनो सर्वसाधारणपणे उन्हाळी भुईमूग पिकात किडीचा प्राथमिक स्वरूपाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी.

(5) शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग पिकावर तुडतुडे व फुलकिडे यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन योग्य निदान करून गरजेनुसार खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार फवारणी करावी. क्विनॉलफॉस 25% प्रवाही 14 ते 28 मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा Lambda Cylohathrine 5% EC 5 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची योग्य निदान करून गरजेनुसार फवारणी करावी.

(6) शेतकरी बंधूंनो आपले उन्हाळी भुईमूग पिकावर मावा किंवा तुडतुडे यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन योग्य निदान करून गरजेनुसार
इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के एस. एल. 2.5 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गरजेनुसार फवारणी करावी.

टीप :

(1) कोणत्याही रसायनाची फवारणी करण्यापूर्वी लेबल क्‍लेम शिफारशीची शहानिशा करून लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणे रसायनाचा फवारणी करता योग्य निदान करून आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन रसायनाचा वापर करावा.
(2) रसायनी फवारताना करताना अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करणे टाळावे तसेच फवारणी करताना सुरक्षित कीडनाशक तंत्राचा वापर करावा.
(३) वर निर्देशीत बाबी चा वापर करण्यापूर्वी आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष तज्ज्ञांशी सल्लामसलत करावी

राजेश डवरे,                                                                                                                                कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

महत्वाच्या बातम्या : –

जिरे पिकावर झुलसा आजाराची कारणे, त्याला कसे ओळखायचे आणि त्याचे उपाय जाणून घ्या

गहू विक्रीसाठी वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक, खरेदी 1 एप्रिल ते 15 जून दरम्यान केली जाईल

खरबूजचे बियाणे खाण्याचे फायदे काय आहेत तुम्हाला माहिती आहे का ?

थायरॉईडसाठी आयुर्वेदिक उपाय जे रोगास मुळापासून दूर करते

राज्यात अनेक ठिकाणी ‘या’ तीन दिवस पावसाची शक्यता

Leave a comment