लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये पिवळ्या पर्णछत्राची समस्या आणि उपाययोजना

0

लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये पावसाळा सरला आणि थंडी पडली की बऱ्याच बगीच्यांमध्ये झाडे पिवळी पडायला सुरुवात होते. विदर्भ, मराठवाडा व मध्यप्रदेश-राजस्थानातील संत्रा-मोसंबी फळपिकाखालिल जमीनी या काळ्या, चिकण मातीच्या, बऱ्याच ठिकाणी ५-६ फूट किंवा त्याहूनही जास्त खोली असलेल्या आहेत. या जमीनीमध्ये पाण्याचा निचरा लवकर होत नाही. परीणामी संत्रा-मोसंबी झाडांच्या मुळांभोवती सतत ओल राहाते.

लिंबूवर्गीय फळ झाडांच्या मूळांच्या प्राणवायूची गरज ही ईतर झाडांपेक्षा जास्त असते. प्रदीर्घ काळ जर ओलावा मातीच्या धारण क्षमतेपेक्षा जास्त राहिला तर मुळांना हवा न मिळाल्यामुळे त्यांची श्वसन क्रिया प्राणवायू न मिळाल्यामुळे मंदावते किंवा पूर्णतः बंद पडते. अशा मुळांची कूज होऊन ती अकार्यक्षम होतात व यामध्ये फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव होतो.

अशा झाडांवरील पाने डिसेंबर-जानेवारी महिन्यात निस्तेज होऊन पिवळी पडायला लागतात. जुन्या पानांची झपाट्याने पानगळ होते. काही झाडांच्या खोडावर डिंक पाझरताना दिसतो. काही नवीन लागवड केलेल्या २-३ वर्षे वयाच्या झाडांची बूडकूज होऊन खोडावरची गोलाकार किंवा अंशतः गोलाकार कूज होऊन साल कुजून जाते परीणामी खोडावरील फ्लोएम पेशी नष्ट होते व झाडाच्या मुळांना पानांमध्ये तयार झालेली शर्करायुक्त पोषणद्रव्ये मिळत नाहीत त्यामुळे ती मातीतील पाणी व इतर मूलद्रव्ये पर्ण छत्राला पुरवण्यास असमर्थ होतात. अशा झाडांचे पर्णछत्र झपाट्याने कमी होते व त्यांची उत्पादकता कमी होत जाते.

उपाययोजना:

१. प्रतिबंधात्मक :

१.१. मे-जून महिन्यात बगीच्याभोवती उताराच्या दिशेने ४-५ फूट खोल व ३-४ फूट रुंदीचे चर खोदावेत. बगीच्यामध्ये सखल भागात दोन ओळींमध्ये १-१.५ फूट खोल व तितक्याच रुंदीच्या नाल्या उताराच्या विरुध्द दिशेने खोदणे.

१.२. नवीन बगीच्याची लागवड ऊंच गादीवाफ्यावर करावी. यामुळे पाण्याचा निचरा चांगला होईल.

२. उपचारात्मकः

२.१: मशागत व बुरशीनाशक संस्कारः पिवळ्या पडत असलेल्या झाडांच्या आळ्यातील माती ६ इंचापर्यंत उकरुन घ्यावी. वाळलेल्या फांद्यांची छाटणी करावी व झाडावर ३ ग्रॅम कॉपरऑक्सिक्लोराईड प्रतीलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. झाडांना प्रत्येकी ५०० ग्रॅम १८:१८:१० मिश्रखत द्यावे. जर झाडाच्या खोडावर डिंक पाझरताना दिसत असेल तर मेफानॉक्झाम ४% + मँकोझेब ६४% २.७५ ग्रॅम + कार्बेंडाझिम १ ग्रॅम प्रतीलिटर पाण्यात मिसळून प्रत्येक झाडाला ४-५ लिटर आळ्यात टाकावे.

२.२. बूडकूज भेट कलम (इनार्च ग्राफ्टिंग): बगीच्याच्या सखल भागात पाणी तुंबून राहिल्यामुळे काही झाडांच्या खोडांचा जमिनीलगतचा भाग कुजून जातो व अशी झाडे पिवळी पडून कालांतराने मरुन जातात. अशी झाडे कुठल्याच उपचाराला प्रतीसाद देत नाहीत. अशा परिस्थितीत झाडांना वाचवण्याचा एकमेव उपाय म्हणजे बूडकूज दुरुस्ती भेट कलम (इनार्च ग्राफ्टिंग). बूडकूज किंवा मूळकूज झालेल्या झाडांची मूळप्रणाली नष्ट झाल्यामुळे अशा झाडांना अंशतः किंवा जवळपास पूर्णतः पाणी व मूलद्रव्य मातीतून घेता येत नाही.

या झाडांना तातडीने नवीन मूळप्रणाली मिळावी म्हणून मूळकूज भेट कलम केले जाते. अशा झाडांच्या खोडाभोवती ३-४ इंच दूर (खोडाचा २-३ इंच व्यास असणाऱ्या झाडांना २-३ व त्यापेक्षा मो्ठ्या झाडांना ३-४) जंबेरी किंवा रंगपूर लिंबाची एक वर्ष वयाची रोपे लावावीत.

साधारणतः ८-१० दिवसांनी ही रोपे जोम धरल्यानंतर संत्रा किंवा मोसंबी झाडाच्या खोडावरील सुदृढ साल असलेल्या जागेवर या रोपांच्या त्या ऊंचीवरील भागावर तिरका काप देऊन छाटणी करावी जेणेकरुन तिरका कापलेला भाग झाडाच्या खोडावर बसवता येईल. धारदार चाकूने झाडाच्या खोडावर त्या ऊंचीवर साधारण एक इंच उभी चीर द्यावी व चाकूच्या बोथट बाजूने चीर दिलेली साल ढिली करून रोपाचे तिरका काप दिलेले टोक त्या सालीमध्ये घट्ट घुसवावे. त्यावर साल घट्ट दाबून त्याभोवती पातळ १०० मायक्रॉन जाडीची साधारण १.५ सेंटिमीटर रुंदीची प्लास्टिक पट्टी गुंडाळावी. रोपावरील सर्व पाने व फुटवे काढून टाकावेत.

२१ दिवसानंतर या पट्ट्या काढून घ्याव्यात. जर खुंटाचे रोप झाडाच्या खोडापासून अलग नाही झाले तर कलम यशस्वी झालेले असते. बऱ्याच वेळा हे कलम यशस्वी होत नाही म्हणूनच एका झाडावर २-४ रोपांचे कलम बांधले तर किमान १-२ यशस्वी कलमे झाली तरी झाडाचे पुनरुज्जीवन होते. खुंटावर पाने/फुटवे वाढू देऊ नयेत. अशा झाडांवर या कलम केलेल्या रोपाच्या खोडाचा व्यास झपाट्याने वाढतो व तो १-१.५ वर्षातच झाडाच्या मोठ्या फांद्यां इतका ४-५ इंचाचा होतो. अशी पुनरुज्जीवित झाडे पुढे १५-२० वर्षे चांगले उत्पादन देतात.

महत्वाच्या बातम्या : –

रासायनिक खतांच्या अती वापराणे होणारे दुष्परिणाम

मूळव्याध्यावर गुणकारी असे कवठाचे फळ

द्राक्ष खाण्याचे फायदे आणि नुकसान

बेलाचे सरबत पिण्याचे काही फायदे व नुकसान

लिंबाचे लोणचे खाण्याचे 4 मोठे फायदे

Leave a comment