द्राक्षातील खरड छाटणी नंतर सुप्त घड निर्मिती व सुप्त घड पोषणाची पंचसूत्री

0

द्राक्षातील खरड छाटणीस गोडीबहर छाटणीचा पाया म्हणतात हे आपणास ठाऊक आहेच कारण खरड छाटणी मधील कामकाजावर गोडीबहर छाटणी मध्ये येणारे उत्पादन अवलंबून असते त्यात खरड छाटणी नंतर सर्वात महत्त्वाचे सुप्त घड निर्मिती व पोषण ह्या संदर्भात अनेक समज गैरसमज आहेत व त्यातून शेतकऱ्यांची दिशाभूल होते व सुप्त घड निर्मिती च्या काळात त्यांच्या हातून कळत नकळत काही चुकीची कामे होतात त्यामुळे सुप्त घड निर्मिती कामात अनेक अडचणी येतात.व परिणामी गोडीबहर छाटणी मध्ये त्याचा उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडून पडते.
तरी सुप्त घड निर्मिती व सुप्त घड पोषण ह्या कामात मदत होईल अशी महत्त्वाची काही सूत्रे आहेत ती जर प्रत्येक शेतकऱ्याने काटेकोर पणे पाळली तर नक्कीच ह्या कामात खूप मदत होईल.त्यास आपण पंचसूत्रे म्हणू ती खालील प्रमाणे आहेत.

१)पाणी नियोजन:-

मित्रानो पाणी व्यवस्थापन हा मुद्दा खूपच किचकट व गुंतागुंतीचा आहे कारण प्रत्येक ठिकाणची पाणी देण्याची पद्धत हि तेथील हवामान, वातावरण, हवेचा वेग, तापमान,जमिनीचा प्रकार,जमीनीची खोली ह्यानुसार बदलत असते त्यामुळे ह्यावर जास्त खोलात बोलण्यापेक्षा पाणी नियोजनातील आपल्या खरड छाटणी मधील चुका ह्यावर लक्ष केंद्रित करू प्रत्येक स्टेज नुसार आपण पाणी देण्याच्या पद्धतीत बदल करत असतो त्याचा झाडावर होणारा विपरीत परिमाण सर्वप्रथम बघू त्यानुसार आपल्याकडून होणाऱ्या चुका लक्षात घेऊन आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार पाणी देण्याची पद्धत सर्वांनी आपल्या जमीन,वातावरण,ह्यानुसार स्वतच्या प्रयोगातून अवगत करून त्यानुसार जमिनीत सतत वापसा टिकवून पाणी कसे द्यावे हे आपले आपणच प्रॅक्टिस मधून ठरवावे.

अ)विसावा काळातील पाणी नियोजन :-

द्राक्ष काढणीनंतर आपण द्राक्षवेलीची कोणतीच व्यवस्थापनीय काळजी घेत नाही. साध्या पाणी व्यवस्थापनाचा विचारसुद्धा आपण करत नाही. द्राक्षकाढणीनंतर जर आपण पाणी दिले नाही तर अनेक परिणाम द्राक्षवेलींवर होताना दिसून येतात, त्यामध्ये प्रामुख्याने द्राक्षवेलीची पाने पिवळी पडून गळून पडतात. पाणी न दिल्याने पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया थांबते. त्याचा परिणाम म्हणून कार्बोहायड्रेटच्या रूपातील मुळातील व खोडांतील राखीव अन्नसाठा कमी होतो. विश्रांती काळात मुळांची वाढ व विकास होत असतो. परंतु द्राक्षवेलींना जर आपण पाणी दिले नाही तर मुळांची वाढ व विकास होत नाही. पोषणद्रव्यांचे शोषण पाहिजे तसे होत नाही. परिणाम म्हणून एप्रिल कटिंगनंतर फुटींना निरोगी वाढीसाठी राखीव अन्नसाठा उपलब्ध न झाल्याने त्यांच्या वाढीवर परिणाम होऊन काडीच्या डोळ्यात तयार होणार्या घडाच्या आकारावर विपरित परिणाम होतो.

ब)खरड छाटणी ते बाग फुटण्याची अवस्था काळातील पाणी नियोजन :-

खरड छाटणी नंतर आपल्या शेतात कुठलेही द्राक्ष बागेवर कुठलेही आच्छादन नसते व उष्णता देखील 35 ते 40 अंश पर्यंत इतकी भयंकर वाढलेली असते त्या काळात साहजिकच बाष्पीभवनाचा वेग हा जास्त असतो व तिथे आपण दिलेले पाणी हे अधिकाअधिक बाष्पीभवन होऊन पेट्रोल सारखे उडून जात असल्याने ह्या काळात पाण्याची जमिनीतील पातळी खालावली जाते ज्याचा परिणाम हा आपल्या बागेच्या फुटव्यावर होत असतो फुटवा मागे पुढे होणे किंवा कमजोर फुटवा होणे हे त्याठिकाणी घडत असते म्हणून अशावेळी आपल्या बागेत ह्या स्टेजला आवश्यक असलेल्या पाण्याची गरज पूर्ण होत नाही व ती पूर्ण होण्यासाठी पाणी वापसा राखून भरपूर प्रमाणात दिले गेले पाहिजे.पाणी मुबलक असल्यास बागेत मोकळे पाणी भरून दिल्याने देखील बागेत फुटवा एकसारखा झाल्याचे बऱ्याच बागायतदारांचे मत आहे.तसेच पाणी कमी असेल तर ओरम्ब्यावर गवताचे, पाचटाचे,बागेतील काड्यांचे मल्चिंग केल्यास देखील पाण्यचे बाष्पीभवन कमी होऊन शेतातील मुळाच्या भागातील गारवा टिकून राहतो व बागेचा फुटवा एकसारखा व व्यवस्थित होतो.

क)बाग फुटण्याची अवस्था ते सबकेन पर्यंत चे नियोजन:-

ह्या अवस्थेत देखील पाण्याची गरज भरपूर असते परंतु बर्याच बागायदारांचे असे म्हणणे पडते कि काडीचा जोम कमी करण्यासाठी पाण्याचा ताण दिला पाहिजे परंतु ताण दिल्यामुळे कधी कधी झाड जास्त स्ट्रेस मध्ये जाते व त्याचा फायदा होण्या ऐवजी तोटाच जास्त झाल्याचे दिसून येते तरी ह्या काळात जास्त पाण्याचा ताण देण्याचे टाळावे भलेही काडीचा अतिरक्त जोम कमी करण्यासाठी वाढ नियंत्रक संजीवके वापरून वाढ मर्यादेत ठेवावी.परंतु पाण्याचा ताण देण्याचा भानगडीत पडू नये.

ड)सबकेन पासून ते टॉपिंग पर्यंत चे नियोजन:-

ह्या अवस्थेला सुप्त घड निर्मितीचा काळ देखील म्हणतात कारण ह्या काळात सुप्त घड निर्मितीचा वेग वाढतो म्हणून ह्या काळात देखील वापसा राखून योग्य रीतीने आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार पाणी नियोजन करणे आवश्यक असते.

ई)टॉपिंग ते काडी पक्वता अवस्था काळातील पाणी नियोजन:-

ह्या अवस्थेला सुप्त घडाचा विकास होण्याचा काळ देखील म्हणतात. सर्वात जास्त नुकसान ह्या काळात बागायतदारांच्या हातून होत असते कारण बहुंतांश शेतकऱ्याचा समज असतो कि ह्या काळात पाण्याची गरज नसते.काडी पक्वतेसाठी कमी पाणी दिल्याने लवकर पक्वता होते असा समज असतो. परंतु खरा घड पोषण होण्याचा हाच काळ असतो व बागायतदारांच्या चुकीच्या गैरसमजामुळे इथे पाण्याचा ताण पडून जवळजवळ ३०/३५टक्के नुकसान ह्या स्टेजला होते.म्हणून ह्या काळात दुर्लक्ष न करता वापसा स्थिती बघून आवश्यक तितक्या पाण्याची पूर्तता आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार करत राहावी.

२)अन्नद्रव्ये व्यवस्थापन:-

बऱ्याच द्राक्ष बागेतील जमिंनीची अवस्था आता चांगली नाही राहिली.सेंद्रिय घटकांचा अभाव,पाणी देण्याची चुकीची पद्धत,जमिनीचा वाढलेला सामू,सेंद्रिय कर्ब चा अभाव,अशा अनेक गोष्टीमुळे जमिनीतून खतांचा अपटेक कमी होऊन कायम कुठल्या ना कुठल्या अन्न द्रव्याची कमतरता जाणवत असते म्हणून सुप्त घड निर्मितिच्या काळात आवश्यक अशा अन्नघटकांची फवारणी तून उपलब्धता करत राहिल्यास त्याचे योग्य परिणाम मिळून सुप्त घड निर्मिती मध्ये चांगला फायदा मिळतो.परंतु याचा अर्थ असा नव्हे कि फ़क़्त फवारणीतुंनच अन्नद्रव्ये द्यावी.दोन्ही ठिकाणाहून आवश्यक अन्नद्रव्ये पुर्तता करावी जमिनीतूनही आणि फवारणीतुंनहि त्यात प्रामुख्याने पोटॅश,कॅल्शियम,मॅग्नेशियम,आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ह्यांची पूर्तता खूप आवश्यक असते.म्हणून ह्या अन्न द्रव्यांची फवारनीतुनही पूर्तता करत राहावी.नत्राचा अति वापर टाळावा अति नत्र वापराचा सुप्त घड निर्मितीवर खूप विपरीत परिणाम होत असतो.अन्नद्रव्ये कमतरता जाणून घेण्यासाठी आपल्या बागेतील वेगवेगळ्या अवस्थेनुसार पान देठ परीक्षण केल्यास अचूक निदान होऊन आपल्याला नेमक्या खतांच्या कमतरता समजून येतात व आवश्यक ती पूर्तता करता येते त्यामुळे खतांवरील अनावश्यक खर्च देखील टळतो.योग्य मात्रेत योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन देखील करता येते.

३)काडी व्यवस्थापन :-

अ)काड्यांची विरळणी :-
हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे खरड छाटणी तील सुप्त घड निर्मिती साठी व सुप्त घड पोषणासाठी खरड छाटणी नंतर ५/६ पान अवस्थेत काड्यांची विरळणी करणे आवश्यक असते ह्यातून एकसारख्या आकारची,समान वयाची,समान जाडीची काडी मिळण्यास मदत होते.तसेच दोन काड्यातील अंतर योग्य रीतीने राखल्यास हवा खेळती राहते,फवारणी सर्व भागावर झाल्याने रोग कीड प्रादुर्भाव रोखण्यास मदत मिळते,सर्व डोळ्यांना सूर्यप्रकाश मिळण्यास देखील मदत होते त्यामुळे फलधारक डोळ्यांची संख्या वाढते.काडी विरळणी करताना प्रति १.३३ चौरस फुटास एक काडी असे नियोजन करावे.म्हणजे आपली बाग ९×५ अंतराची असेल तर ३२-३५ प्रति झाड काडी संख्या ठेवावी.
९×६अंतराची बाग असेल तर ३८-४०प्रति झाड काडीसंख्या ठेवावी.

ब)सबकेन :-

काडीला ९/१० पाने येताच व्हरायटी नुसार ५ ते ७ पानावर सबकेन करावी मागील लेखात सबकेन करण्याविषयी परिपूर्ण माहिती दिलेली आहे. सबकेन केल्यामुळे काडीच्या शेंड्याकडे जाणारा अतिरिक्त जोम थांबतो आणि ते पोषण फलधारक डोळ्याकडे जाऊन सुप्त घड निर्मितीसाठी आवश्यक मदत होते.तसेच गोडीबहर छाटणी मध्ये छाटणी साठी योग्य अशी खुण मिळते.

क)बगल फुटी काढणे:-

बगल फुटी ह्या ३/४ पाने असताना काढून घ्याव्या जास्त वाढू दिल्यास अनावश्यक गर्दी होते व फलधारक डोळ्याना सूर्यप्रकाश भेटत नाही तसेच काडीतील स्टोरेज चा अपव्यय तर होतोच परंतु रोग कीड प्रादुर्भाव देखील वाढून फळ धारक डोळ्यांना इजा पोहचते.

ड)टॉपिंग करणे :-

हे सुद्धा खूप महत्पूर्ण असे काम आहे. टॉपिंग करण्यास उशीर झाल्यास काडीतील अतिरक्त अन्न साठा हा काडीच्या शेंड्याच्या विकासासाठी वापरला जाऊन फळ धारक डोळ्यातील सुप्त घड निर्मिती कमकुवत होते अथवा घडाचा विकास मंदावतो व आगामी काळात मोठ्या अडचणीस सामोरे जावे लागते.म्हणून सबकेन नंतर काडीला पुन्हा ८/९ पाने येताच शेंडा पिंच करून घ्यावा.

ई) पावसाळ्यातील शेंडा खुडणे:-

पावसाळ्यात आपल्या कडे वारंवार शेंडे फुटत असतात असे शेंडे वारंवार खुडून टाकले पाहिजे कारण असे शेंडे वाढून दिल्यास काडीतील अतिरिक्त अन्नसाठा वाया जातो, व सुप्त घड पोषण कमकुवत होऊन पुढे अनेक समस्या निर्माण होतात तसेच उत्पादनात घट होते.अश्या कोवळ्या शेंड्यावर पावसाळी वातावरणात करपा व झानथो सारखे रोगांचा प्रादुर्भाव होऊन मागील पाने अवेळी खराब होण्याचे प्रमाण वाढते.

४)संजीवकाचां वापर :-

खरड छाटणी नंतर वेगवेगळ्या अवस्थेत संजीवकांची आवश्यकता असते आपल्या चुकीच्या कामगतीमुळे हार्मोन्स चा इन बॅलन्स होत असतो त्यात चुकीची पाणी देण्याची पद्धत,खतांच्या चुकीच्या मात्रा, खते देण्याची चुकीची पद्धत,वातावरणातील होणारे बदल,अति तापमान,ढगाळ हवामान,वेळी अवेळी पडणारा पाऊस ह्यामुळे झाडातील हार्मोन्स चा इन बॅलन्स होत असतो.तरी त्यासाठी आवश्यकतेनुसार सी.सी.सी. (निर्यातक्षम बागेसाठी वापर टाळावा) युरासील, ६ बी.ए. प्रेगाफास्ट, सिपिपियू, तसेच इतर वाढ नियंत्रके ह्यांचा वापर केल्यास हमखास सुप्त घड निर्मिती होण्यास मदत होते.

५)पांनाची कार्यक्षमता:-

वरील सर्व गोष्टी करूनही शेवट पर्यंत कार्यक्षम व टिकाऊ पाने ज्याने बनविली(टिकवली)तोच शेतकरी सुप्त घड निर्मिती व घड पोषण सांभाळू शकतो.त्यासाठी वेळोवेळी कीड व रोग नियंत्रण सांभाळणे आवश्यक असते.त्याव्यतिरिक्त सुरुवातीच्या काळात सिविड,सिलिकॉन व इतर पोषक घटकांचा फवारणी तून वापर करूनही पांनाची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते.आणि पावसाळी वातावरणात भुरी,डावणी,करपा,झान्थोमोनास,सारख्या बुरशीजन्य रोगांचे शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे.कारण लवकर पाने खराब झाल्यास फलधारक डोळे अवेळी फुटून खूप नुकसान होते.

महत्वाच्या बातम्या : –

विशेष मोहीम राबवून 15 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना केसीसी कर्ज दिले जाईल

शेतात औषध फवारणीचे नियम काय ? एकदा नक्की वाचा तुम्हला देखील होणार यांचा फायदा

नियमित आंबा मोहरासाठी पॅक्‍लोब्युट्रॉझॉल

नोकरीच्या मागे न लागत ‘या’ शेतकऱ्याने निवडला शेतीचा पर्याय, केली पिवळ्या रंगाच्या कलिंगडाची लागवड

कोकणात एका प्रगतशील शेतकऱ्याने केले चक्क लाल भेंडीचे संशोधन

Leave a comment