हिंगोली : बहु-क्षेत्रीय आणि समुदायाद्वारे चालणाऱ्या दृष्टिकोनाचा उपयोग करून आम्ही 2025 पर्यंत टीबीचे उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय चळवळ उभारत आहोत. असे म्हणत जगात सर्वात जास्त क्षयरोगाचे रूग्ण असणाऱ्या भारताने या जीवघेण्या रोगाविरोधात प्रशासनाने मोहीम उभारली.
मात्र भारतातील विषमता मग ती आर्थिक असु दे की सामाजिक ही या रोगाच्या समूळ उच्चाटन करण्यापुढील सगळ्यात मोठी बाधा ठरत आहे. त्यासाठी क्षयरोगाचे उच्चाटन करूया या ब्रीदवाक्याखाली काम करण्यासाठी असलेल्या आरोग्यव्यवस्थेची प्रत्येक राज्यानुसार जिल्ह्यानुसार गावानुसार कसे काम करते याची माहिती असणे गरजेचे आहे.
आर्थिक विषमतेचा विचार केला गेल्यास त्यात पहिला मुद्दा येतो – दारिद्र्य.जे की दारिद्र्य आणि क्षयरोग हे एक चक्र आहे. दारिद्र्यात खितपत पडलेले लोक या क्षयरोगाच्या जाळ्यात अडकण्याची बरीच शक्यता आहे. जागतिक आरोग्य संगटनेने ही दारिद्र्य हे ही क्षयरोगाचे प्राथमिक कारण असल्याचे म्हटले आहे.
याच धर्तीवर हिंगोली सारख्या मागास अविकसित भागात गरिबी आणि क्षयरोग या विषयावर अभ्यास करताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. जिल्ह्यानुसार गरिबीचे प्रमाण पाहिले गेल्यास हिंगोली चे प्रमाण 29.10 टक्के आहे आणि या गोष्टीचा विचार करता जिल्ह्यातील क्षयरोगाचे प्रमाण ही जास्त असण्याची शक्यता आहे.
तर इतर विकसित जिल्ह्यांचा विचार केल्यास पुणे येथे 7.90% , ठाणे 13.10 आणि मुंबई 14 टक्के असे गरिबीचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे.मात्र क्षयरोग्यांचा आकडा हा विकसीत भागातच जास्त आहे.वरवरून विरोधाभास वाट असला तरी यामागील कारणही विषमताच आहे. आणि ह्याच विषमतेचा परीपाक म्हणजे रुग्ण असुनही ते डिटेक्ट होण्याचे कमी प्रमाण का तर कमी प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या सोई सुविधा.
तसेच याच अनुषंगाने विचार केला गेल्यास असे जाणवते की विकसित भागात – जिथे सोईसुविधा ची उपलब्धता आहे तिथे रुग्ण संख्या ही जास्त आहे म्हणजेच सोईसुविधा अभावी रुग्णांची तपासणी परिणामतः उपचारपद्धती मध्ये अडथळा निर्माण होतो.जसे की हिंगोली जिल्ह्यातच एकूण 5 तालुके आहेत तर त्यांचाच तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करता हे जाणवते की सोयीसुविधा उपलब्ध असणाऱ्या आणि विकसित भागात रुग्ण संख्या जास्त आहे.
हिंगोली मध्ये एकूण रुग्ण संख्येच्या 499 रुग्ण हिंगोली येथे सापडले त्यानंतर वसमत येथे 186, कळमनुरी येथे 107, औंढा नागनाथ 54 तर सेनगाव येथे ही 54 रुग्ण संख्या आढळून आली. याच्याशी निगडित एका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलताना ते म्हणाले की – ‘मूलतः हिंगोली हे एक जिल्ह्याचे ठिकाण असेल तरी राज्याच्या दृष्टीने विचार केल्यास हा एक अविकसित भाग आहे त्यामुळे इथे बऱ्याच समस्या आहेत. जसे की, आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, एक्स रे युनिट ची कमतरता आहे.’
तसेच जास्त विकसित भाग नसल्यामुळे या भागामध्ये कोणतीही एनजीओ काम करण्यास तयार नसते. ज्यांच्यामार्फत आपल्याला लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल.त्यामुळे संपूर्णतः तपासणी यंत्रणा , उपचार पद्धती यावर मर्यादा येतात.याचा परिणाम कमी तपासण्या होतात आणि पर्यायाने लोकांमध्ये असणारे रुग्ण आढळून येत नाहीत आणि संक्रमणाचा धोका वाढतो.
हिंगोली जिल्ह्याच्या विचार करता इथे क्षयरोग रुग्ण खाजगी पेक्षा लोक सरकारी दवाखान्यांमध्ये तपासणी करून उपचार घेण्यास प्राधान्य देतात.मागील तीन वर्षाची आकडेवारी सांगते की 2017 मध्ये सरकारी दवाखान्यांमध्ये 883 तर खाजगी दवाखान्यांमध्ये 210; हीच आकडेवारी 2018 मध्ये 962 व 248 आणि 2019 मध्ये 1040:214 असे सरकारी दवाखान्यात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते.
तसेच खाजगी आणि सरकारी दवाखान्यामध्ये येणाऱ्या रुग्णांची तुलना करता 75% पेक्षा जास्त लोक सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार घेतात.यावरून एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे खाजगी दवाखान्यांची मर्यादित भूमिका.जी वाढवणे पण गरजेचे आहे जेणेकरून तपासणी चा वेग वाढेल.
या वरील सर्व कारणांमुळे एकच बाब अधोरेखित होती आणि ते म्हणजे विषमता मग ती प्रशासकीय स्तरावरची असो किंवा सोईसुविधांची हा क्षयरोग निर्मूलनासाठी एक सर्वांगीण बाजूने परिणाम करणारा आयाम आहे.