खरीप कापुस लागवड नियोजन बद्दल जाणून घ्या…

खरीपाची पेरणी ही पुर्व- पश्चिम करावयाची असते.

0

अक्षय तृतीयेपासून पुढे पेरणीसाठी जमीन तयार करतांना कमीत कमी तीन पाळ्या दिल्या जातात. शेवटची पाळी देखील ठरलेली असते. ही पाळी दक्षिणोत्तर घातली जाते. कारण खरीपाची पेरणी ही पुर्व- पश्चिम करावयाची असते.

♦️ मराठवाडा, विदर्भ आणि आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगदी पिक म्हणून कापूस लागवडीकडे कल वाढल्याचे दिसून येते. हा कल वाढण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे ऊसानंतरचे नगदी पिक म्हणून कापूस पिकाकडे पाहिले जाते. कापसाच्या उत्पादनावर पुढील वर्षाचे व्यवहार ठरतात.

♦️ कापसाचे पैसे आले की, लगीनसराई जोरात होते. दैनंदिन व्यवहारामध्ये चलन फिरते राहते. इतर पिकांची उत्पदकता कमी असल्यामुळे व तात्काळ पैसा देणारे पिक असल्यामुळे या पिकाचे महत्त्व मोठे आहे. कापूस पिकाची उत्पादकता कमी येण्याची बरीच कारणे आहेत. त्यामध्ये

१. कोरडवाहू क्षेत्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रावर कपाशीची लागवड
२. हलकी, मध्यम, भारी सर्व प्रकारच्या जमिनीत लागवड करणे
३. एकाच क्षेत्रामध्ये अनेक वाणांची लागवड करणे
४. सेंद्रिय खतांचा आभाव
५. रासायनीक खतांची चुकीची व अवेळी मात्रा देणे
६. अंतरमशागत करतांना ती चुकीच्या पध्दतीने करणे
७. कीड व रोग नियंत्रण करतांना औषधांची चुकिची निवड
८. हवामानात सतत होत असलेले बदल आणि पावसाची अनियमितता
९. हेक्टरी झाडांची अपूरी संख्या
१०. सिंचनाचा अपुरा आणि अयोग्य वापर
११. सुक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्यांचा अपुरा वापर

यासारख्या गोष्टींमुळे कापूस पिकाची उत्पादकता वरचेवर कमी कमी होतांना दिसून येत आहे. याबरोबरच इतरही घटक त्यास कारणीभुत आहेत. यासाठी काय करता येईल यावर एक अभ्यास बीड जिल्ह्यामध्ये करण्यात आला. यामध्ये

१. एक गांव एक वाण ही संकल्पना राबवणे.

२. फक्त मध्यम ते भारी जमिनीतच कपाशीची लागवड करणे.

३. कपाशीची लागवड करतांना जुन्या काळा प्रमाणे सापळा पिकांची लागवड करणे.

४. उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे तो कमी करणे.

५. बीटी वाणांची लागवड करतांना आता सेंदरी बोंड अळीचे व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचे प्रमाण वाढत असल्यामुळे फक्त बीटी-२ वाणांचीच लागवड करणे.

६. गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळण्यासाठी शेतकरी प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना तंत्रज्ञान देणे.

७. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे
यासारख्या विविध घटकांवर शेतकरी जनजागृतीचे कार्यक्रम राबवणे नितांत गरजेचे झालेले आहे. कापूस लागवड तंत्रज्ञानाबाबत आजूनही बरेच संभ्रम आहेत. ते टाळण्यासाठी या पिकाची खरी गरज काय आहे हे पाहणे संयुक्तीक होईल.

हवामान:
कापूस पिकास संपूर्ण हंगाम कालावधीमध्ये ५०० ते ६०० मीमी पाऊस लागतो. पेरणीच्यावेळी ७५ ते १०० मीमी पाऊस व बियाणे उगवणीसाठी १५ अंश सेल्सिअस तापामानाची आवश्यकता असते. रोप अवस्थेत शारीरीक वाढीसाठी २१ ते २८ अंश सेल्सिअस गरज असते. कपाशीच्या झाडांना फुले येण्याकरिता दिवसाचे २४ ते २८ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस लागते. रात्रीचे तापमान २४ अंश सेल्सिअसचेवर व दिवसाचे तापमान ३० अंश सेल्सिअसचेवर गेल्यास फुले व पाते गळण्याचे प्रमाण वाढते. यामुळे आपल्या परिसरातील तापमानाच्या त्या त्या कालावधीतील चढ-उतारावर शेतकऱ्यांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

 जमीनः
कापूस लागवडीसाठी जमीन निवडतांना त्या जमिनीच्या नांवातच ‘Black Cotton Soil’ म्हणजेच ‘काळी कापसाची जमीन’ हा उल्लेख येतो, अशी निवडली गेली पाहिजे. परंतु बागायती कापूस लागवडीसाठी मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी, ७ ते ८ पीएच आणि १% पेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब असलेली जमीन निवडावी. मात्र हंगामातील कापूस लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन योग्य असते. पूर्व हंगामी कापूस लागवड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होत असल्यामुळे जास्त हलक्या जमिनीमध्ये किंवा खोल काळीच्या जमिनीत या पिकाची लागवड केल्यास पाणी व्यवस्थापनामध्ये अडचणी निर्माण होवू शकतात. म्हणून जमिनीची योग्य निवड याग्य पद्धतीने होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

जमिनीची पूर्वतयारीः
खोल नांगरट, कुळवाच्या ३-४ पाळ्या देवून जमीन भूसभूशीत करावी. या पिकाच्या मुळ्या खोल जात असल्यामुळे हे करणे आवश्यक आहे.कापूस लागवडीपूर्वी शेवटची पाळी देतांना ती पूर्व-पश्चिम अशीच द्यावी. कारण या पिकाची दाटीची लागवड करतांना ती दक्षिणोत्तर होते. शेवटच्या पाळीपूर्वी एकरी ८-१० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात मिसळावे. कपाशीच्या पऱ्हाटीपासून बायोडायनॅमिक पद्धतीने तयार केलेले खत या पिकास वापरल्यास पिकाची सुक्ष्ममुलद्रव्यांची गरज भागवण्यास मदत होते. कोळपट किंवा न नांगरलेल्या शेतात कपाशीची लागवड करू नये. कारण पाण्याचा किंवा पावसाचा थोडाही ताण पडल्यास अशा जमिनीतील कपाशीचे उत्पादन घटते हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे नांगरट केलेल्या जमिनीतच शक्यतो कापूस पिकाची लागवड करावी. पूर्वीचे पिक गहू असेल तर उत्तमच. नसता एकरी एक ते दीड ट्रॉली गव्हाचे काड शेतात मिसळल्यास जमिनीला ताणाच्या काळात भेगा पडत नाहीत. पर्यायाने ओल उठण्याचे प्रमाण कमी होते.

लागवडीची वेळः
पूर्व हंगामी कापसाची लागवड करतांना आपण वेळेचा विचार कधी केल्याचे दिसून येत नाही. मग अक्षय तृतीयेपासून ते मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण लागवड करत असतो. या विषयावर चर्चा व्हावी म्हणून कपाशीच्या झाडाच्या शरीरशास्त्राचा या ठिकाणी आपण आधार घेणार आहोत.

♦️ काही थोड्या जाती वगळता इतर सर्व जातींमध्ये कपाशीच्या झाडास लागवडीपासून ३० ते ३५ दिवसांत पाते, ५० ते ५५ दिवसांत फुले, ९० दिवसांत बोंडे तयार होणे आणि १२० दिवसांत बोंडे फुटून कापूस वेचणीस येतो. जर १ ते १० मे या काळात कपाशीची लागवड केल्यास त्याची बोंडे फुटण्याची अवस्था ही साधारणपणे १ ते १० सप्टेंबर दरम्यान येते.

♦️ मराठवाडा व विदर्भ भागात ऑगस्ट आणि सप्टेंबर हे हमखास पावसाचे महिने म्हणून गणले जातात. त्यातल्या त्यात मराठवाडा विभागात परतीचा मान्सून मोठ्या प्रमाणावर येतो हे नक्की. मग यावेळी एकतर पावसामुळे बोंडे सडण्यास सुरूवात होते. फुटलेली बोंडे पावसात सापडल्यामुळे मोठे नुकसान होते आणि सुरूवातीस लागलेली चांगली व मोठी बोंडे खराब झाल्यामुळे उत्पादनावर फार मोठा परिणाम संभवतो. म्हणून पूर्व हंगामी कपाशीची लागवड २० मे नंतरच करावी. त्या अगोदर करू नये.

Leave a comment