“शेतकरी आंदोलन सुरूच ठेवण्यामागे कोण आहेत ते शोधले पाहिजे”

0

मागील 15 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याच्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. अनेकदा सरकारसोबतच्या चर्चेनंतरही अद्याप तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर ‘सरकार चर्चा करतेय, लेखी आश्वासन देऊ इच्छिते. पण, आंदोलन सुरूच रहावे, अशी काहींची इच्छा’, असल्याचे वक्तव्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

आंदोलकांमध्ये एक समूह असा आहे ज्याला मार्ग नाही काढायचा. ज्यांना वाटतं आहे की शेतकरी आंदोलनातून मार्ग निघायलाच नको. त्यांच्यामागे कोण आहे हे देखील शोधलं गेले पाहिजे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

फडणवीस म्हणाले की, पंजाबमधल्या, हरयाणामधल्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. या आंदोलनासंदर्भात चर्चा मोदी सरकारने सुरु केली. ती चर्चा करताना पहिल्यांदा शेतकऱ्यांनी काही सुधारणा सुचवल्या. सरकारने त्या मान्य केल्या, त्यानंतर त्यांनी सरकारकडे हे आश्वासन लेखी मागितलं ती मागणीही मान्य झाली. त्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी भूमिका बदलली आणि सांगितलं की कायदेच आता रद्द करा. याचा अर्थ काय? आंदोलन सुरू राहावे अशी काहींची इच्छा आहे. त्यांना शोधले पाहिजे. तेथील सर्वजण चुकीचे आहेत असे नाही.

बिहारने तर APMC च रद्द केल्या आहेत. या कायद्यांमध्ये ती तरतूद नाही.तरीही ते विरोध करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या 2019 च्या घोषणापत्रात उल्लेख केला होता. त्यामध्ये काँग्रेसने स्पष्टपणे म्हटले होते की, काँग्रेस सत्तेत आल्यास बाजार समित्यांचा कायदा निरस्त करण्यात येईल आणि शेतमालाच्या खुल्या व्यापारासाठी व्यवस्था उभी करण्यात येईल, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला.

Leave a comment