बोर्डो मिश्रण एक उत्तम बुरशीनाशक
पिकांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण हे एक अतिशय परिणामकारक बुरशीनाशक आहे. प्राध्यापक पी. ए. मिलार्डेट यांनी इ.स. 1882 मध्ये प्रथम मोरचूद आणि चुना यांचे मिश्रणाचा वापर फ्रान्समध्ये द्राक्षावरील केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी केला. महाराष्ट्रात अनेक पिकांवर विशेषतः भाजीपाला आणि फळझाडे या पिकांवरील बुरशीजन्य रोगांवर एक प्रभावी उपाय म्हणून बोर्डो मिश्रणाचा उपयोग केला जातो.
बोर्डो मिश्रण तयार करताना घ्यावयाची काळजी –
* कळीचा चुना वापरताना तो दगडविरहित असावा.
* मिश्रण करताना कोणत्याही धातूच्या भांड्याचा वापर करू नये.
* फवारणी होईपर्यंत प्लॅस्टिक ड्रममध्ये मिश्रण साठवावे.
* दोन अलग केलेली द्रावणे एकमेकांत मिसळताना थंड असावीत.
* फवारणीसाठी मिश्रण वस्त्रगाळ करून वापरावे.
* पावसाळ्यात मिश्रण वापरताना चिकट द्रव (स्टिकर) वापरावे.
* मिश्रण बनविण्यासाठी चांगले पाणी वापरावे. क्षारयुक्त पाणी वापरू नये.
* विरी गेलेला चुना किंवा भुकटी वापरू नये.
* मिश्रण ढवळताना लाकडी किंवा प्लॅस्टिक काठीचाच वापर करावा.
बोर्डो मिश्रण तयार करण्याची पद्धत –
एक टक्का तीव्रतेचे 100 लिटर बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी प्रथम एक किलो चांगला कळीचा चुना घ्यावा. नंतर एक किलो मोरचूद (निळे स्फटिक खडे) घ्यावे. चुन्याची निवळी आणि मोरचुदाचे द्रावण वेगवेगळ्या धातुविरहित भांड्यात बनवावे. नंतर दोन्ही द्रावणे एकत्र मिसळण्यासाठी लाकडी किंवा प्लॅस्टिक ड्रम किंवा सिमेंटची टाकी इत्यादी भांड्याचा वापर करावा. प्रथम चुन्याची निवळी गाळून एका स्वतंत्र भांड्यात ठेवावी. नंतर मोरचूद द्रावण वस्त्रगाळ करून ते हळूहळू चुन्याच्या निवळीच्या द्रावणात ओतावे. दोन्ही द्रावणे एकत्र मिसळण्यासाठी स्वतंत्र तिसऱ्या लाकडी भांड्याचा उपयोग करावा. दोन्ही द्रावणे एकत्र मिसळताना द्रावण सारखे ढवळत राहावे. तयार झालेल्या बोर्डो मिश्रणाचा सामू उदासीन (7.5) असणे गरजेचे आहे.
बोर्डो मिश्रणाची योग्यता तपासण्यासाठी चाचणी –
मिश्रणात जास्त मोरचूद असल्यास कोवळ्या पिकास अपाय होण्याची शक्याता असते. म्हणून बोर्डो मिश्रण पिकावर फवारण्यापूर्वी फवारण्यास योग्य आहे, की नाही याची चाचणी घेणे आवश्य्क असते.
1) पी.एच. पट्ट्या – सामू पाहण्यासाठी सध्या बाजारात पिवळसर रंगाच्या पी.एच. पट्ट्या मिळतात. या पट्ट्यांबरोबर वेगवेगळ्या रंगछटा असलेली 1 ते 10 पर्यंत सामू दर्शविणारी पट्टी मिळते. सामू पाहण्यासाठी पिवळी पट्टी तयार बोर्डो मिश्रणामध्ये बुडवावी व त्यास आलेली रंगछटा सामूदर्शक पट्टीवरील कोणत्या रंगास जुळतो ते पाहावे. ज्या रंगास ती जुळते तो मिश्रणाचा सामू समजावा. सामू सातपेक्षा कमी असल्यास मिश्रणात चुन्याचे द्रावण अगदी थोडे थोडे ओतत व ढवळत जावे. उदासीन द्रावणासाठी असलेला सामूचा रंग येताच बंद करावे.
2) लिटमस पेपर चाचणी – निळा लिटमस पेपर मिश्रणात बुडविल्यानंतर तो लाल झाला तर मिश्रणात अधिक मोरचूद असून, ते आम्लधर्मीय म्हणजेच फवारण्यास अयोग्य आहे, असे समजावे. अशा वेळी मिश्रणात थोडी थोडी चुन्याची निवळी घालून ते ढवळावे. लिटमस पेपर निळा होईपर्यंत द्रावणात टाकावे. लोखंडी सळई किंवा चाकूचे पाते यावर तांबडा थर जमा नसेल किंवा निळा लिटमस पेपर निळाच राहात असेल तर तयार केलेले मिश्रण फवारण्यास योग्य आहे, असे समजावे.
बोर्डो मिश्रणाचा फळपिकावरील रोगनियंत्रणासाठी वापर –
1) आंबा करपा 0.8% पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोन फवारे आणि जून ते ऑगस्टपर्यंत 4 फवारण्या कराव्यात. 2) द्राक्ष करपा 1% पावसाळ्यापूर्वी एक आणि नंतर पुढे सप्टेंबर – ऑक्टो बरपर्यंत महिन्यातून 1 ते 2 वेळा अशी एकूण 6 ते 8 वेळा फवारणी करावी.
केवडा 0.8%
3) केळी पानांवरील ठिपके 0.8% जून ते ऑगस्टपर्यंत 2-3 वेळा फवारणी करावी.
4) डाळिंब पानांवरील काळे डाग 0.8 % बहार धरल्यानंतर नवीन फुटीवर 1-2 फवारे आणि फळांचा काढणी करेपर्यंत 3-4 फवारे करावेत.
खोडावरील काळे डाग 1%
फळावरील काळे डाग 1.
5) पपई पानावरील ठिपके 1% ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टो बर महिन्यांत एकेक फवारा द्यावा.
6) लिंबूवर्गीय संत्रा, मोसंबी व लिंबू पानांवरील काळे डाग 1% बहरानंतर 2-3 फवारे जिवाणूंमुळे होणारा करपा 1% मे ते डिसेंबर महिन्यांत एकेक फवारा द्यावा.
शेंडामर 1% वर्षातून 2-4 वेळा
टिक्का 0.8-1% फळे सुपारीच्या आकाराची झाल्यानंतर पुढे 3-4 फवारे द्यावे.
7) सीताफळवर्गीय फळे पानांवरील काळे डाग 0.8% पावसाळ्यापूर्वी 1 ते 2 वेळा फवारणी करावी.
फळे काळे पडणे 1% जून ते सप्टेंबर महिन्यात एकेक फवारणी
8) नारळ करपा 1% जून ते सप्टेंबर महिन्यात एकेक फवारणी
गळारोग 1% पावसाळ्यापूर्वी एक पुढे एकेक असे एकूण 4 फवारे द्यावे.
पानावरील ठिपके
9) सुपारी करपा 1% जून ते सप्टेंबर महिन्यात एकेक फवारणी
गळारोग 1% पावसाळ्यापूर्वी एक पुढे एकेक असे एकूण 4 फवारे द्यावे. पानावरील ठिपके
बोर्डो मिश्रणाचा भाजीपाला पिकावरील रोगनियंत्रणासाठी वापर –
वांगी, मिरची, बटाटा, टोमॅटो, भोपळावर्गीय भाज्या, कोबी, वाटाणा इ. पिकांवरील करपा, काळा करपा, पानांवरील ठिपके, केवडा, भुरी, जिवाणूजन्य करपा अशा विविध रोगांच्या नियंत्रणासाठी वापर करता येतो. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्रावणांची तीव्रता ठरवावी. साधारणतः भाजीपाला पिकांसाठी 0.5 ते 0.6% तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारणीसाठी योग्य असते. यापेक्षा जास्त प्रमाण वापरल्यास काही पिकांमध्ये दुष्परिणाम होण्याची शक्योता असते. जमिनीतील बुरशीमुळे होणारे मर, मूळकूज, खोडकूज, इ. रोगाच्या नियंत्रणासाठीसुद्धा बोर्डो मिश्रण एक टक्का हे एक उत्तम बुरशीनाशक आहे.
1 टक्के तीव्रतेचे बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी 1 किलो मोरचूद, 1 किलो चुना आणि 100 लिटर पाणी लागते.
सौजन्य – सदगीर मदन
८१०८२८४४९९
क. का. वाघ. उद्यानविद्या
महाविद्यालय नाशिक.