आज होणारी ट्रॅक्टर मार्चवरील सुनावणी तहकूब

0

नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. एकीकडे सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे तर दुसरीकडे शेतकरी हे कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी स्थगिती दिली होती. तसंच समितीही स्थापन केली होती.

शेतकरी संघटनांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे ट्रॅक्टर मार्च काढण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु यावरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी २० जानेवारी रोजी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी स्थगिती दिली होती. तसंच माहिती घेण्यासाठी चार सदस्यांची समितीही नेमली होती. न्यायालयानं नेमलेल्या समितीचा शेतकऱ्यांकडून विरोधही करण्यात आला आहे. त्यातील सर्व सदस्य सरकारचे समर्थक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं.

“शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च अवैध असेल यावेळी दिल्लीत ५ हजार जण प्रवेश करण्याची शक्यता आहे,” असं मत अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाळ यांनी व्यक्त केलं. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मार्च काढणाऱ्या शेतकऱ्यांनी या मार्चच्या रंगीत तालमीसाठी १९ जानेवारी ही तारीख निश्चित केली असल्याचे बोलले जात आहे. दुपारी ३ वाजता या मार्चचा रंगीत तालीम करण्यात येणार आहे.

 

Leave a comment