फळे व भाजी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे यंदाचे हंगाम समाधानकारक
पालघर आणि डहाणू तालुक्यात मिरचीची लागवड करण्यात येते. मिरचीचे सरासरी हेक्टरी २५ टन उत्पादन मिळाले आहे. मिरचीला बाजारात यंदा ७० ते ७५ रुपये किलो असा दर मिळाला अशी माहिती देण्यात आली आहे. या दोन तालुक्यांमध्ये सुमारे ७५० ते एक हजार हेक्टर मिरचीचे लागवड क्षेत्र असून यंदाच्या उत्पादनावर शेतकरी समाधानी आहे. डहाणूत ४०० हेक्टर शेडनेट क्षेत्रामध्ये ढोबळी मिरचीची लागवड घेण्यात येत. या मिरचीला देखील हंगामामध्ये २५ ते ४५ रुपये इतका दर यंदा मिळाला असून मिरचीचा हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
या दोन तालुकायत दुधी, भोपळा, वांगी, गवार, टोमॅटो, काकडी, कारली,गलका, पालेभाज्या, मेथी, कोथिंबीर,शिराळे, कोहळे, याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. स्थानिक बाजारपेठेत सुद्धा त्याला चांगली मागणी आहे. मुंबई बाजारपेठेमध्ये येथील भाजीपाला पोहोचवला जातो. यंदा भाजीपाला लागवड करणारा बागायतदारांना चांगले दर मिळाले आहेत त्यामुळे बागायतदार खुश आहेत. वाडा तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचे टरबूज आणि कलिंगड या फळांची लागवड करण्यात येते. कलिंगडची विक्री स्थानिक पातळीवर तसेच मुंबई, ठाणे शहरात करण्यात येते. त्याच पद्धतीने डहाणू तालुक्यात चिकू फळाला किसान रेलची मदत मिळाल्याने हे फळ दिल्लीतल्या बाजारपेठेत पाठवण्यात येते.
सध्या देशातील विविध शहरात कोरोना या महाभयंकर आजाराने थैमान घातले आहे. कोरोनाचाकहर वाढल्याने टाळेबंदी लावण्यात आली असून राज्याबाहेर भाजीपाला पाठविण्यास काही प्रमाणात शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. मुंबई- ठाणे या बड्या शहरात स्थानिक भाजीपाल्याला मागणी असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत बागायतदारांचे उदरनिर्वाहाचे साधन सहजपणे सध्या झाले आहे.