पोलिसांकडे दुसरा पर्याय नव्हता, शेतकऱ्यांवर केलेल्या कारवाईचे गृहमंत्रालयाकडून समर्थन
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर परेडचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांचा विरोध शेतकरी अद्याप करत आहेत. यावर कोणताही तोडगा निघत नसल्याने शेतकरी नेत्यांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढली होती. मात्र या परेडदरम्यान हिंसाचार झाल्याचे पाहण्यास मिळाले. शेतकरी आंदोलकांकडून लाल किल्यावर झेंडा देखील फडकविण्यात आला होता. या घटनेत शेकडो पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
शेतकऱ्यांच्या कृतीमुळे दिल्ली पोलिसांसमोर दुसरा पर्याय नव्हता. ट्रॅक्टर परेड दरम्यान, पोलिसांकडून देखील शेतकऱ्यांवर लाठीहल्ला, अश्रुधुराचा मारा केल्याचे व्हिडीओ समोर आले होते. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे समर्थन केले आहे. पोलिसांकडे दुसरा पर्याय नव्हता, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्रालयाने संसदेत सांगितले की, शेतकऱ्यांच्या कृतीमुळे दिल्ली पोलिसांसमोर दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचे फवारे मारले व जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर केला. शेतकरी सरकारी मालमत्तेचे नुकसान करत होते, त्यावेळी पोलिसांकडे दुसरा पर्याय उरला नव्हता.
दरम्यान, हिंसाचाराच्या घटनेनंतर काही शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली असली तरी अनेक प्रमूख शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम आहेत. भारतीय किसान युनियनने नव्या कृषी कायद्यांसंबंधी देशभरात जागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आपण देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन मोहीम राबवणार असल्याचं भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी जाहीर केलं. दुसरीकडे शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारीला देशव्यापी ‘चक्का जाम’ची घोषणा देखील केली आहे.
महत्वाच्या बातम्या : –
आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी – कंगना रनौत
कृषि क्षेत्रातील ‘या’ व्यक्तींना पद्म पुरस्कार
उन्हाळ्यात जनावरांना होणारे आजार आणि त्यावरील उपाययोजना
मुंग्या या शेतकऱ्यांचे एक मित्र किटक