पुढील दोन ते तीन दिवस थंडी कमीअधिक स्वरूपात राहणार

0

उत्तर भारतातील हिमालय व परिसरात असलेल्या थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. यामुळे राज्यातील थंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा किंचित वाढला असला, तरी तो दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे. अरबी समुद्र आणि हिंदी महासागरच्या  नैर्ऋत्य भागात चक्रीवादळासाठी पोषक असलेले वातावरण आणि उत्तरेकडील कमी झालेल्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यातील थंडी कमी झाली आहे.

पुढील दोन ते तीन दिवस ही थंडी कमीअधिक स्वरूपात राहणार आहे. तर सोमवार  नंतर पुन्हा काही प्रमाणात थंडी वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आवारामध्ये नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत येथे ९.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

तर शुक्रवारी म्हणजेच काल २५ डिसेंबर २०२० रोजी सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः मुंबई (सांताक्रूझ) १८.८ (१), ठाणे १९, अलिबाग १६.८ (-२), रत्नागिरी १९.९, डहाणू १८.६, पुणे ११.९ (१), जळगाव १३ (१), कोल्हापूर १७.५ (३), महाबळेश्‍वर १४.९ (२), मालेगाव १२.४ (१), नाशिक १३ (३), निफाड ११, सांगली १५.९ (२), सातारा १४.१ (१), सोलापूर १५.६, औरंगाबाद १२.५ (१), बीड १६.८ (३), परभणी ११.९ (-१), परभणी कृषी विद्यापीठ ९.३, नांदेड १४ (१), उस्मानाबाद १२.३ (-१), अकोला ११.४ (-२), अमरावती १४.७, बुलडाणा १२.६ (-२), चंद्रपूर ११.६ (-२), गोंदिया ९.४ (-३), नागपूर ११.२ (-२), वर्धा १० (-५).

पुणे, नगर, नाशिक, जळगाव भागांत किंचित थंडी आहे. तर कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या भागांत बोचरी थंडी आहे. कोकणातही काहीशी थंडी असल्याने किमान तापमान अजूनही १६ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका कमी होऊ लागला आहे. विदर्भातील व मराठवाड्यातील काही भागांत थंडी  असल्याने किमान तापमानात घट असल्याचे आढळून येते. मात्र काही भागांत थंडी कमी झाली आहे. त्यामुळे गोंदिया वगळता इतर सर्वच भागांत किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्यावर गेला आहे. मराठवाड्यातही किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. या भागात ९ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रातही थंडीचा प्रभाव कमी झाल्याने थंडी कमीअधिक स्वरूपात आहे.

Leave a comment