प्रचलित पेरणी पध्दतीने लागवड करतांना सोयाबिन पिकाच्या मुख्य समस्या
सोयाबिन पिकाच्या समस्या :-
– प्रचंड मोठी झाडांची संख्या (शिफारशीत पेरणीच्या अंतरानुसार प्रति एकर 1,77,777 झाडे)
– पाऊस कमी आल्यास पिकाची वाढ खुंटते व उत्पादनात मोठी घट येते.
– पाऊस जास्त आल्यास, पिकाची अवास्तव वाढ होते. पिकाची आपसातच सुर्यप्रकाश, जागा, जमीनीतील
ओल, अन्नद्रव्ये यासाठी स्पर्धा वाढते व उत्पादनात मोठी घट येते.
– वरिल दोन्ही परिस्थितीत फांद्याची संख्या व फुलधारण क्षमता कमी होऊन उत्पादनात घट येते.
– पिकाची अवास्तव वाढ झाल्यास, पिकाने संपूर्ण शेत व्यापल्या जाते. त्यामुळे शेतात घुसायला जागा राहत
नाही. पिकाची निगराणी – निरीक्षण शक्य होत नाही. पिकावर कीडी-रोग यांचा प्रादुर्भाव झाल्याचे वेळीच
लक्षात येत नाही.
– कीटकनाशक – बुरशीनाशकाची फवारणी करतांना अडचणीची स्थिती राहते. फवारणी वेळेत होत नाही.
फवारणी योग्य प्रकारे होत नाही.
– शेतात हवा खेळती न राहल्यामुळे, सुर्यप्रकाशाचे वितरण नीट न झाल्यामुळे, कीडी रोगांचा प्रादुर्भाव
वाढतो.
– कोरडवाहु परिस्थितीत पिकाची लागवड करतांना, पावसात मोठा खंड आल्यास प्रचंड मोठया झाडांच्या
संख्येची जमीनीतील ओलीची गरज पूर्ण होऊ शकत नाही.
– पावसात खंड असतांना, ओलीताची सोय असल्यास, पिक दाटलेल्या अवस्थेत असतांना पटपाणी अथवा
स्प्रिंकलरद्वारे ओलीत करणे शक्य होत नाही अथवा अतिशय अडचणीचे ठरते.
प्रचलीत पेरणी पध्दतीचे तोटे
- पिकाची जागा, सुर्यप्रकाश, जमीनीतील ओल,अन्नद्रव्ये यासाठी तिव्र स्पर्धा होतांना आढळते पिकाची दाटी होते
- पिकाची निगराणी, निरिक्षण शक्य होत नाही.
- शेतात फीरता येत नाही
कीडी, अळया, रोगांचा प्रादुर्भाव वेळेत लक्षात येत नाही. - फवारणी योग्य प्रकारे होत नाही तसेच फवारणी करतांना अडचणी उदभ्वतात.
जास्त पावसाच्या स्थितीत पिकाच्या बुडाशी पाणी साचुन मोठे नुकसान होते. तसेच पाणी शेतातुन बाहेर काढण्याची कुठलीही व्यवस्था त्यावेळी उपलब्ध नसते. - पावसात मोठा खंड पडल्यास अथवा कमी पावसाच्या स्थितीत जमीनीतील ओल संपल्यामुळे पिकाच्या उत्पादकतेत मोठी घट येते.
- पिकाची दाटी झाल्यामुळे शेतात हवा खेळती राहत नाही, पर्यायाने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
- सुर्यप्रकाश पिकाला समप्रमाणात वितरीत न होऊ शकल्यामुळे पिकाची स्पर्धा वाढुन, पिकाची असमतोल वाढ होते. सुर्यप्रकाश जमीनीपर्यंत न पोहचु शकल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
- बरेचदा शेतकऱ्यांकडे ओलीताची सोय असुन सुध्दा पटपाणी देता येत नाही,कारण पिक दाटलेले असल्यामुळे सऱ्या पाडण्यासाठी जागा शिल्लक नसते अथवा तुषार सिंचनाची उपलब्धता असुन सुध्दा पाईप टाकण्यासाठी जागा नसल्यामुळे शेतकरी हतबल होतो व पिकाला ओलीत करु शकत नाही.
- पुनरुत्पादन वाढीच्या अवस्थेदरम्यान पिकाची दाटी झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट येते.
- दाण्याचा आकार व दर्जा एकसमान मिळत नाही.
पट्टापेर पध्दतीचे फायदे
- पिकाची सुर्यप्रकाश, जागा, अन्नद्रव्ये, जमीनीतील ओल या बाबी साठी होणारी स्पर्धा कमीत कमी
राखता येते. - पिकाची एकसमान वाढ होते. पिकाची निगराणी, निरिक्षण योग्य प्रकारे करता येते
- शेतात फीरायला जागा उपलब्ध होते.
- किडी, अळया, रोग यांचा प्रादुर्भाव वेळीच लक्षात येतो.
- फवारणी प्रत्येक पट्टयाला योग्य प्रकारे करता येते.
- डवऱ्याच्या फेऱ्याच्यावेळी खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी सऱ्या काढलेल्या असल्यामुळे शेतात पडणारे पावसाचे, अतिरीक्त पाणी सरीमध्ये उतरते, सरीमध्ये साचते,मुरते व जिरते आणि मुलस्थानी पावसाच्या पाण्याचे संवर्धन शक्य होते अथवा जास्त पावसाच्या स्थितीत सरीमध्ये जमा झालेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढणे शक्य होते.
- मुलस्थानी पावसाच्या पाण्याच्या संवर्धनाच्या माध्यमातुन कमी पावसाच्या स्थीतीत अथवा पावसात लांब खंड पडल्यास सुध्दा जमीनीतील ओल टीकवुन ठेवण्यास मदत होऊन उत्पादकतेत वाढ शक्य होते.
- सोडओळ (पट्टापेर) पध्दतीत, मधेमधे ठेवलेल्या मोकळया ओळींमुळे शेतात हवा खेळती राहते, पर्यायाने बुरशीजन्य रोगांपासुन पिकाचा बचाव करता येतो.
- पट्टापेर पध्दतीच्या माध्यमातुन स्वच्छ सुर्यप्रकाश समप्रमाणात, पिकाला उपलब्ध होतो. त्यामुळे स्पर्धा टाळल्या जाऊन पिकाची समतोल वाढ होते. सुर्यप्रकाश जमीनीपर्यंत पोहोचल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी
प्रमाणात होतांना आढळतो. - शेतकऱ्याकडे ओलीताची सोय असल्यास सऱ्या आधीच पाडुन ठेवलेल्या असल्यामुळे,सऱ्यांद्वारे ओलीत देणे शक्य होते. तसेच तुषार सिंचन संचाची व्यवस्था असल्यास पाईप टाकण्यासाठी जागा उपलब्ध असल्यामुळे योग्य वेळी पाणी देणे सोईचे होते.
- मधे- मधे खाली ओळ ठेवल्यामुळे काठावरील ओळींना पसरण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यामुळे ‘बॉर्डर इफेक्ट’ च्या माध्यमातुन, उत्पादनात वाढ शक्य होते.
- दाण्याचा आकार व दर्जा एकसमान मिळतो.
कोरडवाहु परिस्थितीत पावसाच्या पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनासाठी सोयाबिन पिकाच्या समस्यांवर आधारित नाविण्यपुर्ण पेरणीपध्दती :-
कोरडवाहु परिस्थितीत सोयाबिनची लागवड करतांना सुधारित नाविण्यपुर्ण पेरणीपध्दतीचा (जोळओळ
पध्दत, सोडओळ पध्दत, सरीवरंबा पध्दत, रुंद वरंबा व सरी पध्दत) अवलंब करुन पावसाच्या पाण्याच्या योग्य
नियोजन व व्यवस्थापनातुन उत्पादनात शाश्वत वाढ शक्य होते.
जोडओळ पध्दत :-
या पध्दतीने सोयाबिनची पेरणी करतांना प्रचलीत पध्दतीनेच (सरत्याने, काकरीने अथवा तिफणीने)
शेताच्या उताराला आडवी पेरणी करावी. पेरणी करतांना दोन ओळींमधील अंतर कमी करुन, जोडओळीमध्ये पेरणी
करावी तसेच दोन जोळओळीमधील अंतर, दोन ओळीमधील अंतरापेक्षा दुप्पट राखावे, जेणेकरुन प्रत्येक
जोडओळीनंतर मोकळी जागा राखल्या जाऊन पिक साधारणत: 15-20 दिवसाचे झाल्यानंतर त्या ठिकाणी डवऱ्याच्या
फेऱ्याच्यावेळी, डवऱ्याला दोरी बांधुन अथवा बलराम नांगरच्या सहाय्याने सरी पाडल्यास, मुलस्थानी पावसाच्या
पाण्याचे संवर्धन करणे शक्य होईल.
जोड ओळ पध्दतीने पेरणी करावयाची असल्यास 1 फुटी काकरीने, शेतात काकर पाडुन घ्यावे.
अश्याप्रकारे काकर पाडल्यानंतर मजुरांच्या सहाय्याने सोयाबिन बियाण्याची पेरणी दोन झाडातील अंतरानुसार (7.5-8.0 सेमी) टोकन पध्दतीने करावी. टोकन पध्दतीने पेरणी करतांना, दोन ओळी टोकाव्या व तीसरी ओळ खाली ठेवावी. अश्या प्रकारे जोळओळीत पेरणी करतांना प्रत्येक तिसरी ओळ खाली ठेवल्यामुळे, दोन जोड ओळींमध्ये दोन फुटांची जागा खाली राहील. या ठिकाणी डवऱ्याच्या फेराच्यावेळी दांड अथवा सरी अथवा गाळ पाडुन घेतल्यास,जोळ ओळ पध्दतीने पेरलेले सोयाबिन गादी वाफ्यावर येते. या पध्दतीमध्ये सोयाबिनची प्रति एकर झाडांची संख्या प्रचलित पध्दती ऐवढीच राखल्या जावून उत्पादनात शाश्वत वाढ होते.
फायदे :-
- सोयाबिन पिकाच्या प्रति एकर झाडांच्या संख्येसोबत कुठलीही तडजोड न करता प्रचलीत प्रध्दतीएवढीच
शिफारशीनुसारची झाडांची संख्या राखल्या जाते. - दोन जोडओळींमधील मोकळ्या जागेचा विविध प्रकारे उपयोग करणे शक्य होतो.
- दोन जोडओळींमधील मोकळ्या जागेत डवऱ्याला दोरी बांधुन अथवा बलराम नांगराच्या सहाय्याने सरी
तयार करुन, मुलस्थानी पावसाच्या पाण्याचे संवर्धन शक्य होते. - जास्त पावसाच्या स्थितीत सरित साचलेल्या पाण्याचा पिकाशी सरळ संबंध टाळता येतो.
- पिकांचे निरीक्षण, निगराणी, फवारणी, आंतरमशागत इत्यादी सुलभपणे शक्य होते.
- शेतात हवा खेळती राहते.
- पिकाला सुर्यप्रकाशाचे वितरण एकसमान शक्य होते.
- ओलीताची सोय असल्यास दांडाद्वारे पटपानी अथवा स्प्रिंकलरच्या माध्यमाने ओलीत करता येते.
सोडओळ पध्दत (पट्टापेर):-
या पध्दतीने पेरणी करतांना शिफारशीनुसारच्या दोन ओळीतील अंतरानुसार (45 सें.मी.) प्रचलीत पध्दतीनेच (सरऱ्याने, काकरीने अथवा ट्रॅक्टरने) शेताच्या उताराला आडवी पेरणी करावी. पेरणी करतांना प्रत्येक तिन
ओळीनंतर चौथी ओळ अथवा प्रत्येक चार ओळीनंतर पाचवी ओळ अथवा प्रत्येक पाच ओळीनंतर सहावी ओळ अथवा प्रत्येक सहा ओळीनंतर सातवी ओळ अथवा प्रत्येक सात ओळीनंतर आठवी ओळ खाली ठेवावी.
सोडओळ पध्दतीचे वरील प्रमाणे व्यवस्थापन करावयाचे झाल्यास बैलजोडीचलीत काकरी , सरत्याने अथवा तिफनीने पेरणी :-
सोयाबिनचे बैलजोडीचलीत पेरणी यंत्र सर्वसाधारणपणे तीन दात्याचे असते. तिन दाती काकरीने,
सरत्याच्या सहाय्याने अथवा तिफनीने पेरणी करतांना प्रत्येक वेळी पलटुन येतांना व जातांना चौथी ओळ खाली
ठेवल्यास शेतात तिन – तिन ओळीत पट्टापेर पध्दतीने पेरणी शक्य होते. पेरणी करतांना सहा ओळींचा पट्टा सुध्दा घेता येतो. याकरीता पेरणी करतांना पलटुन येतांना तिनओळींच्या बाजुला लागुन तिन ओळी घ्याव्यात. त्यानंतर पलटुनजातांना सातवी ओळ खाली ठेवावी. पुन्हा पलटुन येतांना तीन ओळी लागुन घ्याव्यात. अशा प्रकारे शेतात सहा – सहाओळींचे पट्टे तयार होतील. बैलजोडीचलीत पेरणीयंत्र चार दाती असल्यास प्रत्येक वेळी पलटुन येतांना व जातांनापाचवी ओळ खाली ठेवावी, म्हणजेच शेतात चार – चार ओळींचे पट्टे तयार होतात.
ट्रॅक्टरचलीत पेरणीयंत्र :
सर्वसाधारपणे सोयाबिनचे ट्रॅक्टरचलीत पेरणीयंत्र सात दात्यांचे असते. याद्वारे पट्टापेर पध्दतीचे नियोजन
करावयाचे झाल्यास पेरणीयंत्राचे चार नंबरचे म्हणजेच मधले चौथे छीद्र बंद करावे. ट्रॅक्टर पलटुन येतांना व जातांना
प्रत्येकवेळी आठवी ओळ खाली ठेवल्यास शेतात तिन – तिन ओळींचे पट्टे तयार होतात. प्रत्येकवेळी पलटुन येतांना व जातांना नेहमीप्रमाणे लागुनच पेरणी केल्यास शेतात सहा-सहा ओळींचे पट्टे तयार होतील. पाच ओळींचा पट्टा
राखावयाचा असल्यास टॅक्टरच्या पेरणी यंत्राचे दोन्ही काठावरचे प्रत्येकी एक छीद्र बंद करावे. म्हणजेच शेतात प्रत्येक सहावी ओळ खाली राहील. अशाप्रकारे प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटुन येतांना व जातांना ट्रॅक्टरचे शेवटचे दाते खाली ठेवलेल्या ओळीत ठेवल्यास शेतात पाच – पाच ओळींचे पट्टे तयार होतील. सात ओळींचा पट्टा शेतात राखावयाचा झाल्यास प्रत्येकवेळी ट्रॅक्टर पलटुन येतांना व जातांना आठवी ओळ खाली ठेवावी. अशा प्रकारे खाली ठेवलेल्या चौथ्या अथवा पाचव्या अथवा सहाव्या अथवा सातव्या अथवा आठव्या ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या फेऱ्याच्या वेळी, डवऱ्याच्या जानोळ्याला गच्च दोरी गुंडाळून सरी- दांड अथवा गाळ पाडुन घ्यावा.
महत्वाचे :-
पट्टापेर परेणी पध्दतीच्या अवलंबावुन पिकाच्या अडचणी समस्या कमी होऊन, पेरणी पध्दतीतील कींचीत
बदलाच्या माध्यमातुन उत्पादकतेत वाढ शक्य होते.
सर्वसाधारण शिफारशीनुसार सलग सोयाबिनसाठी दोन ओळीतील अंतर 45 सेमी. व दोन झाडातील अंतर
5 सेमी. असल्यास एकरी 30 कीलो बियाणे पेरणीसाठी वापरण्याची शिफारस आहे. त्यामुळे पट्टापेर
पध्दतीचा अवलंब करतांना, सामान्यत: किती ओळीनंतर खाली ओळ ठेवली आहे. म्हणजेच ओळीची संख्या
किती प्रमाणात कमी झाली, त्यानुसार पेरणीसाठी लागणारे बियाण्याचे प्रमाण निश्चित करणे हा निर्णय
सर्वस्वी शेतकऱ्याने विचारपुर्वक घ्यावा.
सर्वसाधारणे प्रत्येक चौथी ओळ खाली ठेवल्यास पेरणीसाठी 25% बियाण्याचे प्रमाण कमी वापरावे लागेल.
प्रत्येक पाचवी ओळ खाली ठेवल्यास 20%, प्रत्येक सहाव्या ओळीसाठी 15% यानुसार बियाण्याचे प्रमाण
कमी करावे लागेल.
म्हणजेच प्रत्येक चौथी ओळ खाली ठेवल्यास एकरी 22.5 कीलो बियाणे प्रत्येक पाचव्या ओळीसाठी एकरी
24 कीलो बियाणे प्रत्येक सहाव्या ओळीसाठी एकरी 25.5 कीलो बियाणे पेरणीसाठी वापरावे लागेल.
सोयाबिन प्रमाणेच मुग, उडीद, हरभरा या पिकांसाठी सुध्दा पट्टापेर पेरणी पध्दतीचा अवलंब केल्यास या
पिकांच्या समस्या कमी होऊन, उत्पादनात भरिव वाढ शक्य होते.
सुधारित पट्टापेर परेणी पध्दतीच्या अवलंबासोबतच पेरणीपुर्वी बियाण्याला रायझोबियम, पीएसबी व
ट्रायकोडर्माची बीज प्रक्रीया करणे, खत व्यवस्थापनात झिंक सल्फेट अथवा सल्फरचा समावेश करणे, खोड
माशीचा प्रादुर्भाव आधिच्या हंगामात झालेला असल्यास रासायनिक खतासोबत एकरी चार ते पाच किलो
फोरेटचा वापर करणे, तननाशकाचा अवास्तव वापर टाळणे, आंतरमशागत सुरुवातीच्या 35-40 दिवसात
पुर्ण करणे, पावसात खंड पडल्यास व ओलीताची सोय असल्यास फुलोऱ्यापुर्वी तसेच शेंगामध्ये दाणे
भरतांना संरक्षित ओलित करणे, फुलोरा अवस्थेच्या सुरवातीला ट्रायझोफॉस, ब्रासिकॉल व सल्फरची
फवारणी करणे, यानंतर पुन्हा शेंगामध्ये दोणे भरतांना पुढची फवारणी करणे, या सोबत पहिल्या
फवारणीच्या वेळी 2% युरिया व दुसऱ्या फवारणीच्या वेळी 2% डीएपीचा वापर करणे या बाबी उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरतात.
सरीवरंबा पध्दत :-
कोरडवाहू परिस्थितीत सरीवरंबा पध्दतीने पेरणी करतांना, लोखंडी अथवा बलराम नागरांच्या सहाय्याने, शेताच्या उताराला आडवी, पेरणीच्या दोन ओळीतील अंतरानुसार प्रत्येक दोन फुटावर (60 सें.मी.) एका धुऱ्यापासुन दुसऱ्या धुऱ्यापर्यंत सऱ्या पाडून घ्याव्या. अशाप्रकारे दोन सऱ्यांमध्ये तयार झालेल्या वरंबाच्या पृष्ठभागावर दोन झाडातील अंतरानुसार (8-10 सें.मी.) टोकुन (टोबुन) पेरणी करावी.
तोटे :-
- मजुरांची अनुपलब्धता.
- मजुरी खर्चात वाढ
फायदे :-
- योग्य खोलीवर बियाण्याची पेरणी शक्य होते (3 से.मी.)
- पेरणी पश्चात बियाणे ताबडतोब मातीने झाकल्या जाते.
- योग्य व चांगली उगवण मिळण्यास मदत होते.
- बियाण्याचे प्रमाण कमी लागते (प्रति एकर 17-22 किलो)
- बियाणे खर्चात बचत शक्य होते.
- वरंबाच्या पृष्ठभागावर पेरणी केल्यामुळे मुळांची खोलवर वाढ व विस्तार होण्यास मदत होते.
- पाणी आणि झाड यांचा सरळ संबंध टाळल्या जाऊन,साचलेल्या पाण्यावाटे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांना प्रतिबंध बसतो.
- कमी पावसाच्या स्थितीत, मुलस्थानी पावसाच्या पाण्याचे संवर्धन शक्य होते.
- जास्त पावसाच्या स्थितीत, अतिरिक्त पाण्याची शेताबाहेर विल्हेवाट शक्य होते.
- पेरणीच्या अंतरानुसार झाडांची संख्या योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते.
रुंद वरंबा व सरी पध्दत :-
ओलिताखाली अथवा कोरडवाहु परिस्थितीत रुंद वरंबा व सरी पध्दतीने पेरणी करतांना, लोखंडी अथवा बलराम नागराच्या सहाय्याने प्रत्येकी 180 सें.मी. वर (म्हणजेच प्रत्येक 6 फुटावर) उताराला आडव्या सऱ्या पाडुन घ्याव्या. अश्याप्रकारे दोन सरीमध्ये तयार झालेल्या गादीवाफ्यावर दोन ओळीतील अंतरानुसार (45 सें.मी) तसेच दोन झाडातील अंतरानुसार (8-10 सें.मी.) टोकुन (टोबुन) पेरणी करावी. या पध्दतीने पेरणी केल्यास गादीवाफ्यावर सोयाबिनच्या चार ओळी बसतात.
- मजुरांची उपलब्धता असल्यास टोकण पध्दतीने पेरणी करतांना सरीवरंबा तसेच रुंद वरंबा व सरी पध्दतीचा अवलंब अत्यंत फायद्याचा सिध्द होतो. अश्याप्रकारे तोटे व फायदे यांची तुलना केल्यास मजुरी खर्चात होणारी वाढ नगण्य बाब ठरुन, मिळणाऱ्या फायद्यांमुळे उत्पादनात मोठी वाढ शक्य होते.
- रुंदवरंबा व सरी पध्दतीने अश्याप्रकारे डोबीव पध्दतीने पेरणी करतांना दोन ओळीतील अंतर 30 सेमी (एक फुट) अश्याप्रकारे राखावयाचे झाल्यास पेरणीपुर्वी शेतात प्रत्येक साडेचार फुटावर सऱ्या पाडुन घ्याव्या व अशाप्रकारे तयार झालेल्या गादीवाफ्यावर दोन ओळीतील अंतर 30 से.मी. व दोन झाडातील अंतर 8 ते 10 से.मी. या पेरणीच्या अंतरानुसार मजुरांद्वारे डोबीव पध्दतीने पेरणी करावी. या पध्दतीने पेरणी केल्यास गादीवाफ्यावर सोयाबिन पिकाच्या चार ओळी बसतात.
फायदे :-
- रुंद वरंबा व सरी पध्दतीने अशाप्रकारे लागवड व्यवस्थापन केल्यास मिळणाऱ्या फायद्यांच्या माध्यमातुन उत्पादनात भरीव वाढ शक्य होते. गादीवाफ्यावर पेरणीकेल्यामुळे पिकाची एकसारखी वाढ शक्य होते. सुर्यप्रकाशाचे वितरण पिकाला एकसमान होते, पिक व शेत सदैव वाफस्यावर राहते, पिकाच्या बुडाशी पाणी साचत नाही, पावसाच्या पाण्याचे मुलस्थानी संवर्धन शक्य होते, ओलीताची सोय असल्यास दांडाद्वारे अथवा स्प्रिंकलरच्या सहाय्याने ओलीत करता येते, शेतात हवा खेळती राहते, पिकाची निगराणी निरीक्षण योग्यरित्या करता येते, फवारणी सुलभरीत्या करता येते, कीडी व रोगांचा प्रादुर्भाव कमीत – कमी राखता येतो.
तोटे :-
- झाडांची संख्या कमी होते.
- पेरणीच्या मजुरीखर्चात वाढ होते.
सुधारीत पेरणी पध्दत :- उभी – आडवी पेरणी
प्रचलीत पध्दतीने म्हणजेच बैलजोडी अथवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने सोयाबिनची पेरणी करतांना, उभी – आडवी पेरणी पध्दतीने करावयाची झाल्यास शेताच्या एका दिशेने (समजा पुर्व – पश्चिम) सोयाबिनचे अर्धे (15 किलो) बियाणे पेरावे. अर्धे बियाणे (15 कीलो) यांच्या विरुध्द दिशेने (म्हणजेच उत्तर – दक्षिण) याप्रमाणे पेरणी करावी. म्हणजेच शेतात पिकाची चौकोन पध्दतीने पेरणी होईल. यापध्दतीमध्ये सोयाबिन पिकाच्या उत्पादनात शाश्वत वाढ शक्य होते, परंतू आंतरमशागत म्हणजेच डवऱ्याचे देता येत नाही तसेच निंदणाच्या वेळी सुध्दा अडचणी निर्माण होतात. त्यामुळे शेतकऱ्याला पुर्णपणे तणनाशकांवर निर्भर रहावे लागते. याच प्रमाणे फवारणी करतांना, ओलीत करतांना तसेच कापणीच्या वेळी सुध्दा अडचणीची स्थिती निर्माण होते.
प्रा.जितेंद्र दुर्गे
सहयोगी प्राध्यापक (कृषिविद्या)
श्री शिवाजी कृषिमहाविद्याल,अमरावती
मो.नं.9403306067