राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला

0

उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील वातावरणावर झाला असून राज्यातही गारठा वाढला आहे. कृषी विद्यापीठ येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ५.१ अंश, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली .परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आवारात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा घसरला.

मुंबई (सांताक्रुझ) १६.० (-२), ठाणे १८.०, अलिबाग १६.५ (-२), रत्नागिरी १८.३ (-२), डहाणू १६.६ (-२), पुणे ९.२ (-२), नगर ८.१, जळगाव ९.० (-३), कोल्हापूर १४.५ (-१), महाबळेश्वर ११.३ (-२), मालेगाव १०.२(-१), नाशिक ८.४ (-२), निफाड ६.५, सांगली १२.६ (-२), सातारा ९.०(-४), सोलापूर १२.१ (-३), औरंगाबाद ९.२ (-२), बीड १०.१ (-३), परभणी ७.६ (-३), परभणी कृषी विद्यापीठ ५.१, नांदेड १०.० (-३), उस्मानाबाद ११.४ (-२), अकोला ९.६ (-४), अमरावती १२.५ (-२), बुलडाणा ११.० (-३), चंद्रपूर ९.६ (-३), गोंदिया ७.८ (-४), नागपूर ८.६ (-४), वर्धा १०.० (-३), यवतमाळ ८.५ (-६).

हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यांमध्ये हिमवृष्टी होत आहे. यामुळे उत्तर भारतातील थंडीची तीव्र लाट आल्याने मध्य प्रदेशातील पंचमढी येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने काही ठिकाणी थंड दिवस अनुभवाला येत आहेत. यामुळे दिवसभर पडणारे ऊन देखील ऊबदार वाटत आहे.

पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा राज्यातही थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.  उत्तर भारतातील थंडीने राज्यातील अनेक भागात जम बसविण्यास सुरूवात केली आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत असून, काही भागात तापमानात एक ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.

सध्या उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातही कडाका वाढू लागला आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठापाठोपाठ परभणी शहरात ७.६ अंश, यवतमाळ येथे ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, नगर, जळगाव, नाशिक, सातारा, औरंगाबाद येथे तापमानाचा पारा १० अंशापेक्षा खाली घसरला आहे.

राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. विदर्भात ८ ते १२ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. तर मराठवाड्यात ५ते ११, मध्य महाराष्ट्रात ८ ते १४, कोकणात १६ ते १८ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली.

Leave a comment