सागवृक्ष लागवड व संवर्धन माहिती
साग झाडाची लागवड दोन पद्धतीने करता येते.
१)सागजडी लावून २)पिशवीत रोपांची लागवड करून
सागजडी लावून लागवड करताना रोपवाटिकेतून रोपे काढून सागजडी तयार केल्यानंतर शक्यतो लगेच लागवड करावी. जडी तयार केल्यापासून ८ ते १० दिवसांतच लावावी. सागाची जडी लावताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीत जोवर ऊब आहे तोवरच लागवड करावी लागवड करताना प्रथम लागवड क्षेत्रात पहारीने जडीच्या उंचीची छिद्रे करावीत खोडाचा भाग जमिनीच्यावर ठेवून मुळांचा भाग जमिनीत लावावा. नंतर आजूबाजूची माती पक्की दाबावी सागजडीच्या तळाशी व आजूबाजूस पोकळी राहून पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी
जातींची निवड
भारतीय साग, ऑस्ट्रेलियन साग (आकेशिया मॉंजियम) आफ्रिकन साग बर्मासाग आणि पांढरा साग (शिवण) अशा सागवानाच्या विविध लागवडीयोग्य जाती आहेत, त्यांपैकी भारतीय आणि ऑस्ट्रेलियन साग अधिक प्रचलित आहे भारतीय सागाची लागवड केल्यास तो कापणीयोग्य होण्यासाठी २५ ते ३० वर्षे लागतात. ऑस्ट्रेलियन साग लागवडीपासून १२ ते १५ वर्षांमध्ये तयार होतो, त्यामुळे या जातीची लागवड अधिक फायदेशीर ठरते. या दोन्ही जातींच्या झाडांच्या लाकडाचा दर्जा चांगला असतो.
पिशवी रोपांची लागवड करण्यापूर्वी खड्डा भरताना पोयट्याची माती, १ ते २ घमेली चांगले कुजलेले शेणखत व पाण्याचा निचरा होण्यात अडथळा असेल तर काही प्रमाणात वाळू घालून खड्डा भरावा. सागातील २ रोपांमध्ये, त्याचप्रमाणे २ ओळींमध्ये किती अंतर असावे हे प्रजाती जमिनीचा प्रकार, विरळणीचा प्रकार आंतरपिके या गोष्टी लक्षात घेऊन ठरवावे.
जास्त अंतरावर साग लागवड केली तर त्यामध्ये अन्नधान्यांची पिके घेता येणे शक्य होते. सागामध्ये आंतरपिके घेताना जमिनीचा मगदूर, रोपांमधील अंतर, पाण्याची व्यवस्था, ऋतुजैविकी इत्यादी बाबी लक्षात घ्याव्यात. सागाच्या झाडांमध्ये सोयाबीन, मालदांडी ज्वारी, बाजरी यांचे आंतरपीक घेता येते, कारण ही पिके कमी कालावधीत तयार होतात, तसेच भाजीपाला पिकांमध्ये वांगी मिरचीची लागवड करता येऊ शकते.
सागाची शेती फायद्याची
सागाचे लाकूड बांधकामासाठी सर्वात मजबूत समजले जाते. यामुळे घरातील लाकूडसामानापासून अगदी घराच्या वाशापर्यंत या सागाच्या लाकडाला सर्वाधिक मागणी मिळते
सागवानाचे गुणधर्म
सागाचे विशेष गुणधर्मामुळे चंदनानंतर सागाचे लाकूड मुल्यवान आहे. हे लाकूड अतिशय टिकाऊ आहे. वाळवी, बुरशी व हवामानाचा या लाकडावर परिणाम होत नाही. हे लाकूड दुभागत नाही. भेगा पडत नाहीत. लाकडावर काहीही परिणाम होत नाही. अनेक कामांसाठी या लाकडाचा उपयोग होतो. अनेक शतके या लाकडाचा उपयोग जहाजाचे बांधकामात होतो. सागाच्या झाडाचे औषधी गुणधर्म आहेत. फुलांचा उपयोग पित्त ब्रांकायटीस लघवीचे विकारावर होतो. बियामुळे लघवी साफ होते. पानातील अर्कामुळे क्षयरोगाचे सूक्ष्म जंतू वाढण्यास प्रतिबंध होतो. पानापासून लाल किंवा पिवळा रंग मिळतो त्याचा उपयोग सुती,रेशीम,लोकरीचे कापड रंगविण्यासाठी होतो. सागाची पाने फार मोठी असल्याने त्यापासून पत्रावळ्या व द्रोण बनविता येतात. शिवाय या पानापासून भाताचे शेतात काम करणारे मजूर पावसापासून स्वसंरक्षणासाठी ‘इरले’ तयार करतात. झोपडी साकारण्यासाठी या पानांचा उपयोग होतो. सालीची औषधी उपयोग ब्रान्कायटीसमध्ये होतो. सालीपासून ऑक्झालीक अॅसिड वेगळे काढतात. लाकडाच्या भुशापासून प्रभावित कोळसा बनवितात.
सागाचे लाकूड हे बांधकामासाठी सर्वात मजबूत समजले जाते. यामुळे घरातील लाकूडसामानापासून ते अगदी घराच्या वाशापर्यंत या सागाच्या लाकडाला सर्वाधिक मागणी मिळते. या लाकडाचे महत्त्व पाहता त्याची व्यावसायिक लागवड आर्थिकदृष्टया फायद्याचीच ठरेल.
सागाची लागवड
लागवड पडीक डोंगर उताराला केल्यास यातून शेतक-यांना चांगला नफा मिळू शकतो. सागाच्या झाडांची लागवड केल्यास भविष्यात त्यांच्यासाठी मोठा आर्थिक स्रेत उपलब्ध होऊ शकेल.इमारती, फर्निचर व औद्योगिक अशा नित्योपयोगी वस्तूंसाठी सागाच्या लाकडाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. लाकडाचा आकर्षक रंग व त्यात असलेला चिवटपणा, तासकामासाठी उत्तम, पाण्यात अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता आदी गुणधर्मामुळे सागाच्या लाकडास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
जमीन
सागाच्या झाडाच्या वाढीसाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ उत्तम असतो. जमिनीचा सामू ६ पेक्षा कमी असलेल्या जमिनीत ही झाडे दिसत नाहीत. तसेच सामू ८.५ पेक्षा अधिक असलेल्या जमिनीत या झाडांची वाढ चांगली होत नाही. या झाडांना विशेषता जांभ्या खडकाची जमीन मानवत नाही. या जमिनीतील सागाची झाडे खुरटी राहतात. पण इतर खडकाच्या जमिनीत जांभ्या खडकाची जमीन मिसळलेली असल्यास ही झाडे वाढतात. तसेच या झाडांना कापसाची काळी जमीन मानवत नाही. चुन्याच्या खडकाचे खोल पोयटा जमिनीत रूपांतर झालेले असल्यास ही झाडे जमिनीत चांगली वाढतात. तथापि, चुन्याच्या टणक खडकातील उथळ जमिनीत या झाडांची वाढ कमी होते. झाडांची चांगली वाढ
जमिनीची खोली, जमिनीतील ओलावा पाण्याचा निचरा सुपिकता यावर अवलंबून असते ही झाडे मऊ वाळूच्या खडकात पोयट्याच्या जमिनीत चांगली वाढतात.
लागवडीच्या पद्धती
१) बियांची पेरणी : मध्य प्रदेशचे काही भागात व उत्तर महाराष्ट्रात शेतातील खड्ड्यात सागाचे बी पेरतात. एका खड्ड्यात २ किंवा ३ बिया टोकतात. पण या पद्धतीत सागाची बारीक रूपे मरतात व अनेक ठिकाणी गॅप (तुटाळ) पडतात.
२) रोपांची / कलमांची लागवड : महाराष्ट्र, मध्य प्रदेशात काही भाग व ओरिसातिल शेतात सागाची रोपे लावतात. सागाची रोपे रानात (टोपलीत) तयार करतात किंवा नर्सरीतून आणतात. ही रोपे ३ – ४ महिने वयाची आणि ३० सें.मी. उंच वाढलेली शेतात लागवडीसाठी योग्य होतात.
३) खोड स्टम्पांची लागवड : नर्सरीतील एक वर्ष वयाचे जोमदार व निरोगी रोपापासून स्टम्प तयार करतात. याकरिता योग्य नसलेली रोपे वाफ्यात जागीच वाढू देतात. पुढील वर्षी या रोपापासून स्टम्प तयार करतात. लागवडीसाठी निवडलेल्या स्टम्पच्या मुळ्या सरळ असाव्यात. दुभागलेल्या नसाव्यात. सिंचनाकरिता पाणी उपलब्ध असल्यास १५ महिन्याच्या रोपापासून स्टम्प तयार करता येतात. जेथे नर्सरीची सोय नाही अशा भागात असे २ वर्षाच्या रोपापासून स्टम्प तयार करावे लागतात.
सागाचे रोपातील / कलमातील अंतर :
सागाच्या झाडातील अंतर अनेक बाबींवर अवलंबून असते. सागाच्या शुद्ध बियांची प्रत उत्तम असल्यास आणि जमीन हलकी असल्यास झाडातील अंतर कमी ठेवावे. तथापि, उत्कृष्ट प्रतीचे लाकूड मिळण्यासाठी सागाच्या दोन ओळींतील अंतर ४ मीटर आणि दोन झाडांतील अंतर २ मीटर ठेवावे. म्हणजे एक हेक्टर जमिनीत १२५० सागाची झाडे लागवड करता येतात. सामान्यपणे सुरुवातीला सागाच्या शेतातील रोपातील १.८ x १.८ मीटर अंतर योग्य मानतात. प्रयोगात ३.६ मीटर x २.७ मीटर आणि ३.६ मीटर x ३.६ मीटर या अंतरावर लागवड केल्याचे आढळून आले आहे. जास्त व मध्यम पावसाच्या (१५०० मि. मी. पेक्षा अधिक) प्रदेशात रोपातील अंतर २.५ x २.५ किंवा २.७ x २.७ मीटर ठेवल्याने वाढ जलद होते आणि झाडाचा मुकुट लवकर तयार होतो.या झाडाची लागवड ही
कायमस्वरूपी उत्पन्न देणारी आहे. एकदा लागवड केल्यानंतर साग तयार झाल्यावर त्याचे तोडकाम केल्यास जुन्या खोडास पुन्हा धुमारे येतात. यामुळे त्याचे उत्पन्न वर्षानुवर्षे मिळत राहते. अशा स्थितीत मागणी जास्त, मात्र उत्पादन कमी असलेल्या सागाला दरही चांगला मिळतो. या दृष्टीने शेतक-यांना पडीक जमिनीत सागाची लागवड करून काही वर्षानी भरघोस आर्थिक उत्पन्न मिळू शकते.
सागलागवडीसाठी साधारण उष्ण, दमट हवामान आवश्यक असते. अशा हवामानात सागाची वाढ चांगल्या प्रकारे होते. १० ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान सागास मानवते. सागाच्या लागवडीसाठी थोडी-फार चढउताराची, पाण्याची योग्य निचरा होणारी जमीन असेल तर ती योग्य समजावी. सागाची लागवड बियाणे पेरून, रोपाची लागवड करून किंवा खोडमूळ (स्टम्प) लावून करता येते.
हवामान
सागाच्या झाडांच्या वाढीसाठी तेजस्वी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. या झाडांना पाणथळ जमीन सहन होत नाही किंवा जमिनीतील क्षारांचे जास्त प्रमाण मानवत नाही. वार्षिक १००० ते १५०० मि.मी. पर्जन्यमानाचे प्रदेशात दक्षिणेतील उष्ण, दमट पानझडीचे जंगलात वाढतात. या झाडांना जून ते ऑगस्ट महिन्यात फुले लागतात, तेव्हा हि झाडे सुंदर दिसतात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यांत झाडांची पाने गळतात तेव्हा जंगलातील जमिनीवर वाळलेल्या पानांचा दाट थर जमलेला असतो. पावसाळ्यात ही पाने कुजून झाडांना नैसर्गिक खत मिळते. पानांमुळे पावसाने जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध होतो.
दमट प्रदेशात फार कमी होते. तर निमकोरड्या प्रदेशात पुरेशी होते. सागाच्या बियांवरील कवच मऊ करून अंकुर येण्यास सुलभ करण्यासाठी पावसाळय़ात मोकळय़ा जागेत बियाणे पसरून दररोज खालीवर करावे लागते. ४ ते ६ आठवडय़ांनंतर बियांवरील कवच मऊ होऊन बी रुजण्यास मदत होते.
यानुसार जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर २ बाय २ मीटर अंतरावर ३० बाय ३० बाय ३० सेंमी आकाराचे खड्डे खोदून त्यामध्ये लागवड करावी. लागवडीनंतर रोप, स्टम्पच्या बाजूला पाणी साचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
सागाची वाढ जोमाने होण्यासाठी प्रतिरोप १० ग्रॅम नत्र व १० ग्रॅम स्फुरद आळे पद्धतीने देणे गरजेचे आहे. लागवडीनंतर साधारण दोन वर्षापर्यंत पाणी देणे गरजेचे आहे. नियमित पाणी व वर्षातून तीन वेळा खत दिल्यास सागाची वाढ जोमाने होते. सागाच्या झाडाला हुमणी व प्युरा या किडी व भुरी रोगांचा प्रादुर्भाव झालेला आढळतो.या लागवडीतून आपली आर्थिक मान उंचावणे आवश्यक आहे.
काढणी व उत्पादन
सागाच्या झाडांचा मध्यप्रदेश, महाराष्ट्र, अंदमान, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ व ओरीसा राज्यांतील अभ्यास केला असता भारतात सागाचे झाडांची फेरपालट स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असते. भारतातील सागाच्या पहिल्या प्रतीच्या जागेतून (साईट) ५०, ७० व ८० वर्षे वयाच्या झाडापासून अनुक्रमे ४१७ घनमीटर, ५१० व ५३९ घनमीटर लाकूड मिळते. छातीच्या उंचीपर्यंत सागाच्या खोडाचा व्यास ६० सें. मी. असल्यास २६ मीटर, ३५ मीटर व ५० मीटर उंच झाडापासून अनुक्रमे २.१० घनमीटर, २.८६१ घनमीटर व ४.११५ घनमीटर लाकूड मिळते. थायलंडमध्ये सुपीक, खोल व पुरेसा ओलावा असलेल्या जमिनीत वाढलेल्या ६० वर्षे वयाच्या सागाच्या झाडाच्या खोडाचा घेर २.१३ मीटर असतो. जावामधील सागाच्या जंगलात ८० वर्षांची फेरपालट रूढ आहे. सागाचे लाकूड (टिम्बर) व सागाचे खांब यांची प्रतवारी केरळ राज्यात पुढीलप्रमाणे करण्यात येते.
लाकडाचे वर्गीकरण
पहिला वर्ग : लाकडाचा घेर १५० सें. मी. व त्यापेक्षा अधिक आणि लांबी ३ मीटर व त्यापेक्षा अधिक.
दुसरा वर्ग : लाकडाचा घेर १०० ते १४९ सें. मी. आणि लांबी ३ मीटर किंवा त्यापेक्षा अधिक
तिसरा वर्ग : लाकडाचा घेर ७६ ते ९९ सें. मी. आणि लांबी ३ मीटर व त्यापेक्षा अधिक.
चौथा वर्ग : लाकडाचा घेर ६० ते ७५ सें.मी. आणि लांबी ३ मीटर व त्यापेक्षा अधिक.
लेखक : प्रविण सरवदे, कराड
महत्वाच्या बातम्या : –
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना: इथं क्लिक करून पाहू शकता 7.5 HP पंपाचे वेंडोर सिलेक्शन
नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अनुदान देणार – अजित पवार
काका पुतण्याच्या जोडीनं अनोखा प्रयोग करत पनवेलमध्ये केली स्ट्रॉबेरीची शेती
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांना पाठवण्याची तयारी सुरु
तब्बल १ हजार ९५ शेतकऱ्यांच्या शेतात लावण्यात आले साैरकृषीपंप