सोयाबिन उत्पादन वाढीची सप्तसुत्रे

0

सोयाबिन पिकाच्या उत्पादनवाढीसाठी जैविक संवर्धकांची बिज प्रक्रिया, सुधारित पेरणी पध्दतीचा अवलंब, रासायनिक खतांचा समतोल वापर, एकात्मिक तण व्यवस्थापन, मुलस्थानी पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, ओलीत व्यवस्थापन, कीडी व रोगांचे व्यवस्थापन, योग्य वाणांची निवड या सप्तसुत्रीला अनन्य साधारण महत्व आहे. या सप्तसुत्रीद्वारे सोयाबिन पिकाच्या समस्या कमी होऊन उत्पादकतेत वाढ शक्य होते.

जैविक संवर्धकाची बीज प्रक्रीया :-

सोयाबीन बियाण्याला पेरणीपुर्वी जैविक संवर्धकांची बीज प्रक्रीया न चुकता करावी या करीता द्रवस्वरुपातील रायझोबियम कल्चर 5 मीली , द्रवस्वरुपातील पीएसबी कल्चर 5 मीली, द्रवस्वरुपातील ट्रायडोकर्मा कल्चर 5 मीली व उपलब्ध झाल्यास द्रवस्वरुपातील केएसबी कल्चर 5 मीली या प्रमाणे प्रति किलो बियाण्याला पेरणीपूर्वी साधारण : अर्धा तास अगोदर बीज प्रक्रीया करुन,योग्य प्रकारे बियाणे सावलीत सुकवल्यानंतर लगेचच पेरणी करावी.

सुधारित पेरणी पध्दतीचा अवलंब :-

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्याजवळ पेरणीसाठी उपलब्ध संसाधनांचा उपयोग करुन म्हणजेच बैलजोडी चलीत पेरणीयंत्र, टॅक्ट्ररचलीत पेरणीयंत्र, वापरुन सोयाबीनची पेरणी सुधारित पध्दतीने केल्यास उत्पादनात वाढ शक्य होते. याकरीता जोडओळ पेरणी पध्दत, सोडओळ पेरणी पध्दत (पट्टापेर पध्दत) चा अवलंब करावा. याद्वारे सोयाबिन पिकाच्या जवळपास सर्वच समस्या कमी घेऊन उत्पादनात वाढ शक्य होते.

जोडओळ पेरणीपध्दत :-

याकरीता सोयाबिनचे दोन ओळीतील अंतर दिड फुट (45 सेमी) ऐवजी एकफुट (30 सेमी) राखावे व प्रत्येक तिसरी ओळ खाली ठेवावी. म्हणजेच प्रत्येक जोडओळीनंतर 60 सेमी (दोन फुट) जागा खाली राहुनसुध्दा, ओळींच्या तसेच झाडांच्या संख्येत बदल न होता उत्पादनात वाढ शक्य होते.

सोड ओळ पध्दत :-

याकरीता सोयाबिनची पेरणी करतांना प्रत्येक तिन ओळीनंतर चौथी ओळ अथवा चौथ्या ओळीनंतर पाचवी ओळ खाली ठेवावी म्हणजे शेतात तिन – तिन अथवा चार – चार ओळींचे पट्टे तयार होतात. या पध्दतीमध्ये ओळींची संख्या काही प्रमाणात कमी होवून सुध्दा उत्पादनात वाढ शक्य होते.

जोड ओळ किंवा सोड ओळ पध्दतीने अशा प्रकारे सोयाबीनची पेरणी केल्यानंतर डवऱ्याच्या सहाय्याने डवऱ्याच्या फेराच्या वेळी खाली ठेवलेल्या ओळींच्या ठिकाणी केवळ एका डवऱ्याच्या सहाय्याने, डवऱ्याच्या जानोळयाला दोरी गुंडाळून त्याठिकाणी गाळ पाडुन घ्यावा.

म्हणजेच शेतातील जोड ओळी अथवा तिन ओळींचे किंवा चार ओळींचे पट्टे आपोआपच गादीवाफ्यावर येऊन डवऱ्याच्या फेराच्या पश्चात शेतात पडणारे पावसाचे पाणी सरीमध्ये साचते, मुरते व जागच्या जागी जीरते व अशाप्रकारे मुलस्थानी पावसाच्या पाण्याचे संवधर्वन शक्य होऊन सोयाबिन पिकासाठी शेवटपर्यंत जमिनीतील ओल टीकवून ठेवण्यास मदत होते.पावसाच्या पाण्याचे मुलस्थानी संवर्धन या अत्यंत महत्वपूर्ण फायद्या सोबतच इतरही फायदे शेतकऱ्याला होतात. या पेरणी पध्दतीद्वारे शेतकऱ्याला शेतात फेरफटका मारण्यास जागा उपलब्ध होते.

पिकाची निगराणी व निरिक्षण शक्य होते, वेळेत फवारणी शक्य होते, पिकाची एकसारखी वाढ होते, पावसात मोठा खंड पडल्यास व ओलीताची सोय असल्यास सऱ्यांद्वारे पटपाणी देता येते अथवा स्प्रिंकलरचे पाईप टाकण्यास जागा उपलब्ध होऊन तुषार सिंचन संचाद्वारे पाणी देता येते, शेतात हवा खेळती राहते, पिकाला सुर्यप्रकाशाचे वितरण एकसमान होऊन अवास्तव वाढ होत नाही, जोड अथवा पट्टापेर पध्दतीमध्ये दोन्ही बाजुला खाली जागा असल्यामुळे “बॉर्डर इफेक्टच्या” माध्यमातुन उत्पादनात वाढ शक्य होते.

रासायनिक खतांचा समतोल वापर :-

सोयाबिन पिकाचे रासायनिक खतांचे व्यवस्थापन करतांना पेरणीचे वेळी प्रति एकर साधारणत: अर्धा बॅग युरिया, साधारणत: पावणेचार बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, आवश्यक असल्यास अर्धा बॅग म्युरेट ऑफ पोटॅश तसेच साधाणत: 8 -10 कीलो झिंक सल्फेट द्यावे. सोयाबिनचे पिक कळी अवस्थेला येतांना 2% युरयाची (म्हणजेच 10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम युरीया) तसेच शेंगामध्ये दाणे भरतांना 1% – 13:00:45 (म्हणजेच 10 लिटर पाण्यात 100 ग्रॅम 13:00:45) अथवा 2 % डीएपी (म्हणजेच 10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम डीएपी) याप्रमाणे फवारणी करावी.

एकात्मिक तण व्यवस्थापन :-

तणे सोयाबिन पिकासोबत तिव्र स्पर्धा करतात व याद्वारे होणारी उत्पादनातील घट 25 ते 30 टक्यांपासून ते 85 टक्यांपर्यंत राहु शकते. त्यामुळे एकात्मिक तण व्यवस्थापनाचा पर्याय योग्य ठरु शकतो. याकरिता पेरणी झाल्याबरोबर लगेचच त्याच दिवशी अथवा पेरणीच्या दुसऱ्या दिवशी पेंडामेथिलीन या तणनाशकाची 50 मीली प्रति 10 लिटर,पाण्यात याप्रमाणे फवारणी करावी.

सोयाबनिचे पिक साधारणत: 22 -25 दिवसांचे झाल्यांनतर मजुरांद्वारे निंदण करुन घ्यावे व त्यांनतर आवश्यक्तेनुसार एक किंवा दोन डवऱ्याचा फेर द्यावे. सोयाबिन पिक व त्यामधील तणे यामध्ये तिव्र स्पर्धेचा काळ हा सुरुवातीचे 35 -40 दिवसांचा कालावधी असतो. त्यामुळे यादरम्यान शेत तणविरहीत राखणे अत्यंत गरजेचे असते. पिक फुलोऱ्यात आल्यानंतर डवऱ्याचा फेर देऊ नये.

मुलस्थानी पावसाच्या पाण्याचे सवर्धन व ओलीत व्यवस्थापन :-

जोडओळ पेरणी पध्दत तसेच पट्टापेर पध्दतीच्या अवलंबातुन मुलस्थानी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे शक्य होते. ओलीताची व्यवस्था असल्यास, पावसात मोठा खंड पडल्यास व जमीनीस भेगा पडल्यास पिक कळी अवस्थेत येतांना तसेच शेंगामध्ये दाणे भरतांना ओलीत द्यावे.

किडी व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन :-

सोयाबिन पिकावर प्राथमिक अवस्थेत केसाळ अळीचा प्रादुर्भाव व फुलोर अवस्थेपासुन चक्रीभंुगा, खोडअळी (खोडमाशी), उंटअळी, तंबाखुची पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव होतांना आढळतो. यासोबतच पानांवरील व शेगांवरील तांबेरा या बुरशीजन्य रोगाचा सुध्दा प्रादुर्भाव होतांना आढळतो. त्याकरिता सोयाबिनचे पिक कळी अवस्थेला येतांना 5% निबोंळी अर्कांची फवारणी (10 लीटर पाण्यात 50 मीली याप्रमाणे), त्यानंतर 12-13 दिवसांनी कलोरोपायरिकॉस 20 मीली + मँकोझेब (एम -45) – 25 ग्रॅम +200 ग्रॅम युरीया प्रति 10 लिटर पाण्यात याप्रमाणे दुसरी फवारणी व यानंतर 12-13 दिवसांनी ट्रायझोकॉस 20 मीली + कार्बेनडॅझिम 10 ग्रॅम + 100 ग्रॅम 13:00:45 प्रति 10 लिटर पाण्यात याप्रमाणे तिसरी फवारणी करावी. याद्वारे सोयाबिन पिकावरील किडी, अळया व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमीत कमी राखण्यात मदत होऊन नुकसानीची पातळी कमी राखण्यास मदत होते.

जैविक बुरशीच्या माध्यमातुन कीडी व अळयांचे व्यवस्थापन :-

सोयाबिन पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या रस शोषण करणाऱ्या कीडी तसेच अळयांचा बंदोबस्त जैविक बुरशीच्या माध्यमातुन करता येते. रसशोषण करणाऱ्या कीडीपैकी सामान्यत: पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव सोयाबिन पिकावर होतांना आढळतो. त्याकरीता शेंगा धरण्याच्या अवस्थेत असतांना व्हीर्टीसिलीयम या उपयुक्त जैविक कीडनाशक बुरशीची फवारणी साधारणत: 40 मिली + 10 मिली स्टीकर प्रति 10 लिटर पाण्यात याप्रमाणे करावी.

सोयाबिन पिकावर साधारणत: फुलोरअवस्थेपासून पुढे उंटअळी तसेच तंबाकुची पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव होतांना आढळतो. त्याकरिता पिक फुलोऱ्यात येतांना बिव्हेरीया बॅसियाना या उपयुक्त जैविक अळी नाशक बुरशीची फवारणी साधारणत: 40 मिली + 10 मिली स्टीकर प्रति 10 लिटर पाण्यात या प्रमाणे करावी.
वरिल उपयुक्त जैविक बुरशीची फवारणी कीडी अथवा अळयांच्या प्रादुर्भावाच्या अवस्थेत स्वतंत्ररित्या करावी. यासोबत कुढलेही रासायनिक कीटकनाशक अथवा बुरशी नाशक मिसळु नये.

योग्य वाणाची निवड :-

पुणे वेधशाळा तसेच हवामान शास्त्रज्ञांच्या भाकीतानुसार खरिपातील पावसाळा कसा राहणार याचा अंदाज घेऊन योग्य कालावधीच्या वाणाची निवड करावी. त्यानुसार कमी पावसाचे भाकीत असल्यास कमी कालावधीच्या एमएसीएस-71, जेएस -93-05, जेएस 95-60 या वाणांची निवड करावी. पावसाचे भाकीत समतोल व योग्य असल्यास जेएस-335, फुले कल्याणी, एनआरसी-37 या वाणांची निवड करावी. ओलीताची सोय असल्यास फुले अग्रणी या वाणाची निवड करावी. डॉ. प.दे.कृ.वि. अकोला अंतर्गत पि.के.व्ही. यलो गोल्ड ( एएमएस-1001) हे वाण सुध्दा नुकतेच प्रसारीत झाले आहे. बियाणे उपलब्ध झाल्यास या वाणाची निवड शेतकरी लागवडीसाठी करु शकतात.

प्रा. जितेंद्र दुर्गे मो. नं. 9403306067
श्री. शिवाजी कृषि महाविद्यालय अमरावती
प्रा. हेमंत डीके
प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती

Leave a comment