पेरू लागवड पद्धत

0

हवामान-

पेरूची लागवड प्रामुख्याने उष्ण व समशीतोष्ण कटिबांधाच्या प्रदेशामध्ये केली जाते. कमाल व किमान उष्ण तापमानात फरक असलेल्या कोरड्या व उष्ण हवामानाच्या प्रदेशामध्ये पेरूचे उत्पादन चांगले येते. जास्त उष्णतामान असलेल्या प्रदेशापेक्षा हिवाळ्यामध्ये अधिक थंडी असलेल्या प्रदेशात फळांची गुणवत्ता अधिक चांगली राहते. जास्त पावसाच्या तसेच दमट हवामानाच्या भागामध्ये देवी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. तसेच ज्या भागामध्ये धुके अधिक पडते तेथे पेरूची लागवड करणे शकयतो टाळावे. पेरूचे झाड काटक तसेच पाण्याचा ताण सहन करणारे असल्याने दुष्काळी भागात देखील बाग पाण्याचा ताण सहन करते.

जमीन-

पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या, हलक्या मध्यम ते काळ्या जमिनीत पेरूची लागवड करावी. दीड ते दोन फूट खोल काळ्या व त्याखाली मुरुमाचा थर असलेल्या जमिनीत पेरूची लागवड यशस्वी होऊ शकते. हलक्या जमिनीत लागवड केल्यास जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. सर्व साधारण जमिनीचा सामू ५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. चुनखाडीच्या, पाण्याचा निचरा न होणाऱ्या चोपण जमिनीत पेरूची लागवड करणे टाळावे.

सुधारित जाती-

पेरूच्या गरावरून दोन जाती आढळून येतात. एक म्हणजे पांढऱ्या गराचा सफेद पेरू आणि दुसरा लाल गारच गुलाबी पेरू. सफेद पेरू गोडीला जास्त चांगला असून तो लोकप्रिय आहे. काही जाती प्रादेशिक नावावरून ओळखल्या जातात.

१) तैवान मध्ये पिंक व सफेद
२) ललित
३ ) अर्का किरण
४) G विलास
५ ) अलाहाबाद सफेदा
६) V N R
७) सरदार पेरू/ लखनौ ४९
८) लखनौ ४६
९) नाशिक
१०) धारवाड
११) ढोलका

खत:

लागवडीनंतर लहान झाडांची जोमाने वाढ, निमेटोड व मरमुक्त करण्याच्या हेतूने 30-40 दिवसाला आशिर्वाद अर्थप्लस 10लिटर प्रती 400 झाड प्रमाने आळवणी करावी.
फळे घेण्यास सुरुवात करेपर्यंत खालील प्रमाने खते द्यावीत. त्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे असावे.

१) एक वर्षाच्या झाडास ५ ते ६ किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि 2किलो भुसम्राट सेंद्रिय खत द्यावे.

२) दुसऱ्या वर्षी झाडास १० ते १२ किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि 4कि.भुसम्राट सेंद्रिय खत द्यावे.

३) तिसऱ्या वर्षी १५ ते १८ किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि 5कि.भुसम्राट सेंद्रिय खत द्यावे.

४) चौथ्या वर्षी २० ते २५ किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि 6कि.भुसम्राट सेंद्रिय खत द्यावे.

५) पाचव्या वर्षी तसेच त्यापुढील प्रत्येक वर्षी २५ ते ३० किलो शेणखत/कंपोस्ट खत आणि 7कि. भुसम्राट सेंद्रिय खत वापरावे.

वरील खते वापरताना ती खोडाभोवती बांगडी पद्धती ने गाडून द्यावीत. खत दिल्यानंतर बागेस पाणी द्यावे.

पाणी –

पेरूची झाडे लहान असताना पाण्याच्या पाळीतील अंतर कमी ठेवावे. पाण्याच्या पाळीतील अंतर वाढल्यास एकदम जादा पाणी देण्यापेक्षा अंतर कमी ठेवून बेताने पाणी द्यावे. दिलेल्या पाण्याचा झाडांना योग्य उपयोग व्हावा. याकरीता खोडाभोवती आळी किंवा वाफे बांधून घ्यावेत. वाफ्यात किंवा आळ्यात दिलेले पाणी खोडाला लागू नये म्हणून खोडाभोवती मातीचा उंचवटा करावा. बागेस उन्हाळ्यामध्ये १० ते १५ दिवसांच्या अंतराने तर हिवाळ्यात १५ ते २० दिवसांच्या अंतराने आणि पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावे. बहार धरल्यानंतर फुले निघाल्यापासून फळे तयार होईपर्यंत आणि विशेषत: फळे पोसण्याच्या काळामध्ये बागेस पाणी वेळेवर नियमित द्यावे. फळांची काढणी झाल्यानंतर दुसऱ्या बहाराची फुले लागेपर्यंत गरजेपुरतेच पाणी द्यावे.

बहार धरणे-

पेरूला वर्षातून ३ वेळा बहार येतो. बहाराची फुले जून, ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्यात येतात. जूनमध्ये फुले येणार्या बहाराला मृग बहार तर जानेवारी महिन्यात फुले येणाऱ्या बहाराला आंबेबहार म्हणतात.
स्थानिक परिस्थिती आणि मार्केटचा अभ्यास करून वर्षातून एकच बहार घेतल्याने उत्पादन अधिक चांगल्या प्रतिचे मिळते. तसेच पाणी तोडणे, पाणी देणे, मशागत करणे रोगराईचा बंदोबस्त करणे इ. गोष्टी सुलभतेने करता येतात. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केला असता ‘मृग बहार’ धरणे किफायतीशीर ठरते. मृग बहाराची फळे धरण्यासाठी बागेस फेब्रुवारी ते मे मध्ये ताण द्यावा. फेब्रुवारी ते मे उन्हाळाच असल्याने बागेस ताण देणे सोपे होते. मृग बहाराची फळे हिवाळ्यात तयार होतात. त्यामुळे फळमाशीचा उपद्रव कमी होतो. तसेच फळे चांगल्या प्रतीची मिळतात.

भारी जमिनीत ४० ते ६० दिवसांचा ताण द्यावा. हलक्या जमिनीस ३० ते ३५ दिवसांचा ताण द्यावा. पाणी तोडल्यामुळे झाडाची वाढ थांबते व पाणगळ होते. त्यामुळे झाडांना संपूर्ण विश्रांती मिळून झाडांमध्ये अन्नद्रव्याची साठवण होते आणि ह्या अन्नद्रव्याचा पुढे पाणी दिल्यानंतर फुलोरा तयार होण्यास चांगला फायदा होतो. अर्धवट पानगळ झाल्यानंतर बागेतील जमिनीची मशागत करण्याकरीता हलकीशी खाणणी किंवा नांगरणी करावी. भारी जमिनीत पानांची गळ लवकर होत नाही. म्हणून खोल नांगरणी करावी. बागेतील तण पुर्णपणे काढून जमीन भुसभुशीत करावी.

ताण देताना काळजीपुर्वक द्यावा, जर जास्त ताण दिल्यास पानगळ अधिक होऊन फुले धरणाऱ्या काड्यांची मर होते व त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. मे महिन्यात खत देऊन खोडाभोवती मातीची हुंडी करून आळी किंवा वाफे बांधणी करावी.

छाटणी (झाडांना आकार देणे) –

झाड लहान असल्यापासून त्याला वळण देणे गरजेचे असते. सुरुवातीला मुख्य खोडावरच झाडाची वाढ करून घ्यावी. त्यासाठी १ ते १।। फुटापर्यंत होणारी फूट काढून टाकावी. त्यानंतर झाडाचा गोलाकार घेर होईल अशा पद्धतीने ३ ते ४ फांद्या वाढवाव्यात. किडलेल्या किंवा वाळलेल्या फांद्या छाटाव्यात. तसेच गर्दी करणाऱ्या फांद्या आणि जमिनी लगतची फूट काढावी. जुन्या झाडांची छाटणी केल्यानंतर त्याच्यावर नवीन फूट येते व त्यामुळे त्यांना नवजीवन मिळते.

पेरूच्या झाडाला नवीन फुटीवर फुले व फळे येतात. या नवीन फुटी येण्यासाठी छाटणी करणे आवश्यकआहे. झाडांची छाटणी एप्रिल – मे महिन्यात करावी. झाडांची जास्त छाटणी केली तर उत्पादन कमी येते. मात्र फळांचा आकार, वजन व फळाची प्रत चांगली मिळते.

कीड व रोग-

पेरूची झाडे रोगमुक्त, निरोगी, हिरवीगार, टवटवीत व प्रतीकार शक्ती कायम टिकुन राहण्यासाठी आशिर्वाद दशावतार ची 15 दिवसाला फवारणी करावी, आशिर्वाद अर्थप्लस ची 30-40दिवसाला नियमित आळवणी करावी व घोलप पा. नैसर्गिक शेंद्रिय शेतीचे वेळापत्रक वापरावे.

१) साल व शेंडा पोखरणारी अळी
या किडीचा प्रादुर्भाव पेरूवर मोठ्या प्रमाणात होत असतो. विशेषत: दुर्लक्षित बागेमध्ये हा प्रादुर्भाव आढळतो. या किडीची अळी रात्रीच्या वेळी सालीच्या आतील बाजूस शिरून आतील भागावर उपजीविका करते. त्यावेळेला ती सालीच्या भुसकाटात व तिच्या शरीरातून निघणाऱ्या धाग्यापासून तयार झालेल्या जाळीत लपून बसते. या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास झाड सुकते व वाळते.
या किडीच्या नियंत्रणासाठी पेट्रोलमध्ये कापसाचा बोळा भिजवून तो बोळा तारेच्या सहाय्याने छिद्रात घालावा व वरून छिद्र चिखलाने लिंपावे.

२) पिठ्या ढेकुन : ही कीड कोवळ्या फुटीतील व फळांतील रस शोषून घेते. याशिवाय किडीच्या अंगातून स्रवणाऱ्या गंधासारख्या चिकट पदार्थांवर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे फळांची प्रत बिघडते व उत्पादनात घट येते.

३) फळमाशी :
पेरूवर या किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येतो. पुर्ण वाढ झालेली मादी. फळाच्या सालीमध्ये होल पाडून अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या फळ पोखरून गरामध्ये बसतात. त्यामुळे फळ कुजते. आल्या मोठ्या होतात तसा फळाचा कुजलेला भाग वाढत जाऊन फळे गळू लागतात.
या किडीचा प्रादुर्भाव पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात होतो.

रोग

१) पेरू फळावरील देवी रोग –
हा बुरशीजन्य रोग असून याला देवी किंवा खैऱ्या असेही म्हणतात. सतत भरपूर पाऊस व जास्त दमट हवा यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. बुरशीची वाढ फळांच्या सालीवर होत असते. हा रोग कोवळ्या, हिवाव्या फळांवर अधिक प्रमाणात आढळतो. फळांवर प्रथम रोगाचे लहान लालसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. लालसर ठिपक्यासाठी फळाची बाह्यसाल गोलाकार, करवतीसारखी फाटते व फळे तडकतात. फळावर गोलाकार काळ्या पुळ्या दिसतात. या रोगाचे व्रण फळामध्ये खोलवर रुतलेले नसतात. रोगट फळे चवीस पांचट लागतात. पक्व फळावर क्वचितच या रोगाची लागण होते. काही पानांवर देखील या रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो. जुन्या पानांवर रोगाचे लालसर तपकिरी रंगाचे वर्तुळाकार ठिपके दिसतात. या रोगाचा प्रादुर्भाव सरदार जातीच्या पेरूवर अधिक प्रमाणात होतो.

२) पाने तांबडी पडणे –
झिंक द्रव्याच्या कमततेमुळे ही विकृती आढळते. पाने लहान राहून लांबट होतात. पानांचा हिरवा रंग जाऊन पिवळसर फिक्कट चट्टे दिसतात. क्वचित पानांच्या कडा लाल होतात व त्याचे प्रमाण वाढत जाऊन संपूर्ण पान लाल पडते. त्यामुळे पाने पक्व होण्याआधीच गळून पडतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते.

३) फांद्यावरील खैऱ्या रोग –
हा बुरशीजन्य रोग असून त्याची लक्षणे फांद्यावर व सालीवर वेड्या वाकड्या आकाराचे खोलगट चट्टे दिसून येतात व साल फाटलेली दिसते. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास फांद्या सुकतात.

पेरूची काढणी –

फुले आल्यानंतर १२ दिवसांत फलधारणा होते. लहान फळे सुरुवातीला झपाट्यानने वाढतात. नंतर त्यांची वाढ थोडी मंदावते व पुन्हा जोरात वाढतात. सरदार (लखनौ – ४९) ह्या जातीचे पेरू तयार होण्यास १०५ ते १३५ दिवस लागतात. थंडी अधिक असल्यास फळे पिकण्यास वेळ लागतो. तर तापमान अधिक असल्यास ती लवकर पिकतात. लाल गर असलेल्या पेरूमध्ये सुरुवातीला ‘टॉंरटॉंरीक आम्ल’ (चिंचेसारख्या चवीचे) असते. फळ पिकताना मात्र त्यात ‘सायट्रीक आम्ल’ (लिंबूवर्गीय फळांच्या चवीसारखे) असते. सिडलेस जातीत सुरूवातीस आम्लाचे प्रमाण जास्त असते.

मात्र बियायुक्त जातीत आम्लाचे प्रमाण फळे तयार होताना जास्त असते.फळांचा गर्द हिरवा रंग जाऊन ती फळे हिरवट पिवळसर झाली म्हणजे ती तयार झाली असे समजावे, तसेच फळे पिकताना किंचीत मऊ होतात. तोडणी शक्यतो सकाळी व संध्याकाळी करावी. फळे वाहतुकीसाठी पानांनी आच्छादलेल्या टोपल्या किंवा प्लॅस्टिक क्रेटसचा वापर करावा. फळांचा मोठा ढिग न करता सावलीत पसरून लावावीत. किडलेली, डागाळलेली व खराब फळे बाजूला निवडून काढावीत. फळे तोडताना फळांना देठ ठेवू नये, त्याने फळे खराब होतात.

विक्रम घोलप
7020845477

महत्वाच्या बातम्या : –

लवकरच सुमारे अडीच कोटी सातबाऱ्याचे होणार डिजिटलायझेशन

गुच्छी मशरूमला मिळेल जीआय टॅग, त्याचे औषधी गुणधर्म काय आहे ते नक्कीच वाचा

महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी कायम

महाराष्ट्राला दिलासा; कोरोनाच्या वाढीचा वेग मंदावला

शेतकऱ्यांसाठी महत्वाचा “स्वामीनाथन आयोग” नेमका काय आहे? समजून घ्या !

Leave a comment