नियमित आंबा मोहरासाठी पॅक्‍लोब्युट्रॉझॉल

0

केसर आंब्याला देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूप चांगली मागणी आहे; मात्र या जातीस दरवर्षी नियमित स्वरूपात मोहर येत नाही. एखाद्या वर्षी मोहर खूप अधिक येतो, तर एखाद्या वर्षी साधारण येतो.

संशोधनात असे आढळून आले आहे, की आंब्याला मोहर न येण्यासाठी आंब्याच्या झाडात असलेले जिबरॅलिक ऍसिड (जीए) हे संजीवक कारणीभूत आहे. या संजीवकाचे मुख्य काम झाडाची वाढ करणे आहे. ज्या झाडांना एक वर्षाआड मोहर येतो, त्या झाडांत जीएचे प्रमाण अधिक आढळून आले आहे.

यावरून अशा जातीच्या झाडांना दरवर्षी मोहर आणण्यासाठी वाढनियंत्रकाचा वापर करण्याची कल्पना पुढे आली. झाडांची वाढ नियंत्रित करणारे घटक झाडाला योग्य प्रमाणात दिले, तर दरवर्षी नियमित मोहर येऊ शकतो हे प्रयोगाने आणि अनुभवाने सिद्ध झाले आहे. त्यामुळेच आता आंब्याच्या झाडाला नियमित मोहर आणण्यासाठी वाढनियंत्रकाचा म्हणजे पॅक्‍लोब्युट्रॉझॉलचा वापर केला जातो.

त्याचा वापर न केलेल्या झाडांच्या तुलनेत वापर केलेल्या झाडांना 30 ते 35 टक्के अधिक मोहर येत असल्याचे प्रयोगात सिद्ध झाले आहे. याचा परिणाम म्हणून आंब्याच्या उत्पादनातही तेवढीच वाढ झाली आहे. या वाढनियंत्रकाच्या वापरामुळे आंब्याला नवीन येणाऱ्या फुटव्याची लांबीही मर्यादित राहत असल्याचे प्रयोगात सिद्ध झाले आहे.

मराठवाड्यात यावर्षी पाऊस समाधानकारक असल्याने उन्हाळ्यात पाण्याची परिस्थिती चांगली राहील अशी शक्‍यता आहे. त्याचबरोबर पीक सर्वसाधारण राहील अशी परिस्थिती आहे.

वापराची योग्य वेळ

पॅक्‍लोब्युट्रॉझॉल देण्याची वेळ ही आंब्यास सर्वसाधारण मोहर येण्याच्या तीन ते साडेतीन महिने अगोदर असते. आपल्याकडे आंब्यास सर्वसाधारणतः डिसेंबर-जानेवारीत मोहर येतो. म्हणजे त्या अगोदर तीन-साडेतीन महिने हा कालावधी 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर येतो. या काळात आपल्याकडे त्याचा वापर करावा.

मात्रा

झाडाच्या एकूण विस्ताराचा व्यास मोजून त्यावर आधारित पॅक्‍लोब्युट्रॉझॉलची मात्रा निश्‍चित करता येते. साधारणपणे झाडाच्या पसाऱ्याच्या प्रति मीटर व्यासासाठी तीन मि.लि. याप्रमाणे मात्रा द्यावी. झाडाच्या विस्ताराचा व्यास (मीटरमध्ये) तीन मि.लि. पॅक्‍लोब्युट्रॉझॉल असे हे साधे गणिती सूत्र वापरून आंबा बागेतील प्रत्येक झाडासाठी मात्रा निश्‍चित करता येते.

एखाद्या झाडाला काही कारणाने त्याची मात्रा गरजेपेक्षा कमी दिली, तर झाडाला अपेक्षित मोहर लागत नाही, परिणामी अपेक्षित फळधारणाही होत नाही. एखाद्या झाडाला ही मात्रा गरजेहून अधिक दिली गेली, तर या झाडाला आखूड फूट येते, तसेच मोहराचे तुरेही आखूड आणि गुच्छात येतात. झाडाच्या फांद्यांतूनही मोठ्या प्रमाणात मोहर येतो.

देण्याची पद्धत

मात्रा निश्‍चित केल्यानंतर झाडाच्या मुळाच्या पसाऱ्यात पाणी देण्याच्या आळ्याच्या आतल्या बाजूस येथे जारवा भरपूर असतो, अशा ठिकाणी कुदळीने लहान लहान 20 सें.मी. खोलीचे जागोजागी खड्डे करावेत.

समजा झाडाच्या पसाऱ्याचा व्यास पाच मीटर असेल तर 5 × 3 = 15 मि.लि. पॅक्‍लोब्युट्रॉझॉल साधारणतः पाच लिटर पाण्यात मिसळून अशा केलेल्या खड्ड्यांत एक एक असे चार ग्लास ओतावे. त्यावर ओंजळभर शेणखत टाकून खड्डा मातीने बुजवून घ्यावा, नंतर हलके पाणी द्यावे.

हे वाढनियंत्रक साधारणपणे 15 जुलै ते 8 सप्टेंबर या पावसाळी महिन्यात देण्याची शिफारस केलेली असते, त्यामुळे ते पाण्यात वाहून जाऊ नये याचीही खबरदारी घेणे गरजेचे असते. बागेत झाडाच्या बुंध्याभोवती पाणी साचलेले असेल तर झाडांना हे वापरू नये. जमिनीत साधारणपणे ओलावा असताना ते द्यावे. आंबा बागेतील जमीन कोरडी असेल, तर त्याचा वापर केल्यावर बागेला हलके पाणी द्यावे. ते दिल्यावर पाऊस पडला तरी ते वाहून जात नाही.

वापर केलेल्या झाडांची काळजी

●पॅक्‍लोब्युट्रॉझॉल दिलेल्या झाडांना योग्य त्या प्रमाणात खतांची आवश्‍यकता असते. अशा झाडांना साधारणपणे त्यांच्या गरजेच्या निम्म्या प्रमाणात रासायनिक आणि निम्म्या प्रमाणात सेंद्रिय खते द्यावीत. या वाढनियंत्रकाचा नियमित वापर केल्याने फळांची संख्या अधिक वाढण्याची आणि आकार किंचित कमी होण्याची शक्‍यता असते, त्यासाठी अशा झाडांना शिफारशीपेक्षा दीडपट खताची मात्रा द्यावी.

●पहिल्या वर्षी पॅक्‍लोब्युट्रॉझॉल दिलेल्या झाडांना दुसऱ्या वर्षी डिसेंबर ते जून या सहामाहीत साधारणपणे 50 टक्के नवी फूट आली, तर अशा झाडावर दुसऱ्या वर्षीही याचा वापर करावा. झाडावर येणाऱ्या नवीन पालवीच्या रूपाने झाडाची वाढ होत असते, त्यामुळे अशा झाडावर वेळोवेळी येणाऱ्या नवीन फुटीचे कीड आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी तज्ज्ञांनी केलेल्या शिफारशीनुसार कीटकनाशके आणि बुरशीनाशके यांच्या फवारण्या कराव्यात.

●पॅक्‍लोब्युट्रॉझॉल देण्यापूर्वी आणि दिल्यानंतर झाडाच्या बुंध्याभोवती वाढणाऱ्या तणांचा बंदोबस्त करावा.

●फळांची काढणी पूर्ण झाल्यानंतर झाडावर वाढणारी बांडगुळे, सुक्‍या फांद्या तसेच कमकुवत आणि रोगग्रस्त फुटव्यांची छाटणी करून संपूर्ण झाडावर एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. या वाढनियंत्रकामुळे फक्त झाडाला मोहर लागण्यास मदत होते. बाकी फुटलेल्या मोहराचे, फुलांचे आणि फळांचे रक्षण करण्याकरिता तज्ज्ञांनी शिफारस केल्याप्रमाणे नियमितपणे बुरशीनाशके आणि कीटकनाशके यांचा वापर करावा.

वापराचे निष्कर्ष

हापूस, केसर, दशहरी, आम्रपाली, बैंगनपल्ली, वनराज या सर्व जाती या वाढनियंत्रकाला योग्य प्रतिसाद देत असल्याचे आढळून आले आहे. त्याच्या वापरामुळे हंगामात 20 ते 25 दिवस लवकर आणि अधिक फळधारणा होत असल्याचे सर्वच आंब्याच्या जातींत आढळून आले आहे.

आंब्याच्या जुन्या आणि दाट वाढलेल्या बागांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी, तसेच बागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ते उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी या झाडांच्या फांद्यांची ठराविक उंचीवर छाटणी करून सुमारे वर्षभरानंतर याचा वापर केला, तर अशा बागेतूनही नव्या बागेइतकेच आंब्याचे उत्पादन मिळू शकते. आंब्याच्या घन लागवडीमध्ये (5 × 5 मीटर) याचा वापर गरजेचा समजला जातो. ते दिलेल्या झाडांना हमखास व जास्त मोहर येतो, तसेच हा मोहर तीन ते चार आठवडे लवकर येतो.

महत्वाच्या बातम्या : –

नोकरीच्या मागे न लागत ‘या’ शेतकऱ्याने निवडला शेतीचा पर्याय, केली पिवळ्या रंगाच्या कलिंगडाची लागवड

कोकणात एका प्रगतशील शेतकऱ्याने केले चक्क लाल भेंडीचे संशोधन

शिंगाड्याचे औषधी उपयोग तुम्हाला माहित आहे काय ?

करडांना होणारे सर्वसाधारण आजार, लक्षणे व त्यावरील उपाय

कोंबडी आणि बदके वगळता २८० अंडी देणाऱ्या ‘या’ पक्षीचे पालन करा, मिळेल कमी किंमतीत अधिक नफा

Leave a comment