सेंद्रिय खताचे महत्व आणि प्रकार

0

सेंद्रिय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना आणि जीवनचक्रास समजून घेऊन व रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पद्धती आहे.
रासायनिक औषधामुळे जमीन कठीण म्हणजेच मृत होत चालली आहे.रासायनिक खतांचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे.शेती टिकविण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यास रासायनिक खतांवर व औषधांवर होताना खर्च वाचू शकतो कारण सेंद्रिय शेतीमध्ये खते व औषध नैसर्गिक साधनांचा वापर करून तयार करतात. त्यामुळे त्यावर खर्च अल्पशा प्रमाणात होतो. सेंद्रीय शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे शेण – गोमुत्राचा जास्त वापर करणे यामुळे वाफ्यात पाणी टिकून राहते. बैलांच्या मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते. नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते.

सेंद्रीय खतांचे वैशिष्ट्ये –

१. सेंद्रीय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन प्रक्रिया आहे.
२. मातीचा सुपीकपणा कायम राखते. सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा घडवून, उत्पादन वाढते.
३. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते.
४. जमिनीत हवा खेळती राहते. त्यामुळे जमिनीला अन्नद्रव्याची गरज सेंद्रिय खतांच्या माध्यमातून उपलब्ध होते.
५. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते.

सेंद्रिय खतांचे प्रकार –

१. हिरवळीची खते – लवकर वाढणाऱ्या पिकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करून पीक फुलोऱ्यावर येण्याच्या आधी ते नांगराच्या सहाय्याने जमिनीत
गाडतात. त्यापासून जमिनीला नत्र मिळते, जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते.
२. गांडूळ खत – ह्या खतात गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गांडुळाची अंडीपुंज, बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश केेला
जातो.
३. खाटीकखान्याचे खत – खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून खत बनवितात. यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणात असते.
४. शेणखत – गाईम्हशींचे शेण, मूत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी होतो
आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरता येते.
५. कंपोस्ट खत – शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीवजंतूंमुळे विघटन
होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होऊन कंपोस्ट खत तयार होते.
६. माशाचे खत – समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते ते. ह्यात नत्र, स्फुरद आणि
पालाश यांचे प्रमाण भरपूर असते.

सेंद्रीय खतांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर पैशांची बचत होते आणि महत्वाचे म्हणजे पिके चांगली येतात.

Leave a comment