जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन

0

पृथ्वीतलावर आणि भूगर्भात सर्वात जास्त आणि मुबलक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य म्हणजे कर्ब (कार्बन). कर्बाचे जरी विविध प्रकार असले तरी कृषीक्षेत्रात सर्वात जास्त सहभाग असतो तो सेंद्रिय कर्बाचा. चांगल्या कुजलेल्या जैविक खतामधून वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व मूलद्रव्ये त्यांना सहज उपलब्ध होतात आणि यामध्ये कर्बाचे प्रमाण जवळपास ६० टक्के असते. म्हणून यास सेंद्रिय कर्ब असे म्हणतात. जमिनीची सुपीकता ही सेंद्रिय कर्बाच्या मूल्याद्वारे ठरविली जाते. ज्या जमिनीमध्ये हे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी असते ती जमीन शेतीसाठी अयोग्य किंवा कमी उत्पादित ठरते. शेतजमिनीमधील सेंद्रिय कर्ब जेव्हा चार टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असते. तेव्हा तिला सेंद्रिय जमीन अथवा सुपीक जमीन असे म्हणतात.

सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या वरच्या थरात असलेल्या जिवाणू आणि विविध कीटकांच्या माध्यमात कार्यरत असतो. हे उपयोगी जीव सेंद्रिय घटकांमध्ये असलेली सर्व मूलद्रव्ये विघटन क्रियेमधून वनस्पतींच्या मुळांना उपलब्ध करून देत असतात आणि ती मृत झाल्यावर त्यांच्या विघटनामधून ही सर्व मूलद्रव्ये पिकांना पुन्हा सहजपणे उपलब्ध होतात. सुपीक जमिनीमध्ये निसर्गाची ही निरोगी अन्नसाखळी अखंडित चालू असते. मात्र जेव्हा रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अमर्याद वापर होतो तेव्हा ही अन्नसाखळी तुटते आणि जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होऊ लागते. शेतजमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे झपाटय़ाने कमी होत असलेले प्रमाण हा सध्या कृषीक्षेत्रासाठी संवेदनशील विषय आहे.

मातीचे भौतिक गुणधर्म, कणांची रचना, घनता, पाण्याचे शोषण, वहन तसेच मुळाभोवती हवा खेळती राहण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण नेहमीच आवश्यक त्या प्रमाणात असावे लागते, म्हणूनच शेतीमध्ये शेणखत, कम्पोस्ट, गांडूळ खत, हिरवळीचे खते, जिवाणू खते यांचा नियमित वापर हवा, शेतबांधावर वृक्षलागवडसुद्धा हवी. कृषी उत्पादन घेतल्यावर पिकांचे अवशेष त्याच शेतात परत गाडणे हे सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

मातीतील सेंद्रिय कर्ब हा जमीन प्रतवारी, रोग नियंत्रण, पाणी कार्यक्षमता आणि शेती उत्पादन क्षमता यासाठी दुर्लक्षित परंतु सर्वात महत्वाचा असा घटक आहे. ह्यूमस आणि त्यांच्या संबंधीत इतर सर्व आम्ल हे कर्बाचे मुख्य घटक आहेत.

जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत होण्यास मदत होते. जमिनीमध्ये कार्बन आणि नत्र यांचे योग्य गुणोत्तर प्रमाण राखले गेल्यास चांगला फायदा होतो.

सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपीकतेला बळकट करणारा महत्त्वाचा घटक आहे. अजैविक आणि जैविक अशा दोन प्रकारांत सेंद्रिय कर्ब हा मातीत उपलब्ध होतो. अजैविक कर्ब हा खनिज स्वरूपात आढळतो किंवा वातावरणातील कार्बनडाय आॉक्साईडसोबत मातीतील खनिजांची जी अभिक्रिया होते, त्या प्रक्रियेत आढळतो. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे मातीच्या वरच्या स्तरात अधिक असते. वाळवंटी भागात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी आहे. मातीच्या १२ टक्के ते १८ टक्के श्रेणीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्या मातीस सेंद्रिय माती असे संबोधतात. ५ ते २० टक्के कर्ब हा प्रकाश संश्लेषणाद्वारे निर्माण होतो. तो मुळांच्या अवतीभोवती असणाऱ्या मातीच्या स्तरात (Rhizosphere) सूक्ष्म जिवांच्या कृतीद्वारे पुरवला जातो. सेंद्रिय कर्बाच्या उपलब्धतेत सूक्ष्मजिवांचे खूप मोलाचे योगदान असते.

A) सेंद्रिय कर्ब किती असावा?

सेंद्रिय खते व पिकांच्या अवशेषातील कर्ब-नत्र गुणोत्तर प्रमाण महत्त्वाचे असते. हे गुणोत्तर जेवढे जास्त तेवढा सेंद्रिय पदार्थ कुजण्यास वेळ लागतो. हे गुणोत्तर सर्वसाधारणपणे सेंद्रिय खतात १२ः१ ते २०ः१ यादरम्यान अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त असते. साधारणपणे जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण १ टक्के पेक्षा जास्त असावे.

B) जमिनीतील सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा?

१) सेंद्रिय खतांकडे वनस्पतींना अन्नद्रव्ये पुरविणारे स्राेत एवढ्यापुरतेच पाहू नये. जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. हे दोन्ही गुणधर्म चांगले असल्यास रासायनिक जमिनीचे गुणधर्म सुधारून जमिनीतील स्थिर झालेली अन्नद्रव्ये उपलब्ध स्थितीत येतात. पिकांना उपलब्ध होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडीस शेणखत चांगल्या प्रतीचे कसे निर्माण होईल याकडे लक्ष द्यावे.

२) ज्या प्रदेशात जास्त पाऊस पडतो, त्या ठिकाणी ढीग पद्धतीने खत तयार करावे. याउलट कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात खड्डा पद्धतीने शेणखत किंवा कंपोस्टखत तयार करावे.

३) सेंद्रिय खत चांगले कुजवावे, अन्यथा शेणखतातील तणांच्या बियांमुळे शेतात तणांचा प्रादुर्भाव वाढेल.

४) बऱ्याच शेतकऱ्यांकडे शेणखतामध्ये सामान्यतः कुजण्याच्या स्थितीनुसार तीन प्रकार पडतात. खड्ड्यातील वरचा थर न कुजलेला, मधला थर कुजलेला, तर खालचा थर न कुजलेला अशी परिस्थिती असते. अशा खतांमधून तणे, किडी, अपायकारक बुरशींचा प्रसार होतो, हे लक्षात घ्यावे.

५) सेंद्रिय खत आपल्या शेतावरच तयार करावे किंवा अर्धवट कुजलेल्या शेणखतापासून गांडूळखत तयार करावे.

६) हिरवळीची खते, शेतातील पिकांचे अवशेष, काडीकचरा, पालापाचोळा यांच्यावर कुजन्याची प्रक्रिया करुन याचाही उपयोग सेंद्रिय कर्बाच्या निर्मितीसाठी करता येतो.

C) सेंद्रिय कर्बाचे मुख्य फायदे :-

१) पोषकद्रव्याची उपलब्धता वाढवते :-

A) जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाच्या वापरामुळे ९० ते ९५% नायट्रोजन, १५ ते ८०% फॉस्फरस, आणि ५० ते २०% सल्फरचे स्थिरीकरण करते.
B) जमिनीच्या अनेक भागातून खनिजद्रव्याची स्थिरता आणि मातीतील संपूर्ण धनभारित विद्युतीकणांची वाहन क्षमता वाढवते.
C) जमिनीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि इतर सर्व मूलद्रव्याचे स्थिरीकरण करते.
D) पोषकद्रव्याची धारणक्षमता वाढवते व त्यांना एकत्रित धरून ठेवते.
E) रोपांना जमिनीतील निष्क्रिय खनिजद्रव्य सक्रिय स्वरूपात उपलब्ध करून देतात.
F) मातीतील सूक्ष्मकणांना प्रोत्साहित करून निष्क्रिय खनिजद्रव्य सक्रिय स्वरूपात रोपांना उपलब्ध करून देतात.
G) जमिनीच्या सामूचे निष्क्रियीकरण थांबवण्याला मदत करते.
H) जमिनीमधील सामूमध्ये होणाऱ्या जोरदार बदलाला प्रतिरोध करते.

२) माती संरचना सुधारते :-

A) मातीमध्ये हवा आणि पाणी पोकळी निर्माण करून चांगल्या मातीसंरचनेला सहाय्य करते.
B) जमिनीच्या सुपीक स्थरांची बांधणी करण्यास सहाय्य करते.
C) जमिनीमध्ये जिवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देते. (उदा : गांडूळ व बीटल )

३) वनस्पती वाढीस थेट मदत :-

A) जमिनीतील सूक्ष्मजीवांमार्फत नत्राचे स्थिरीकरण करून नायट्रेट आणि अमोनिया आम्ल हवेत सोडला जातो.
B) जमिनीतील पोकळीमधील हवेत कार्बन डायऑकसाईडची वाढ होते त्यामुळे वनस्पतींची वाढ होण्यास प्रोत्साहन मिळते.
शेतीविषयक माहीती करीता 9307304344 हा नंबर आपल्या व्हट्सअप ग्रुप मध्ये अँड करावा.
C) उत्तेजक संयुगांच्या माध्यमातून वनस्पती व सूक्ष्मजीवांची वाढ करण्यास मदत होते.
D) मूळ वाढीस मदत, सेंद्रिय कर्बामुळे जमिनीमध्ये हवेची पोकळी निर्माण होते त्यामुळे मुळवाढीस वाव मिळतो.

४) जमिनीत पाणी संबंध सुधारते :-

A) खुल्या संरचनेमुळे पाऊसाचे पाणी शोषण क्षमता वाढते.
B) पाण्याचा अपव्यय कमी होतो.
C) ह्यूमस परमाणू कणांचे पाण्यामध्ये विघटन होऊन जमीन बांधणीसाठी प्रोत्साहित करते.
D) सेंद्रिय कार्ब जमिनीमध्ये संग्रहित होऊन हळूहळू पिकांना वाढीच्या अवस्थेत उपलब्ध होतात.
E) जमिनीच्या सुपीक स्थर बांधणीमुळे जमिनीचा चांगल्याप्रकारे निचरा होण्यास मदत होते.

५) इतर फायदे:-

१) जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते.
२) जमिनीचा घट्टपणा कमी होऊन मातीच्या कणाकणांतील पोकळी वाढते. परिणामी जमिनीमध्ये हवा खेळती राहते.
३) हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. भारी काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो.
४) मातीची धूप कमी होते. मातीची जडणघडण सुधारते.
५) रासायनिक द्रव्यांची उपलब्धता वाढते.
६) नत्र आणि स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो.
७) रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो.
८) स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते आणि स्फुरदाची उपलब्धता वाढते.
९) जमिनीचा सामू उदासीन (६.५ ते ७.५) ठेवण्यास मदत होते.
१०) आयन विनिमय क्षमता वाढते.
११) चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांची स्थिरता कमी होते.
१२) जमिनीची आघात प्रतिबंधक क्षमता वाढते.
१३) सेंद्रिय कर्बाच्या जमिनीतील अस्तित्वामुळे सूक्ष्मजीव व जिवाणूंचा प्रजननक्रियेस गती प्राप्त होते. जैविक संख्येत वाढ होते.
१४) जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणूंना सेंद्रिय कर्बाद्वारे ऊर्जा पुरवली जाते. जिवाणूंची कार्यक्षमता वाढून अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
१५) सेंद्रिय कर्बामुळे विकरांचे प्रमाण वाढून अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो. उदा. युरिएज सेल्युलोज.

D) जमिनीची सुपीकता कशी वाढवाल :-

१) पीक फेरपालटीत कडधान्य पिकांची लागवड करावी.
२) शिफारशीप्रमाणे दरवर्षी सेंद्रिय खत शेवटच्या कुळवाच्या पाळीआधी जमिनी मिसळावे.
३) क्षारपड जमिनीत धैंचा किंवा ताग जमिनीत पेरून दीड महिन्यात गाडावा किंवा उसात आंतरपीक म्हणून ताग पेरून गाडावा.
४) उभ्या पिकांत निंबोळी पेंडीचा वापर करावा.
५) पीक अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा. उदा. खोडवा उसात पाचटाचे नियोजन करावे.
६) चोपण जमिनीत सेंद्रीय पदार्थांचा व भूसुधारकांचा (उदा. प्रेसमड, जिप्सम) वापर करावा. आम्ल जमिनीत लाईमचा (चुन्याचा) वापर करावा.
७) कमीत कमी नांगरट करावी. बांधबंदिस्ती करून जमिनीची धूप कमी करावी.
८) जैविक खतांचा बीज प्रक्रियेद्वारे तसेच शेणखतात मिसळून योग्य प्रमाणात वापर करावा.
९) ठिबक सिंचनाद्वारे किंवा तुषार सूक्ष्मसिंचनाद्वारे खतांचे नियोजन करावे.

E) सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता :-

जमिनीत मिसळलेल्या सेंद्रिय पदार्थाद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता व कार्यक्षमता वाढवली जाते. कारण कुजलेल्या सेंद्रिय पदार्थाद्वारे सेंद्रिय आम्लाची निर्मिती होते. त्यातून सूक्ष्म अन्नद्रव्यांना पकडून ठेवण्याची क्षमता सेंद्रिय आम्लाद्वारे वाढवली जातेय. पिकांच्या गरजेनुसार पुरवठा करण्यात येतो. या प्रक्रियेद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण होत नाही. त्यांची पिकांसाठी उपलब्धता व कार्यक्षमताही वाढवली जाते. लोहांची जमिनीतील विद्राव्यता वाढविण्यासाठी थायबॉसिलस नावाचे जीवाणू महत्त्वाचे कार्य करतात. तर मंगल उपलब्ध करण्यासाठी आर्थोबॅक्टर, सुडोमोनास व बॅसिलस नावाचे जीवाणू प्रयत्न करत असतात.

महत्वाच्या बातम्या : –

द्राक्षातील खरड छाटणी नंतर सुप्त घड निर्मिती व सुप्त घड पोषणाची पंचसूत्री

विशेष मोहीम राबवून 15 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना केसीसी कर्ज दिले जाईल

शेतात औषध फवारणीचे नियम काय ? एकदा नक्की वाचा तुम्हला देखील होणार यांचा फायदा

नियमित आंबा मोहरासाठी पॅक्‍लोब्युट्रॉझॉल

नोकरीच्या मागे न लागत ‘या’ शेतकऱ्याने निवडला शेतीचा पर्याय, केली पिवळ्या रंगाच्या कलिंगडाची लागवड

Leave a comment