शेतकरी आंदोलनाचे शंभर दिवस

0

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला शंभर दिवस होऊन गेले. या दिवसांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्याच वेळी आंदोलन देशभर पोहचले. याकाळात आंदोलनाने अनेक चड उतार पाहिले.सरकारने अनेक मार्गांनी आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. आता आंदोलन संपेल, आंदोलनाची धग विझत आहे का असे वाटत असताना प्रत्येक वेळी लोकांनी उभारी दिली. 26 जानेवारी नंतरच्या घटनेनंतर मात्र शेतकरी पेटून उठला. आता वेगवेगळ्या राज्यात लाखोंच्या किसान सभा होत आहेत.

सरकारे बदलतात व्यवस्था तिच राहते-

विरोधी पक्षात असताना प्रत्येक पुढारी आणि पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूचा असतो सत्तेची उब मिळाली की तो प्रस्थापित व्यवस्थेचा कधी होतो हे त्यालाही कळत नाही. असाच अनुभव देशातला शेतकरी घेत आहे.शेतकऱ्यांसाठी मूलभूत व्यवस्था, धोरण बदलण्याचे कोणीच धाडस करत नाही. मोठ्या प्रमाणावर घोषणा शेतकऱ्यांसाठी म्हणून केल्या जातात पण त्यातून दलाली कंपन्यांची आणि भांडवलदारांची केली जात आहे.
सध्याच्या संसदेत 207 खासदार असे आहेत की ज्यांनी प्रतिज्ञा पत्रावर लिहून दिले आहे की ते शेतकरी आहेत आणि शेती हाच त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत आहे. हे सगळे असरताना दुर्दैव हे की शेतकऱ्यांना शंभर दिवस रस्त्यावर रहावे लागत आहे

शेतकरी काय मागतो आहे-

हा फक्त भाजपाच्या विरोधातले आंदोलन नाही. प्रामाणिकपणे बघितल्यास याची मुळे खूप खोलवर सापडतील. आत्तापर्यंतची शेतीची शेतकऱ्यांविरोधी धोरणे याला जबाबदार आहेत.
आता शेतकरी MSP म्हणजे किमान हमीभाव मागतोय. नीट विचार करा तो MRP मागत नाही. तो जस्तीचेही मागत नाही. किमान मागतोय आणि आपली व्यवस्था त्याला किमान द्यायलाही तयार होत नाही. हा आपला समाज म्हणूनही मोठा पराभव आहे.

एक दिवस शेतकऱ्यांशी बोला-

शेतकरी आंदोलनाबद्दल आपण वाट्टेल ते बोलतो त्याआधी एक प्रश्न आपण स्वताला विचारला पाहिजे, आपण शेतकऱ्यांशी शेवटचे कधी बोललो आहे.? एकदा बोलून बघा.! त्याचा आनंद त्याचे प्रश्न समजून घ्या. मग ठरवा, समर्थन करायचे की विरोध करायचा.

तावून सुलाखून निघाले-

अस्सल सोन्यालाही अग्नी परीक्षा पास करावी लागते. तरच ते खरेपणाला उतरते. या शंभर दिवसात शेतककऱ्यांच्या अनेक वेळा अग्नीपरिक्षा घेतल्या गेल्या. दुर्दैव हे की हे सर्व सरकार करत होते. आणि ते सरकार जे शेतकऱ्यांनी निवडून दिले होते. पण शेतकरी या सर्वांना पुरून उरले. शेतकऱ्यांची मुले इंग्लिश बोलतात म्हणून त्यांच्यावर टीका झाली. शेतकरी कुठे इंग्लिश बोलतात म्हणून हिणवले गेले. शेतकऱ्यांच्या पोरांनी पिझ्झा खाल्ला म्हणून त्यांची हेटाळणी केली गेली. शेतकऱ्यांना खलिस्तानी, पाकिस्तानी, दहशतवादी म्हणून वाट्टेल ते आरोप केले गेले.
या सर्व गोष्टींवर शेतकऱ्यांनी मात केली. हा शेतकरी एकजुटीचा विजय होता. आणि हे फक्त शेतकऱ्यांमुळे नाही तर इतरही समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे शक्य झाले.

सरकारने चर्चा बंद केल्या-

सरकार फक्त चर्चेतून मार्ग काढू असे म्हणत आहे.सरकारची शेतकऱ्यांसोबत शेवटची बैठक 22 जानेवारीला झाली होती. शेतकरी चर्चेला तयार आहेत. सरकार वेगवेगळे डावपेच करण्यात व्यस्त आहे.

सत्याग्रही आंदोलन-

अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू आहे. अनेक वेळा सरकारने आंदोलकांना उचकवण्याचे उद्योग केले. पण आंदोलक शेतकरी शांततेच्या मार्गावर ठाम राहिले. म्हणूनच तर याची दखल जगभर घेतली गेली. आंदोलनाच्या प्रत्येक ठिकाणी हिंसक बोलण्यास आणि वयक्तिक कुणावर टीका करण्यास बंदी होती. असे कुणी करत असेल तर त्यांना तिथेच थांबवले जात होते याचा प्रत्यक्ष अनुभव दिल्लीत मला पहायला मिळाला.

टाईम ने घेतली दखल

जागतिक दर्जाच्या टाईम मासिकाने भारतातील शेतकरी आंदोलनाची कव्हर स्टोरी छापली आहे.
आणि विशेष बाब म्हणजे त्या ठीकणी महिलांचा फोटो छापला आहे. हा महिलांचा सहभाग आणि फोटो बरेच काही सांगून जातो.

शेतकरी हाच धर्म-

आजपर्यत शेतकऱ्यांना सतत जातीत, धर्मात विभागून ठेवण्याचे राजकारण खेळले गेले. या आंदोलनात मात्र जात, धर्म, भाषा, प्रांत विसरून लोक एकत्र आले होते, एकत्र निर्णय घेत होते, एकमेकांची काळजी घेत होते. यात शेतकरी हाच धर्म दिसला. आणि हाच खरा भारत आहे.

आंदोलनाने काय दिले?

एवढे दिवस होऊनही प्रश्न कधी सुटेल हे माहित नाही. पण या आंदोलनाने बऱ्याच गोष्टी दिल्या.
शेतकऱ्यांचा प्रश्न देशाच्या अजेंड्यावर आणला जावू शकतो हा विश्वास दिला. आमच्या प्रश्नांवर कोडग्या सरकारलाही लक्ष द्यायला भाग पाडू हा आत्मविश्वास शेतकऱ्यांच्या पोरांना मिळाला. लाखोंची आंदोलने शांततेच्या मार्गाने केली जावू शकतात हा मोठा लोकशाहीचा संदेश दिला गेला.

 अप्पासाहेब अनारसे
सहकार्यवाह युवक क्रांती दल, महाराष्ट्र
कर्जत, अहमदनगर
मो.9096554419

Leave a comment