नैसर्गिकरित्या करूयात पीकामधील कीड नियंत्रण
आज आपण पक्षी थांबे याबद्दल सांगणार आहोत तत्पुर्वी जमिनीच्या सुपिकतेवर बोलायचं झालं तर आज
रासायनिक खतांचा प्रमाणाच्या बाहेर वापर वाढला आहे त्यामुळे जमिनीची सुदृढता आपल्या हाताने घालवली आहे. आपल्या आजोबांच्या काळात जमिनीमध्ये थोडे जरी उकरून बघितले तर गांडूळ बघायला मिळायचे मात्र आज शेतकऱ्यांचा मित्र असणारा गांडूळ रासायनिक खतांने आणि रासायनिक फवारणी ने पूर्णतः जमिनीतून गायब झाला आहे त्यामुळे जमिनीचा टणकपणा आणि कडकपणा दिवसे दिवस वाढत जात आहे तसेच जमिनीची सुपीकता प्रमाणाच्या बाहेर खालावली आहे हे जर वेळीच आपण आटोक्यात आणले नाहीतर जमीन नापिकीकडे जायला फारसा वेळ लागणार नाही .यासाठी खालील गोष्टीचा वापर आपण केला तर निश्चितच जमिनीच्या सुपीकतकडे हातभार लागेल.
१)जैविक कीडनाशकाचा वापर करणे
२)गांडूळ खताचा वापर करणे
३) शेणखताचा वापर मात्र चांगले कुजलेले .
४)जैविक खताचा वापर करणे
५)हिरवळीच्या खतांचा वापर वाढविणे
अळी आणि किडीच्या बंदोबस्तासाठी
६)पक्षी थांबे
७)पिकामध्ये सापळे लावणे
यामध्ये तीन प्रकार पडतात
नरसापळा, चिकट सापळा, फळमाशी सापळा
यामधील आपण पक्षी थांबे यावर सविस्तर बोलणार आहोत.
आपण अन्नसाखळी चा विचार करायला गेलो तर एक जीव दुसऱ्या जीवावर जगत असतो .त्याच नियमाचा प्रभावी वापर आपल्याला आपल्या पिकाच्या संरक्षणा साठी करायचा आहे. जेणेकरून आपल्या पिकातील अळी नियंत्रण असो अथवा किडी नियंत्रण असो त्यासाठी आवर्जुन पक्षी थांबे चा उपयोग आपल्या पिकामध्ये करायचा आहे.
शेतामध्ये जमिनीपासून1 ते 3 मीटर अंतरावर दोन वासे रोवून तिसरा वासा दोन्ही वास्याच्या मधोमध दोरीने बांधणे त्यावर राघू, कोतवाल,चिमण्या असे अनेक पक्षी बसून किडींना खातात. तसेच टीव्ही अँटेनाप्रमाणे लाकडी उभे केल्यास पक्ष्यांना बसायला जागा उपलब्ध होते. या प्रयोगातून आपण आपल्या पिकातील ३० ते ४०% किडीचे नियंत्रण करू शकतो. आपण याचा उपयोग गहू, सोयाबीन, हरभरा,भात इ.पिकामध्ये शून्य खर्चात आणि कमी वेळेत लावू शकतो .
हरभरा शेतीमध्ये हे पक्षी थांबे उभे केल्यास चिमणी, राघो दिवसा यावर बसून हरभरा पिकातील हिरव्या अळी चा पुरेपूर बंदोबस्त करतात तसेच भात पिकावर दिवसा कोतवाल पक्षी थांबे वर बसून खोडकिडी, पाने गुंडाळणाऱ्या अळ्या, नाकतोडे या किडी खातात तर रात्रीच्या वेळी घुबड बसून उंदराचे नियंत्रण करतात. त्याचप्रमाणे गव्हाच्या पिकामध्ये पक्षी थांबे उभे केल्यास रात्रीच्या वेळी घुबडे बसून उंदीर पकडतात.
अशाप्रकारे पक्षी थांबे आपल्या शेतात उभे करून करून प्रभावीपणे कीडनियंत्रण शेतकरी मंडळीकरू शकतात.
श्री.डॉ.वैभव चव्हाण
जैविक शेती मार्गदर्शक,कृषी विभाग हिंगोली.
मो.8788468686