किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ आज मोटरसायकल रॅलीचे आयोजन

0

केंद्र शासनाच्या कायद्याविरोधात आवाज उठवित स्वाभिमानी शेतकरी संघर्ष समितीने गुरुवारी म्हणजेच ३ डिसेंबर २०२० रात्री ठिय्या आंदोलन केले. स्थानिक आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनाला असंख्य शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. कृषीपंपासाठी दिवसा १२ तास वीज मिळावी, खरीप हंगामातील बोगस बियाण्यामध्ये दाखल झालेल्या तक्रारी प्रकरणात खासगी कंपन्यांकडून मदत मिळावी, राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यातील नऊ लाख हेक्टरवरील सर्व पिकांना सरसकट प्रधानमंत्री पीक विमा लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे जागर आंदोलन पार पडले.

यावेळी संघटनेचे जिल्हा नेते मनीष जाधव, अनुप चव्हाण, गजानन अमदाबादकर, सिकंदर शहा, युवा जिल्हाध्यक्ष शिवानंद राठोड, महागाव तालुका अध्यक्ष मंगल राठोड यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते.

यावेळी संघटनेने जिल्ह्यात उद्‌भवलेल्या गुलाबी बोंड अळीच्या प्रश्नावर प्रशासनाला नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना राज्य शासनाने प्रती हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, असे मतही मांडण्यात आले आहे.

शुक्रवारी शेतकरी पुत्र संघर्ष समितीने शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात मोर्चा काढला. स्थानिक आर्णी नाक्यावरून निघालेला हा मोर्चा थेट बसस्थानक चौकात पोहोचला. यावेळी मोर्चेकऱ्यांना मधातच रोखण्यात आले. मोर्चेकऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात नारेबाजी केली.

यावेळी प्रा. प्रवीण देशमुख, किसान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, नगरसेवक नितीन मिर्झापुरे, नगरसेवक चंदू चौधरी, उमेश इंगळे, अतुल राऊत, अरुण ठाकूर, घनश्याम अत्रे, सुरज खोब्रागडे यांच्यासह अनेक जण आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलीस तैनात होते. किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शनिवारी ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता संविधान चौकापासून प्रारंभ होणार आहे. महात्मा फुले चौकात या रॅलीचा समारोप होणार आहे.

Leave a comment