दसरा दिवाळीत झेंडूने घुसखोरी केली

0

दसरा-दिवाळीला लावली जाणारी तोरणं. ती प्रत्येक भागात वेगळी असायची. पण आता त्यात झेंडूच्या फुलांनी घुसखोरी केलीय. याचा पिकांच्या विविधता व संवर्धनाशी संबंध आहे का?

दसरा आला की आमच्या भागातल्या गावकऱ्यांना वेध लागतात, ते शेतात काढणीला आलेल्या पिकांचे. आधीचं पीक काढायचं, त्यावर नवीन पिकं लावायची याची लगबग सुरू होते. कारण हा हाता-तोंडाशी आलेलं पीक व्यवस्थित घरात आलं, तर वर्षभर घराचं आर्थिक संतुलन ठीक राहतं.

नवरात्रीत घटस्थापना केली जाते. त्यावेळी शेतातली माती आणायची, त्यात पुढच्या पिकासाठी पेरणी करण्याचं धान्य टाकायचं. काढणीला आलेल्या धान्याच्या बाबतीतही तसंच. कोणतं बियाणं म्हणून उगवण चांगली असेल, ते पुढील वर्षीसाठी ठेवायचं. हे एक प्रकारे मातीची तसेच धान्याची चाचणी घ्यायचा प्रकार असतो.

हीच बाब गावातल्या देवळात आणि शेतकऱ्यांच्या घरात. यातून एक प्रकारचे बियाणांचं_संवर्धन म्हणा किंवा चांगल्या उपयुक्त गोष्टीची गावानं केलेली सामूहिक चाचणी असते. आपलं घटातल्या धान्याची चांगली उगवण झाली नाही, तर गावातील इतर कोणा शेतकऱ्यांचा घटातल्या धान्यांची चांगली उगवण झालीय याचा शोध घेतला जातो. त्याच्याकडून बियाणं घेऊन ते आपल्या शेतात पेरलं जातं. असा हा साधा पण म्हटलं तर खूप मोठा विचार!

आज काल प्रसार माध्यमांचा प्रभाव प्रचंड वाढलाय. त्यातून ग्रामीण भाग आणि शेतीसुद्धा सुटली नाही. परिणामी, शेतीवर झालेल्या माध्यमांच्या भडीमाराला, त्यातून दाखवलेल्या शहरी आकर्षणाला ग्रामीण शेतकऱ्यांची मुलं देखील बळी पडत आहेत.

माझ्या भागात म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यात दसऱ्याला दारावरचं लावलं जाणारं तोरण बरंच काही सांगून जातं. या तोरणात आजही आंब्याच्या पानात #भाताचीलोंबी, #नाचणीचंबोंड, #कारळ्याचीपिवळीफुलं वापरली जातात. गवताला आलेलं गुलाबी फूल सजवण्यासाठी वापरायचं आणि हे सगळं अंबाडीची सालीत बांधायचं! घराला हेच तोरण बांधतात. गाडी अवजारं, उद्योग, व्यवसायामध्ये पण हेच तोरण बांधतात; पण आज – काल या तोरणात झेंडूच्या फुलाने घुसखोरी केलीय !

हा झेंडू ग्रामीण भागात हा कधी आणि कसा घुसला? हे समजलंच नाही. याचा मागोवा घेतला तर एक साम्य दिसलं. प्रसार माध्यमं जशी आपली मूळ भूमिका सोडून लोकांच्या खाजगी आयुष्यात कधी शिरली, हे जसे समजलं नाही तसं हा झेंडूनं आमच्या भागात कधी हात पाय पसरले ते समजलं नाही. चांगली शेती करायची तर तुमच्याकडं चांगली बियाणी आणि सकस माती असायलाच हवी. तेव्हा आणि तेव्हाच चांगली शेती शक्य आहे. हीच पारंपारिक गोष्ट आम्ही विसरलो आहोत. यात आधुनिक पद्धतीने बदल ही करता येईल, पण मूळ गाभा विसरून शेतीचं भलं कसं होणार?

शेतीतील नवी पिढी समोर आव्हाने खूप आहेत त्या साठी लढायला आणि विचार करायला बळ मिळो म्हणून खूप साऱ्या शुभेच्छा हाच विचार करायला प्रत्येकाला सुबुद्धी मिळो! शाहूवाडी तालुक्यात दसऱ्याच्या दिवशी बांधलं जाणारं तोरण.

(सौजन्य – मंगेश बेंडखळे)

Leave a comment