पीक पोषणात मॅंगेनीज महत्त्वाचे

0

पिकांमधील प्रकाशसंश्‍लेषण व विविध जैवरासायनिक क्रिया व्यवस्थितरीत्या होण्यासाठी मॅंगेनीज अन्नद्रव्य गरजेचे असते.मॅंगेनीजसाठी संवेदनशील पिके सोयाबीन, गहू, मुळा, पालक व कांदा इत्यादी पिके मॅंगेनीज कमतरतेस संवेदनशील आहेत; तर टोमॅटो, काकडी, वाटाणा, बटाटा, मका व फळझाडे पिके मध्यम संवेदनशील आहेत.

जमिनीतील मॅंगेनीजची उपलब्धता

ज्या जमिनीत उपलब्ध मॅंगेनीजचे प्रमाण दोन दशलक्ष भागापेक्षा कमी असते अशा जमिनीस मॅंगेनीज कमतरतेची जमीन असे संबोधतात. जमिनीत मॅंगेनीज योग्य प्रमाणात उपलब्ध असले तरीही जमिनीच्या विविध रासायनिक गुणधर्मांमुळे पिकांद्वारे शोषले जात नाही.

मॅंगेनीज पिकांना जमिनीत Mn 2+ या स्वरूपात उपलब्ध होते, कारण ज्या जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 इतका असतो, त्या जमिनीत Mn 2+ या स्वरूपात उपलब्ध असते.

मॅंगेनीजचे उपलब्ध स्वरूप हे सूक्ष्म जिवाणूंच्या कार्यावरदेखील अवलंबून असते. सूक्ष्म जिवाणूंचे कार्य जमिनीच्या सामूवर व सेंद्रिय कर्बावर आधारित असते. जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंमुळे अनुपलब्ध मॅंगेनीजचे रूपांतरण उपलब्ध स्वरूपात होऊन पिकांना मिळू शकते. तसेच, मॅंगेनीजचे विविध स्वरूपांतील रूपांतरण होण्याचे प्रमाण पिकांच्या मुळांद्वारे बाहेर पडणाऱ्या पदार्थांवरदेखील अवलंबून असते. मुळांद्वारे बाहेर पडणाऱ्या मॅलिक आम्लामुळे मॅंगेनीजची जमिनीत विद्राव्यता वाढते व पिकांना अन्नद्रव्य सहज उपलब्ध होते.

जमिनीत मॅंगेनीजचे जास्त प्रमाणात वहन होत नाही, त्यामुळे मॅंगेनीजयुक्त खते ज्या ठिकाणी जमिनीत पडतात त्याच ठिकाणी उपलब्ध व स्थिर होतात. म्हणून मॅंगेनीज पिकांच्या मुळांच्या सान्निध्यात पडणे महत्त्वाचे ठरते, जेणेकरून मुळांद्वारे मॅंगेनीजचे शोषण सहज व जास्त प्रमाणात होईल.

पिकांमध्ये मॅंगेनीजचे कार्य

पिकांमध्ये घडून येणाऱ्या प्रकाशसंश्‍लेषण, श्‍वसन आणि विविध सेंद्रिय पदार्थ रूपांतरण यासाठी मंगल किंवा मॅंगेनीज अन्नद्रव्य कार्य करते.
विविध जैवरासायनिक प्रक्रिया व अभिक्रिया यांना चालना देणे तसेच विकरांना प्रवृत्त करणे हे काम मॅंगेनीज (मंगल) अन्नद्रव्यामार्फत केले जाते.
कर्बोदके व प्रथिने तयार करणे अशा प्रक्रियेमध्येदेखील मंगलचे महत्त्वपूर्ण कार्य आहे.

पिकांमधील मॅंगेनीज कमतरतेची लक्षणे

सोयाबीन नवीन पानांचा रंग फिकट पिवळा पडतो व पानांच्या शिरा हिरव्याच राहतात, पिकांची वाढ खुंटते व पाने पक्व होण्याआधीच गळतात.

मका पिकांची वाढ खुंटते किंवा पीक लहान राहते, पानांच्या शिरांतील भाग पिवळा पडतो.

ऊस पानांचा रंग फिकट हिरवा व पिवळसर दिसतो, पानांच्या कडेवर पिवळ्या व पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसतात.

भुईमूग नवीन पाने पिवळसर दिसतात, पानांच्या कडेवर विटकरी रंगाचे ठिपके दिसतात.

सूर्यफूल नवीन पाने बारीक राहतात व प्रथम पिवळी नंतर पांढरी पडतात, पानांच्या शिरांतील भागावर विटकरी रंगाचे ठिपके दिसतात. त्यानंतर पिकांच्या मधल्या भागातील व खालच्या भागातील पानांवर पसरतात.

टोमॅटो पानांचा आकार लहान राहतो व शिरांतील भागावर नारंगी पिवळसर रंग दिसतो व तो कडांवरही पसरतो तद्‌नंतर विटकरी रंगाचे ठिपके दिसतात.

गहू पिकांच्या शेंड्याकडील पाने पिवळी दिसतात. पानांच्या टोकापर्यंत पिवळ्या रेषा दिसतात, तसेच पिकांच्या पानांवर पिवळे ठिपके पडतात.

आंबा पाने प्रथम फिकट हिरवी नंतर पिवळी दिसतात परंतु शिरा हिरव्याच राहतात. नंतरच्या काळात पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.

पेरू शेंड्याकडील पानांचा रंग पिवळा पडतो व फुलधारणेवरही परिणाम होतो.
लिंबूवर्गीय पिके जास्त कॅल्शिअमचे प्रमाण असणाऱ्या जमिनीत मॅंगेनीज कमतरता आढळते, पानांच्या शिरांतील भाग जस्त व लोहाप्रमाणचे पिवळा पडतो परंतु पानांच्या आकारावर काहीही परिणाम होत नाही.

महत्वाच्या बातम्या : –

आशीर्वाद अर्थप्लस, आशीर्वाद दशावतार १००% नैसर्गिक आणि १००% रेसीड्यु फ्री

अश्या प्रकारे करा बुरशीनाशकांची निवड

जाणून घ्या वटवृक्षाचे औषधी आणि गुणकारी महत्व

महापंचायतीस लाखो शेतकऱ्यांची गर्दी

लागवडीचा खर्च वाढल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांना रडविले

 

Leave a comment