बटाटा पिकावरील महत्त्वाच्या रस शोषणाऱ्या किडींचे व्यवस्थापन
शेतकरी बंधूंनो बटाटा पिकावर येणाऱ्या महत्त्वाच्या रस शोषणाऱ्या किडी व त्यांचे व्यवस्थापन याविषयी जाणून घेऊ.
(१) बटाटा पिकावरील मावा : बटाटा पिकातील मावा ही कीड साधारणत डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात अधिक प्रमाणात आढळून येते. बटाटा पिकावरील मावा ही कीड पानाच्या खालच्या बाजूस राहून पानाच्या पेशीमध्ये आपली सोंड खुपसून पानातील रस शोषण करते. पानातील रस शोषण केल्यामुळे पाने मुरडतात व पिवळी पडतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकाची वाढ खुंटते व पिकाच्या वाढीचा जोम कमी होतो तसेच उत्पादनात घट येते.
मावा ही कीड आपल्या शरीरावाटे गोड चिकट स्त्राव पानावर पसरवते व त्यामुळे बटाट्याची पाने चिकट होतात व त्यावर काळी बुरशी वाढते. पानावर काळी बुरशी वाढल्यामुळे पिकास अन्न तयार करण्यासाठी अडथळा निर्माण होतो. बटाटा पिकावरील माव्याची मादी साधारणता दररोज दहा ते बारा पिल्लांना जन्म देते.
माव्याची एक पिढी पूर्ण होण्यास साधारणत सात ते आठ दिवस लागतात. बटाटा पिकावर माव्याच्या अनेक पिढ्या तयार होतात. बटाट्या वरील मावा ही कीड पानातून रस शोषण करण्याव्यतिरिक्त बटाटा पिकावर येणाऱ्या पाने गुंडाळणाऱ्या विषाणू म्हणजे लिफ रोल व्हायरस आणि जखमेवाटे किंवा रोगट भागाच्या स्पर्शाने पसरणारे विषाणूजन्य रोग या रोगाच्या प्रसारास सुद्धा कारणीभूत ठरू शकतो
व्यवस्थापन उपाययोजना : बटाट्या वरील माव्याच्या व्यवस्थापनासाठी माव्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन योग्य निदान करून खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. Thiamethoxam 25% WG 2 ते 3 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी किंवाOxy dematon methyl 25% EC (मिथील डेमॅटॉन २५% EC) 10 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार फवारणी करावी.
(२) बटाटा पिकावरील तुडतुडे : बटाटा पिकावरील तुडतुडे ही कीड हिरवट पिवळ्या रंगाची असून बाल्यावस्थेत तुडतुडे हे बिनपंखी व हिरव्या रंगाचे असून ते तिरकस चालतात. तुडतुडे याची एक मादी दोनशे अंड्या पर्यंत अंडी घालू शकते.तुडतुडे हे बटाट्याच्या पानाच्या खालील बाजूस राहून पानाच्या पेशीतील रस शोषण करतात त्यामुळे पानाच्या कडा पिवळ्या पडतात व पाने पिवळी पडून वाळतात व बटाट्याच्या उत्पादनात घट येते. पर्पल टॉप रोल व्हायरस या विषाणूजन्य रोगाचा प्रसार बटाटा पिकात तुडतुडे या किडीमुळे होऊ शकतो.
व्यवस्थापन उपाय योजना : तुडतुडे याच्या व्यवस्थापनासाठी बटाटा पिकावरील मावा किडीसाठी वर दिलेल्या उपाययोजनेचा गरजेनुसार योग्य निदान करून आवश्यकतेनुसार वापर करावा.
(३) बटाटा पिकावरील फुलकिडे : बटाटा पिकावरील फुलकिडे ही कीड रस शोषून व व पानांना खरचटून नुकसान करते.
व्यवस्थापन उपाय योजना : बटाटा पिकावरील फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी Diemethoate 30 % EC 12 ते 13 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फुलकिडीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन योग्य निदान करून आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
टीप –
(१) वर निर्देशित उपायोजना अवलंब करण्यापूर्वी किडीचे योग्य निदान करून लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करून गरजेनुसार आवश्यक असेल तरच लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे कीटकनाशकाची फवारणी करावी.
(२) रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करताना अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी व फवारणी करताना निर्देशित प्रमाण ठेवूनच रसायनाचा वापर लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे करावा.
(३) रासायनिक कीडनाशके फवारताना सुरक्षा किटस चा वापर करावा तसेच सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा अंगीकार करावा.
(४) सर्व भाजीपाला व इतर पिकात रसायने फवारल्यानंतर लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे पीक काढणी कालावधी लक्षात घेऊन कीटकनाशक विरहित उत्पादन बाजारपेठेत जाईल या दृष्टीने काळजी घ्यावी.
राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम
महत्वाच्या बातम्या : –
गोंदिया जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी
अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
शेतकऱ्यांचे आज देशभर रेल रोको आंदोलन
जाणून घ्या कॉफी पिण्याचे अनेक फायदे….