शेंग भरत असतानाच तुरीवर अळीचा प्रादुर्भाव

0

सोयाबीन पाठोपाठ कपाशी पीक हातचे गेल्याने यंदा तूर पिकावर शेतकऱ्यांच पोट होत. पण गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असल्याने तूर पिकाची शेंग भरत असतानाच त्यावर आता अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कृषी अधिकाऱ्यांनी शेत शिवारात येत हवालदील शेतकऱ्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.

महागड्या किटकनाशकांची फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने उभे पीक उपटून टाकावे की काय असा विचार या भागातील शेतकरी करीत आहेत. अवकाळी पावसामुळे तसेच बोगस बियाण्यांमुळे या भागातील सोयाबीन आणि कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यातून सावरत नाही तर कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला.

त्यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. या संकटातून सावरण्यापूर्वीच आता तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून येत आहे. किटकनाशकांची फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नाही आहे. काही शेतकरी आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करतात तर काही शेतकरी हे तुरीची सलग लागवड करतात. या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी समाधानकारक उत्पन्न होईल या आशेवर तूर पिकाची लागवड केली. पण अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे.

Leave a comment