कढीपत्ता लागवडीबाबत माहिती
कढीपत्याचे शास्त्रीय नाव ‘मुर्रया कोइनिगी’ आहे ही अत्यंत काटक, बहुवर्षांयु, ८ ते १० फुटांपर्यंत वाढणारी वनस्पती आहे. या वनस्पतीला ‘गोड निंब’ म्हणूनही ओळखले जाते. याची पाने देठाला समोरासमोर येतात. त्यांना विशिष्ट सुवास असतो. हिवाळ्यात पानगळ होते. सर्व प्रकारच्या हवामानात ही वनस्पती सहज जगू शकते. या पिकाची व्यावसायिक पध्दतीने लागवड केल्यास व शास्त्रीय व्यवस्थापन केल्यास हे पीक फायदेशीर होऊ शकते.
जमीन, हवामान :
हलक्या, वाळूमिश्रित जमिनीपासून ते लाल, काळ्या, कसदार जमिनीत लागवड शक्य. पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत लागवड करू नये. मुरमाड, खडकाळ जमिनीतही बऱ्यापैकी वाढतो. समशीतोष्ण ते उष्ण हवामान पोषक. ऊन मात्र व्यवस्थित लागायला हवे. २६ ते ३७ अंश से. तापमानात उत्तम वाढ.
जाती :
मोठ्या पानांचा/लहान पानांचा कढीपत्ता
सेन कांपा व डीडब्ल्यूडी-१, डीडब्ल्यू-२, या धारवाड येथील कृषी महाविद्यालयाने अधिक स्वादाच्या जाती विकसित केल्या आहेत. मोठय़ा पानांच्या कढीपत्त्याला सुगंध तुलनेने कमी. त्यातील स्वादयुक्त तेलाचे (इसेन्शिअल ऑईल) प्रमाण ४ ते ५ टक्के.
लागवड पद्धत :
चांगले उत्पादन देणाऱ्या झाडाची जुलै ते ऑगस्टमध्ये पूर्ण पिकलेली फळे घ्यावीत. त्यातून बी काढून लागवडीसाठी वापरावे.
लागवडीचे प्रकार
बी टोकून : बी टोकल्यानंतर सुमारे ३ आठवड्यांनी उगवते. बिया रात्रभर पाण्यात बुडवून ठेवून हा उगवण कालावधी कमी करता येतो. उगवणीसाठी साधारण २० अंश से. तापमान आवश्यक असते. एका बियातून २ ते ३ रोपे बोहेर पडतात.
रोप लागवड :
बी रूजत घालण्यासाठी गादीवाफे तयार करावेत. त्यासाठी माती शेणखत वाळू प्रत्येकी एक प्रमाणात मिसळावे. १ वर्ष वयाची रोपे पुर्नलागवडीसाठी वापरावीत. रोपे १ ते २ फूट उंचीची लावता येतात. स्वतंत्र लागवड करताना १.२ ते १.५ मीटर बाय १.२ मीटर अंतरावर ३० सेंमी बाय ३० सेंमी बाय ३० सेंमी आकाराचे खड्डे खणावेत. साधारण २० ते २५ दिवस खड्डा उन्हात तापवून त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट, माती यांचे मिश्रण भरावे. पावसाळ्याच्या सुरूवातीला लागवड केल्यास रोपे चांगल्या प्रकारे रुजतात. नैसर्गिक वातावरण अनुकूल असल्याने रोपांची मर होत नाही.
झिगझॅग व सघन लागवड :
पाच फूटाची सरी पाडून दुहेरी (झिगझॅग) पद्धतीनेही लागवड सघन पद्धतीने २ रांगांमध्ये १ मीटर व २ रोपांमध्ये ३० सेंमी अंतर सोडावे. दुहेरी पद्धतीत पहिल्या रांगेतील २ झाडांच्या मध्यावर दुसऱ्या ओळीतील झाड येईल. झाडाला मुळाजवळून फुटवे येतात. त्यापासूनही लागवड करता येते. पावसाळ्याच्या सुरवातीला हे फुटवे खणून काढावेत आणि त्वरित लागवड करावी.
अन्नद्रव्ये व्यवस्थापन :
झाड बहुवर्षायू आहे वारंवार पाने काढली जात असल्याने माती परीक्षणानुसार खतपुरवठा करावा लागतो. पहिल्या वर्षी प्रति झाड १० ते २० किलो शेणखत ६० ग्रॅम नत्र २५ ग्रॅम स्फुरद २५ ग्रॅम पालाश द्यावे. दुसऱ्या वर्षीपासून प्रति झाड ८० ग्रॅम स्फुरद २५ ग्रॅम पालाश द्यावे. प्रत्येक छाटणीनंतर ५० ग्रॅम नत्र द्यावे. भारी जमिनीत प्रत्येक वर्षी एकरी ५० किलो डीएपी दिल्याने चांगली पालवी फुटते. ही खते पावसाळ्याच्या सुरवातीस द्यावीत. आवश्यकतेनुसार निंबोळी पेंड कंरजी पेंड द्यावी.
पाणी व्यवस्थापन :
हिवाळ्यात भारी जमीन असल्यास महिन्यातून १ पाणी जमीन हलकी असल्यास महिन्यातून दोनवेळा उन्हाळ्यात भारी जमीन असल्यास २० दिवसांनी जमीन हलकी असल्यास १५ दिवसांनी पावसाळ्यात जमिनीतील ओल पाहून
तण व्यवस्थापन :
फिकट हिरव्या बदामी आकाराच्या पानांच्या वेलवर्गीय तणाचा प्रादुर्भाव होतो. या वेळी येणारे आगारे कढीपत्त्याच्या कोवळ्या फुटीला वेढा मारतात. परिणामी कढीपत्त्याचे झाड हतबल होऊन वाढ खुंटते. झाडाभोवतीचे तण सतत काढत राहावे. बाग तणमुक्त ठेवावी.
आंतरपिके :
रोप लागवड असल्यास काढणी वेळ उपलब्ध पाणी यांचा अभ्यास करून मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, आंबडी बीट आदी पिके सप्टेंबरपासून मधल्या मोकळ्या जागेत घेणे शक्य अन्नव्ये व पाण्यासाठी स्पर्धा होणार नाही याची काळजी.
किडी-रोग नियंत्रण :
पीक काटक त्यामुळे किडी रोगांचा प्रादुर्भाव तसा कमी. पानावरील बुरशीजन्य ठिपके पाने खाणारी अळी सायला व खवले किडीचा काही प्रमाणात प्रादुर्भाव. कढीपत्ता प्रत्यक्ष आहारात वापरला जात असल्याने कीडनाशकांचा वापर टाळून जैविक कीडनाशकांच्या वापरावर भर द्यावा. दशपर्णी अर्क निंबोळी अर्काच्या गरजेनुसार फवारण्या कराव्यात. रसशोषक कीड नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे लावावेत.
कापणी व उत्पादन :
झाडाची निरोगी वाढ होण्यासाठी मुळाजवळून येणारे फुटवे नियमित काढून टाकावेत. कढीपत्ता वर्षातून फक्त २ ते ३ फूट वाढतो. प्रति झाडाला ५ ते ६ सशक्त फांद्या जोपासाव्यात. लागवडीनंतर ९ ते १२ महिन्यांनी कापणी करावी. योग्यवेळी छाटणी आवश्यक. मोठ्या प्रमाणात लागवड असल्यास जमिनीपासून १५ ते २० सेंटीमीटर खोडाचा भाग ठेवून तोडणी करावी. वर्षातून ३ ते ४ वेळा काढणी शक्य. बी टोकून घेतलेल्या कढीपत्त्याचे उत्पादन पहिल्या एकरी ५ ते १० टन मिळते. पुढील वर्षीपासून ते ५ ते ८ वर्षे १५ ते २० टनांपर्यंत मिळू शकते.
प्रक्रिया उद्योग :
कढीपत्त्याची पाने विविध पदार्थांमध्ये वापरली जातात. त्यामुळे दर नसेल त्यावेळी कढीपत्त्याची पावडर तयार करून ती बाजारात विकता येते. पानांप्रमाणे पावडर योग्य प्रक्रियेतून काही काळ चांगल्या प्रकारे राहू शकते.
कढीपत्याविषयी महत्वाच्या बाबी :
उन्हाची तीव्रता व प्रकाश मिळण्याचा कालावधी यानुसार या पिकाची कमी जास्त प्रमाणात वाढ होते. लागवड बांधावर केली तरी उत्पन्न मिळवण्याची संधी असते. त्याआधारे पासून मुख्यपिकाचे वाऱ्यापासून संरक्षणही (वींडब्रेक) करता येते. भारत श्रीलंका म्यानमार थायलंड आदी देशांत लागवड होते. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आदी राज्यांत तर महाराष्ट्रात अल्प प्रमाणात शेतकरी कढीपत्त्याची व्यवसायिक लागवड करतात. रक्तातील हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी कढीपत्ता महत्वाचा असतो. जनावरांना चारा म्हणूनही त्याचा वापर केला जातो.
महत्वाच्या बातम्या : –
आरोग्याचे रहस्य भाज्यांच्या रंगात लपलेले आहे, आपण कोणती रंगाची भाजी खावी हे जाणून घ्या?
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ‘या’ भाज्यांची लागवड करा, होईल ‘भरघोस’ फायदा
पीक पोषणात मॅंगेनीज महत्त्वाचे
आशीर्वाद अर्थप्लस, आशीर्वाद दशावतार १००% नैसर्गिक आणि १००% रेसीड्यु फ्री