अधिक उत्पादकतेसाठी करडईची सुधारित लागवड फायद्याची

0

करडई हे तेलबिया गटातील (गळीत धान्यवर्गीय ) रबी हंगामातील महत्वाचे व कमी खर्चाचे पिक असुन, याला ‘करडी’ किंवा ‘कुसुम’ या नावाने सुध्दा संबोधल्या जाते. मध्यम कालावधी (120-140 दिवस), चांगली उत्पादनक्षमता ( कोरडवाहु परिस्थितीत एकरी 8 क्विंटलपेक्षा जास्त), हृदयरुग्णांसाठी उत्कृष्ठ (लीनोलिक ॲसिडचे प्रमाण 78%), अवर्षणावर मात करण्याची क्षमता, दुबार पिक पध्दतीसाठी उत्कुष्ठ, आंतरपिक पध्दतीसाठी योग्य, पिकांच्या फेरपालटीसाठी योग्य, मुख्यपिकाचे संरक्षण करण्याकरिता गार्डक्रॉप (संरक्षकपिक) म्हणून योग्य, फुलांच्या गर्द पिवळ्या पाकळयांपासुन कार्थ्यामिन किंवा सॅफफ्लॉवर यलो डाय तयार करता येतो, इत्यादी कारणांमुळे इतर रबी पिकांपेक्षा कोरडवाहु क्षेत्राकरिता हे पिक एक वरदान ठरल्याचे सिध्द झाले आहे. भारतात या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्राचा तसेच उत्पादनाबाबत विचार केल्यास महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो.

सुधारित / संकरीत जाती :- 

अ.

क्र.

वाण पिक फुलोऱ्यावर येण्याचा कालावधी (दिवस) पिक परिपक्व होण्याचा कालावधी

(दिवस)

तेलाचे प्रमाण (%) प्रति एकर उत्पादन (क्विंटल) इतर महत्वाचे गुणधर्म
सुधारीत वाण 
1 एकेएस -311 75-80 130-135 32 6-8 पीकेव्ही पिंक या नावाने प्रसारित वाण  
भिमा  75-80 130-135 30 8-10
3 नारी -6  80-85 135-137 31 6-8 बिनकाटेरी वाण
4 एकेएस -207 70-75 125-130 30 7-8
संकरीत वाण
1 नारी-एनएच-1 75-79 135-140 31 7-8 बिनकाटेरी वाण

 

पेरणीची वेळ :- 

  • कोरडवाहु परिस्थितीत सप्टेंबरचा तिसरा आठवडा ते ऑक्टोबरचा पहिला आठवडा पेरणीसाठी योग्य कालावधी असुन या दरम्यान पेरणी केल्यास अधिक उत्पादन तसेच मावा या किडीचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. 
  • बागायती परिस्थितीत  ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरणी करता येते. 

बियाणे प्रमाण :-

अ.क्र. प्रकार शिफारशी प्रमाणे

प्रति एकर लागणारे बियाणे

1 मध्यम ते भारी जमीनीसाठी  4-5 किलो
2 भारी ते अतिभारी जमीनीसाठी  3-4 किलो
3 दुबार पिक पध्दतीसाठी  5-6 किलो
4 संकरीत वाणासाठी  3 किलो

 

बियाणे प्रक्रिया :-

अ.

क्र.

नांव प्रति किलो बियाण्यास लावावयाचे प्रमाण ग्रॅम / मिली उद्देश
1 थायरम किंवा कॅप्टन किंवा ब्रासीकॉल  3 ग्रॅम बुरशीजन्य रोगांपासुन प्रतिबंध करण्याकरीता 
2 ॲझोटोबॅक्टर  25 ग्रॅम / 5 मिली नत्राची उपलब्धता वाढविण्याकरीता 
3 पी.एस.बी.  25 ग्रॅम / 5 मिली स्फुरदची उपलब्धता वाढविण्याकरिता 
4 ट्रायकोडर्मा  4 ग्रॅम /

3 ते 5 मिली

मर रोगापासून प्रतिबंध करण्याकरिता 

 

पेरणीची पध्दत :- 


  1. प्रचलीत
    पध्दतीने पेरणी करतांना पाभरीने, सरत्याने अथवा तिफनीने करावी. 
  2. कोरडवाहू परिस्थितीत भारी काळीची जमिन जर कडक आली असेल तर पेरणी लोखंडी दात्याच्या तिफणीने करावी. 
  3. बागायती परिस्थितीत पाणी देऊन, वाफसा आल्यावर मजुरांची उपलब्धता असल्यास टोकुन पेरणी करावी अन्यथा प्रचलीत पध्दतीने पेरणी करावी. 

पेरणीचे अंतर :- 

जमिनीचा प्रकार  दोन ओळीतील अंतर दोन झाडातील अंतर
मध्यम जमिनीसाठी 45 सें.मी. 15 से.मी.
भारी जमिनीसाठी 45 सें.मी. 30 सें.मी. 
अतिभारी जमिनीसाठी 60 सें.मी. 30 सें.मी.

 

  • कोरडवाहू परिस्थितीत लागवड करतांना कमी पावसाच्या स्थितीत पेरणीचे अंतर (दोन झाडातील) कमी करुन झाडांची संख्या वाढविणे, उत्पादनवाढीसाठी महत्वपूर्ण बाब ठरु शकते. 

पेरणीची खोली :-

  • 3-4 सेंमी. 
  • चांगल्या उगवणीसाठी म्हणजेच प्रति एकरी झाडांची संख्या योग्य प्रमाणात राखण्यासाठी पेरणीची खोली महत्वपूर्ण बाब ठरते. 

खत व्यवस्थापन :- 

  • खतांचे व्यवस्थापन करण्याकरीता  शिफारशीनुसार प्रति एकर द्यावयाची अन्नद्रव्यांची मात्रा : 16 किलो नत्र ,16 किलो स्फुरद : 16 किलो पालाश प्रति एकर. यापैकी 8 किलो नत्र : 16 किलो किलो स्फुरद : 16 किलो पालाश पेरणीची  वेळी  तर उरलेले 8 किलो नत्र पेरणीनंतर 30 दिवसांनी  द्यावे.त्याकरीता सरळखतांचा वापर करावयाचा असल्यास 
अ.क्र. खताचे नांव शिफारशीप्रमाणे प्रति एकरी लागणारी मात्रा द्यावयाची वेळ
1 युरीया  17.50 किलो 

(साधारणत: अर्धा बॅग)

पेरणीचे वेळी 
2 एसएसपी 100 किलो (2 बॅग)  पेरणीच्या वेळी 
3 एमओपी  26.75 किलो 

(साधारणत: 1/2 बॅग) 

पेरणीचे वेळी 
4 युरिया  17.50 किलो 

(साधारणत: अर्धा बॅग)

पेरणीनंतर 30  दिवसांनी 

 

डिएपी + सरळखतांचा वापर करावयाचा असल्यास

अ.क्र. खताचे नांव शिफारशीप्रमाणे प्रति एकरी लागणारी मात्रा द्यावयाची वेळ
1 डीएपी  40  किलो 

(साधारणत: 1 बॅग)

पेरणीचे वेळी 
2 एमओपी 25 किलो (1/2 बॅग)  पेरणीचे वेळी 
3 युरिया 17.50 किलो 

(साधारणत: 1/2 बॅग) 

पेरणीनंतर 15-20 दिवसांनी
  • युरिया या सरळखताची मात्रा उभ्या पिकात द्यावयाची असल्यास जमिनीत ओल असतांना तसेच पहिल्या डवऱ्याच्या फेराआधी दिल्यास  जमिनीत  योग्य प्रकारे मिसळल्या जाऊन पिकाच्या योग्य वाढीसाठी महत्वपूर्ण बाब ठरु शकते. 
  •  करडई पिकाची अन्नद्रव्यांची अतिरीक्त गरज पूर्ण करण्याकरीता विद्राव्य खतांचा वापर फवारणीच्या स्वरूपात करून अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे फायदेशिर बाब ठरू शकते त्याकरिता.
  • पिक 20 दिवसांचे झाल्यानंतर 19:19:19 या विद्राव्य संमिश्र खताची फवारणी करावी. त्यासाठी 75 ग्राम 19:19:19:विद्राव्य खत प्रति साध्या पंपासाठी या प्रमाणे फवारणी करावी.
  • पिक फुलावर येण्याआधी (कळी अवस्थेत)(म्हणजेच पेरणीपासून 65-75 दिवसा दरम्यान) 0:52:34 या विद्राव्य खताची + सुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. त्यासाठी 60-75 ग्राम 0:52:34 विद्राव्य खत प्रति  15 लिटर साध्या पंपासाठी याप्रमाणे  फवारणी करावी.
  • पिक फुलावर आल्यानंतर 8 दिवसांनी 13:0:45 या विद्राव्य खताची + सुक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी. त्यासाठी 75 ग्राम 13:0:45 विद्राव्य खतांची प्रति 15 लिटर साध्या पंपासाठी याप्रमाणे फवारणी करावी.
  • बोंडाच्या अवस्थेमध्ये 0:0:50 या विद्राव्य खताची फवारणी करणे योग्य राहील म्हणजेच बोंडामध्ये दाणे भरण्यास चांगली मदत होईल.

वरील प्रमाणे आवश्यकते नुसार निर्णय घेवून शेतकरी बांधव फवारणीच्या माध्यमातुन विद्राव्य खतांचा वापर करु शकतात. 

आंतरमशागत :

खांडण्या भरणे

बागायती परिस्थितीत पिक उगवल्यानंतर ताबडतोब हलके पाणी देऊन अथवा कोरडवाहू परिस्थितीत जमिनीत वरचा थरात ओल उपलब्ध असल्यास  पेरणीपासून 8-10 दिवसांनी दोन झाडातील अंतरानुसार खांडण्या भरून घ्याव्या.

विरळणी :-

  • पिक उगवल्यानंतर साधारणत: 10-12 दिवसांनी दोन रोपांतील अंतरानुसार (15 सेमी किंवा 30 सेमी) विरळणी करावी,जेणेकरून प्रतिएकरी झाडांची संख्या 50000 ते 60000 चे दरम्यान राखल्या जाईल.
  • करडई पिकाचे लागवडी दरम्यान उत्पादन वाढीचे दृष्टीने,पेरणीचे अंतरानुसार प्रति एकर झाडांची संख्या योग्य प्रमाणात राखणे सर्वात महत्वाची बाब ठरते. त्याकरिता खांडण्या भरणे तसेच विरळणी करणे या बाबी उत्पादनवाढीच्या दृष्टीने महत्वाच्या ठरतात.

तणव्यवस्थापन :

  • कोरडवाहू परिस्थितीत जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याचे दृष्टीने तसेच पिक तणरहीत ठेवण्याचे दृष्टीने सुरूवातीच्या 15-45 दिवसात आवश्यकतेनुसार 2-3 डवऱ्याचे फेर मजुरांच्या सहाय्याने एक निंदण द्यावे.

शेंडे खुडणे :- पिक बोंड / कळी अवस्थेत येण्याच्या साधारणत: 10 ते 12 दिवस आधी शेंडे खुडून घ्यावे जेणेकरून अतिरिक्त वाढीस प्रतिबंध बसुन जास्तीत जास्त फांद्या येण्यास मदत होईल.

ओलीत व्यवस्थापन :-

करडई पिकाच्या महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थांमध्ये प्रामुख्याने कळी अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था परिपक्कतेची अवस्था यांचा आंतर्भाव होतो त्यादृष्टीने

बागायती परिस्थितीत पाण्याच्या उपलब्धतेनुसार खालीलप्रमाणे व्यवस्थापन करावे

  • एका ओलीताची सोय असल्यास पेरणीपासुन 50 दिवसांनी 
  • दोन ओलीतांची सोय असल्यास पेरणीनंतर 30 50 दिवसांनी. 
  • तीन ओलीतांची सोय असल्यास पेरणीनंतर 30,50 65 दिवसांनी.
  • ओलीत करतांना शेतात पाणी जास्त काळपर्यंत साचुन राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.
  •  करडई पिकाच्या कुठल्याही वाढीचे अवस्थेत शेतात जास्त काळ पाणी साचुन राहिल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळून आले आहे.
  • कोरडवाहु परिस्थितीत पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे मुलस्थानी संवर्धन करण्याचे दृष्टीने, जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा यथायोग्य व्यवस्थापन करण्याचे दृष्टीने तसेच मोसमी पावसाच्या परतण्याचेवेळी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थापन करडई पिकाचे उत्पादन वाढीचे दृष्टीने महत्वाची बाब ठरतात.

कापणी मळणी :-

  • झाडांची पाने बोंड्या पिवळ्या पडल्यानंतर, परिपक्वतेचा गुणधर्मानुसार मजुरांच्या सहाय्याने अथवा कंबाईन हारवेस्टरच्या सहाय्याने कापणी मळणी करावी. 
  • पिकाची कापणी शक्यतोवर सकाळच्या वेळी करावी. 

करडई पिकाचे उत्पादन वाढीचे दृष्टीने पेरणीपासुन सुरुवातीच्या 65 दिवसांतील व्यवस्थापन महत्वाची बाब ठरते त्या दृष्टीने या पिकाचे लागवडी दरम्यान नियोजन करावे. 

प्रा. जितेंद्र दुर्गे

 सहयोगी प्राध्यापक (कृषि विद्या)

 श्री शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती

  मो.नं. 9403306067

 

प्रा. हेमंत डिके 

सहाय्यक प्राध्यापक (कृषि विद्या) 

विभागीय संशोधन केंद्र, अमरावती 

डॉ. पं.दे.कृ.वि. अकोला 

 

Leave a comment