आंबे गळण्याचे प्रमाण कमी कसे करावे ? याबद्दल संपूर्ण माहिती एकदा वाचा

0

शेतकरी मित्रांनो आता हळू – हळू आंब्याच्या झाडांना तुम्हाला मोहर लागलेला दिसत असेल व काही ठिकाणी त्याच मोहरापासून झाडाला छोटे – छोटे आंबे लागलेले तुम्हाला पाहायला मिळतील.  परंतु आंबे लागल्यानंतर बारीक आंबे गळण्याचे प्रमाण देखील खूप असते व त्यामुळेच आपले झाडाचे एकूण उत्पादन देखील खूप कमी होते.  म्हणूनच आपण आज आंबा फळगळीची समस्या येण्यापूर्वीच तिचे समाधान शोधणार आहोत व तसे आपल्या आंबा पिकाचे पूर्व नियोजन देखील करणार आहोत.

– बागेत एकाच जातीची झाडे लावल्यास 40 – 50 टक्के संयुक्त फुलांचे परागीकरण होत नाही. परिणामी त्यांचे फक्त अंडाशय वाढून गळ होते.

–  त्यामुळे आंबा बाग लावताना 10 टक्के इतर जातीची झाडे लावणे महत्त्वाचे ठरते.

– ज्या बागांमध्ये नुकतीच फळधारणा सुरू झाली आहे तेथे ताबडतोब 50 पीपीएम (50 मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) जिब्रेलिक ॲसिडची फवारणी केल्यास फळगळ रोखण्यास मदत मिळणार आहे.

– बहुतांश आंबा झाडांची फळगळ ही अन्नद्रव्यांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे होते. अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात फळांची गळ होते. ही फळगळ रोखण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट 1 टक्का (10 ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. तसेच फळांच्या विविध अवस्थेत युरिया 2 टक्के (20 ग्रॅम प्रतिलिटर पाणी) अधिक एन ए ए 20 पीपीएम (20 मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) याची 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

– बऱ्याच आंबा झाडांना सुरवातीच्या अवस्थेत आवश्‍यकतेपेक्षा जास्त फळधारणा होत असते. सर्व फळांना पोसण्याची क्षमता झाडामध्ये नसते. त्यामुळेही फळगळ होताना दिसते. फळे पोसण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी युरिया 2 टक्के (20 ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी.

– आंबा फळांची वाढ होण्यासाठी व फळगळती थांबविण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्‍यकता असते. वाढीच्या काळात पाणी न मिळाल्याने फळांची मोठ्या प्रमाणात गळ होत असते. त्यामुळे आंबा फळे वाटाणा आकाराची झाल्यानंतर दर दहा दिवसांच्या अंतराने तापमानवाढीचा अंदाज घेऊन पाणीपुरवठा करावा. जेणेकरून फळगळ थांबणे सोईचे होईल.

– काही बागांतील आंबा झाडांवर बोर, लिंब एवढ्या आकाराची फळे व मोहर तसेच नवीन पालवी तिन्ही एकाचवेळी दिसत आहे. नवीन पालवी अन्नद्रव्य ओढून घेत असल्यामुळेही फळांच्या पोषणासाठी अन्नद्रव्य कमी पडून फळगळ होत आहे. अशावेळी होणारी फळगळ रोखण्यासाठी 12:61:0 या विद्राव्य खताची 2 टक्के (20 ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. गळून पडलेली फळे वेचून बागेबाहेर नेऊन त्यांची विल्हेवाट लावावी जेणेकरून कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळणे सोईचे होईल.

विनोद धोंगडे नैनपुर

 

Leave a comment