कसा वाढवाल जमिनीतील सेंद्रिय कर्ब ? जाणून घ्या
वर्षानुवर्षे एकाच जमिनीतून पाण्याच्या उपलब्धतेनुसार दोन किंवा तीन पिके घेतली जातात. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण व संतुलन बिघडत आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत चालला आहे. सातत्याने वाढत असलेल्या लोकसंख्येची अन्नाची गरज मर्यादित क्षेत्रातून भागवायची आहे. अशा वेळी जमिनीची सुपीकता वाढविणे किंबहुना ती टिकून राहणे भविष्यात अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे.
आपल्या जमिनीचा सामू दिवसेंदिवस वाढत म्हणजे विम्लयुक्त होत चालला आहे.सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.०१ ते ५ टक्के असावे. परंतु, आपल्याकडील भौगोलीक परिस्थिती व वातावरण यामुळे ही मात्रा अत्यंत कमी म्हणजे ०.०२ पासून ते कमाल ०.०६ पर्यंत आहे. आपल्याकडे असलेल्या जास्त तापमानामुळे सेंद्रिय कर्बाचे ‘ऑक्सिडेशन’ होते. उसाचे पाचट, कडबा, भाताचे तुस जाळणे, रासायनिक खतांचा अमर्याद वापर आदी कारणांमुळे हा कर्ब कमी होत चालला आहे.
सेंद्रिय कर्ब हे मातीतील असंख्य सूक्ष्मजीवांचे अन्न आहे. सूक्ष्मजीव जमिनीतील खतांमधील अन्नद्रव्ये वनस्पतींना उपलब्ध करून देतात. हे लक्षात घेऊन जमिनीची सुपीकता वाढवण्याकडे लक्ष द्यावे.
सेंद्रिय कर्बामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा होऊन जमिनीचे आरोग्य चांगले राहते.वनस्पती स्वतःला लागणारे अन्नद्रव्य सेंद्रिय स्वरुपात घेत नाहीत. ज्या वेळी सूक्ष्मजीवांकडून सेंद्रिय घटकांचे विघटन होते त्यानंतरच असेंद्रिय (रासायनिक) स्वरुपात सर्व अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
आपल्याला पिढ्यानपिढ्या जमिनीच्या माध्यमातून अधिकाधिक पीक उत्पादन घ्यावे लागते. म्हणूनच जमिनीची चिरस्थायी उत्पादकता नियंत्रित ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्बाच्या योग्य व्यवस्थापनास महत्त्व आहे. राज्यातील माती परीक्षण अहवालाचा तुलनात्मदृष्ट्या अभ्यासावरून असे आढळले की सेंद्रिय कर्ब, एकूण नत्र, उपलब्ध स्फुरद आणि उपलब्ध पालाशचे जमिनीतील प्रमाण कमी झाले आहे. याचाच अर्थ असा की सेंद्रिय कर्बाचा प्रत्यक्ष परिणाम उपलब्ध नत्र आणि उपलब्ध स्फुरदाच्या साठ्यावर आणि अप्रत्यक्षरीत्या उपलब्ध पालाशच्या प्रमाणावर झाला आहे.
जैवीक शेतकरी
शरद केशवरावबोंडे
९४०४०७५६२८