बॅंक कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये हमरीतुमरी
पीक कर्जासाठी प्रचंड गर्दी झाल्यानंतर बॅंक कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये हमरीतुमरी होऊन प्रकरण मारहाणीपर्यंत गेले होते. मात्र गावात बोभाटा झाल्यानंतर आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर या प्रकरणात बॅंक कर्मचाऱ्यासह शेतकऱ्यानेही घुमजाव केले आहे.
हा प्रकार महागाव युनियन बॅंकेच्या शाखेत मंगळवारी म्हणजेच १ डिसेंबर २०२० रोजी सकाळच्या सुमारास घडला.
पीक कर्जासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँके समोर एकच गर्दी केली होती. कामात उशीर होत असल्याचे पाहून शेतकरी अस्वस्थ झाले. त्यातून बॅंक कर्मचारी आणि शेतकऱ्यांची हुज्जत सुरू झाली. बोंढारा येथून आलेल्या एका शेतकऱ्याला बँक कर्मचाऱ्याने मारहाण केल्याची चर्चा पसरली. प्रत्यक्षात शेतकऱ्याने पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली. परंतु बॅंकेतील सीसीटीव्ही फुटेज पाहता ही तक्रार तथ्यहीन असल्याचे स्पष्ट झाले.
शेतकऱ्यानेही बॅंकेची माफी मागत आपली तक्रार मागे घेतली. बॅंकेचे अग्रीकल्चर ऑफीसर अक्षय घाटे यांनी पोलिसांना घटनेबाबत सविस्तर माहिती सांगितली. शेतकऱ्याने स्वत:च भिंतीवर स्वत:चे डोके आदळून घेतल्याचे सांगितले. या घटनेची फिर्याद पोलीस ठाण्यात प्राप्त झाली असून चौकशी सुरू असल्याची माहिती दुपारी ठाणेदार बालाजी शिंगेपल्लू यांनी दिली. दरम्यान सायंकाळी शेतकऱ्याने स्वत:च तक्रार मागे घेतल्याने प्रकरण निस्तरले.