गटशेती- समृद्धीचा मार्ग, गटशेती म्हणजे काय? जाणून घ्या
गटशेती म्हणजे काय? शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितार्थ एकत्रित येऊन चालवलेली योजना म्हणजे गटशेती. गटशेती म्हणजे शेतीतून फक्त उत्पादन घेणे नाहीतर उत्पादनाला शेतीपूरक जोडधंद्याची साथ देणे, जसे कि दुग्ध व्यवसाय, रेशीम व्यवसाय, कुक्कुटपालन, भाजीपाला प्रक्रिया, रोपवाटिका, खादीग्राम उद्योग इत्यादी व्यवसाय करणे आणि उत्पादन मिळवणे.
पूर्वीच्या काळी असणाऱ्या एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये शेतीतून उत्पन्न घेणे सोपे व सुलभ होते. पण सध्या एकत्र कुटुंब पद्धतीचे विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये होणाऱ्या रूपांतरामुळे जमिनीचे विभाजन होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वैयक्तिकरीत्या शेती करत असताना उत्पादन, यांत्रिकीकरण, मनुष्यबळ, सिंचन सुविधा तसेच शेतीच्या आधुनिकीकरणावर मर्यादा येऊन उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे आणि उत्पादकता कमी होत चाललेली आहे.
म्हणून याऐवजी गट शेतीचा सुगम मार्ग अवलंबून गटपद्धतीने शेती केली तर खते, बी-बियाणे, औषधे इत्यादी शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची मागणी एकत्रित स्वरूपात केली तर वस्तू स्वस्त भावात मिळतीलच अन वेळेची बचतसुद्धा होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादित मालाची विक्री सुलभ व सोईस्करपणे करून अधिक भाव मिळवता येईल.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील ७० टक्के जनतेला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळतो , पण वाढत्या शहरीकरणामुळे विस्थापित झालेला जनसमुदाय व असंख्य शेतकऱ्यांमध्ये विखुरलेला शेती व्यवसाय, शेतीची होत चाललेली दुरावस्था यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे. शेतीसारख्या पारंपारिक क्षेत्रामध्ये बदलत्या काळाप्रमाणे, बदलत्या जाणिवा, बदलते प्रवाह आपल्यामध्ये सामावून घेताना आपल्याला गट शेतीला अनन्यसाधारण महत्व देण्याची गरज आहे.
१९७०-१९७१ च्या कृषिगणनेनुसार जमीनधारणा ही ४.२८ हेक्टर म्हणजेच १०-११ एकर अशी होती आणि २०१०-२०११ च्या कृषिगणनेनुसार ती १.४२ हेक्टर म्हणजेच २.५०-३.५० एकर आहे. वैयक्तिकरित्या शेती करत असताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. यामध्ये प्रामुख्याने दिवसेंदिवस कमी होत चालली जमीनधारणा व शेतीचे असंख्य तुकड्यांमध्ये झालेले विभाजन यामुळे यांत्रिकीकरण तसेच आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अपुरा वाव मिळत आहे. शेतीसाठी भांडवल मर्यादा, मनुष्यबळ कमी पडणे, पाणीटंचाई, विक्रिसमस्या अश्या निरनिराळ्या कारणांमुळे शेती हा व्यवसाय आर्थिक आणि भौतिक संकटात सापडलेला आहे.
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो या कण्याला मजबूत करण्यासाठी गटशेती ही एक उत्तम उपाययोजना आहे. गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात उपाययोजना चालू आहेत जसे कि महाराष्ट्र शासना अंतर्गत
१) राष्ट्रीय फलोत्पादन अभियान
२) कृषीयांत्रिकीकरण अभियान
३) सूक्ष्मसिंचन अभियान
४) अन्नप्रक्रिया अभियान
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पॅकहाऊस, अन्नप्रक्रिया यंत्र, पॉवर टिलर, पॉवर फवारणी यंत्र अशा विविध शेतीविषयक गोष्टींसाठी अनुदान गटशेतकऱ्यांना मिळू शकते.
आत्मा अंतर्गत गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देणे, शेतकऱ्यांना शेतीविषयक तसेच शेतीपूरक व्यवसायासाठी आवश्यक माहिती देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रभेटीचे आयोजन करणे, विविध कार्यशाळा इत्यादींचा लाभ प्राधान्याने सामूहिक शेती करणारा गट किंवा गटशेतकरी घेऊ शकतो. नाबार्ड बँक अंतर्गत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होऊ शकते.
गटशेती करताना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत
– शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गट तयार करणे.
– गट तयार केल्यानंतर रीतसर नोंदणीसाठी कृषी विभागामार्फत आत्मा यंत्रणेला नोंदणी करणे आवश्यक आहे.
– गटामध्ये कमीत कमी अकरा सदस्य आणि जास्तीत जास्त वीस सदस्य असावेत आणि पीकक्षेत्र हे शंभर एकर पर्यंत असावेत.
– त्यासाठी शेती हि भौगिलिक परिस्थितीने सारखी आणि सलग स्वरूपाची असावी.
– गटाचा सभासद होण्यासाठी स्वतः शेतकरी असणे आवश्यक आहे. गट तयार करत करताना गटातील सदस्य हे समान विचारसरणीचे आणि सकारात्मक दृष्टीकोनाचे असावेत.
– गटातील सदस्य समान आर्थिक स्तर असलेले असावेत.
– सभासदांमध्ये आपआपसांत हेवेदावे नसावेत.
– गटात दोन-तीन महिलांचासुद्धा समावेश असावा, त्यामुळे सामंजस्य टिकवण्यासाठी मदत होते.
– दरमहा बचत गोळा करून बँकेत खाते उघडणे गरजेचे आहे,त्यामुळे आर्थिक समस्यांच्या वेळेस यांची मदत होईल.
– गटातील सदस्यांनी ठराविक तारखेला नियमित बैठक घेणे आवश्यक आहे, ज्यामध्ये आर्थिक अहवाल आणि भविष्यातील कार्याचा आराखडा आखणे.
– आर्थिक व्यवहारात पारदर्शकता असणे, एकमेकांमध्ये विश्वास असणे आवश्यक आहे.
– गटाच्या नियोजनामध्ये गोंधळ होऊ नये याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे.
सुदामा रा. काकडे, पी.एचडी स्कॉलर
शिवानी स. देसाई, एम. टेक स्कॉलर
गणेश ना. शेळके, पी.एचडी स्कॉलर
(अन्नप्रक्रिया व तंत्र विभाग) म. फु. कृ. वि., राहुरी
7038587754
महत्वाच्या बातम्या : –
‘शेतकरी आंदोलनाला बळ देण्यासाठी पैसा, दारू पुरवा’
रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसोबत केला व्हॅलेंटाईन डे साजरा
उडद डाळ खाण्याचे फायदे जाणून घ्या
आवळ्यातील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन