‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६ शेतकऱ्यांची नोंदणी

0

हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील शेतकऱ्यांना चांगले अर्थार्जन व्हावे, यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मँगोनेट सुविधेचा लाभ घेतात. गतवर्षी जिल्ह्यातील ९३७  शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी केली होती. गेल्या सात वर्षांत ४, ५६६ शेतकऱ्यांनी मँगोनेट अंतर्गत नोंदणी केली आहे. या वर्षीही मँगोनेट अंतर्गत नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणच्या हापूसला चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे ‘मँगोनेट’ सुविधा ग्रेप्सनेटप्रमाणे सुरू करण्यात आली. ग्रेप्सनेटच्या माध्यमातून द्राक्षांची परदेशात निर्यात केली जाते. या धर्तीवर हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी ‘मँगोनेट’चा पर्याय सात वर्षांपूर्वी निवडण्यात आला. नोंदणी दरम्यान बागायतदार कोणत्या देशात हापूसची निर्यात करण्यास इच्छुक आहे. त्याची माहिती ऑनलाइन नोंदवून, त्या देशांच्या सूचनेनुसार कोकणातील हापूस पिकवला जात असल्याने दर्जेदार हापूसचे उत्पादन घेण्यात येते.

२०१४-१५पासून मँगोनेट सुविधा सुरू करण्यात आली. तर दर वर्षी नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्यात येते. मँगोनेटला शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढावा, यासाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मँगोनेट अंतर्गत ४५६६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, या शेतकऱ्यांना दर वर्षी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे क्रमप्राप्त आहे.

कृषी विभागाकडून नोंदणीचे आवाहन
जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुऱ्हाडे म्हणाल्या, ‘‘गेली दोन वर्षे कोरोनामुळे निर्यातीवर परिणाम झाला होता. परंतु या पूर्वी मँगोनेटच्या माध्यमातून जिल्ह्यातील आंबा मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात करण्यात आला आहे. युरोप, जपान, अमेरिका येथील व्यावसायिकांनी रत्नागिरीतील काही शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन पाहणी करून आंब्याची मागणी केली होती. त्यामुळे येथील बागायतदारांना चांगला दर मिळाला होता. या वर्षीही मँगोनेटतंर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी.’’

Leave a comment