शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम; दोन्ही बाजूंमध्ये आज पुन्हा होणार चर्चा
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यास दिल्ली पोलिसांनी शेतकरी संघटनांच्या नेत्यांना गुरुवार म्हणजेच २१ जानेवारी २०२१ रोजी च्या बैठकीत परवानगी नाकारली. हरियानातील एका एक्स्प्रेस वे वर ट्रॅक्टर रॅली काढा असा पोलिसांनी शेतकऱ्यांना प्रस्ताव दिला मात्र पोलिसांचा हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी साफ फेटाळला आहे.
याबाबत दोन्ही बाजूंमध्ये आज म्हणजेच २२ जानेवारी २०२१ रोजी पुन्हा चर्चा होणार आहे. तसेच गुरुवार म्हणजेच २१ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी उशिरा झालेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत तीनही कृषी कायदे रद्द करणे आणि हमीभावाचा कायदा करण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ५७ दिवस दिल्लीच्या विविध सीमांवर देशभरातील हजारो शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. मात्र केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये व आंदोलक शेतकऱ्यांवर बळाचा वापर करण्याचा विचारही मनात आणू नये, असे शेतकरी नेत्यांनी सरकारला मागच्या बैठकीत स्पष्टपणे सांगितले आहे. सरकारच्या ताज्या प्रस्तावावर गुरूवारी ४१ संघटनांच्या नेत्यांची दीर्घ बैठक होऊन तीत सरकारच्या प्रस्तावावर काय भूमिका घ्यायची यावर चर्चा झाली.
प्रस्तावित ट्रॅक्टर रॅलीत हजारो ट्रॅक्टर सहभागी होतील व प्रजासत्ताक दिनाप्रमाणे त्यात चित्ररथही असतील असे सांगण्यात आले. सिंघू, टिकरी, चिल्ला व शहाजहानपूर सीमांवर त्या चित्ररथांच्या निर्मितीची जोरदार तयारी शेतकरी करत आहेत. महाराष्ट्रातील सुमारे १००० शेतकरी लोकसंघर्ष समितीच्या झेंड्याखाली दिल्लीत पोहोचले आहेत. हे सारे जण २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होतील असे समितीच्या प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या : –
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर
अहमदनगरमध्ये कांद्याला मिळाला 3000 ते 3400 रुपये भाव