राज्यात अनेक ठिकाणी कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

0

दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात विविध संस्था, संघटनांनी आंदोलन केले. या वेळी शेतकरी विरोधी कायदे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे, रास्ता रोको, शेतीमाल फेको, आत्मक्लेष आंदोलने करण्यात आली असून सांगलीमध्ये सर्व पक्षीय कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार  म्हणजेच ३ डिसेंबर २०२० रोजी निदर्शने करण्यात अली.

विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमेर आंदोलकांनी निदर्शने केली. दिल्ली येथील आंदोलकांशी चर्चा करण्याऐवजी वेळकाढू भूमिका घेणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला. सर्व पक्षीय कृती समितीने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले.

परभणीत  परभणी- गंगाखेड राज्य मार्गावरील पोखर्णी फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या मुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली. नांदेडमध्ये  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय जागर भजन आंदोलन करण्यात आले. सायंकाळी सात ते रात्री बारा या दरम्यान जागरण, भजन आंदोलन करण्यात आले, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे यांनी दिली.

साताऱ्यात संयुक्त किसान संघर्ष समन्वयच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कामगार शेतकरी संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान सभा, बळिराजा शेतकरी संघटना, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

संगमनेर मध्ये छात्रभारती संघटनेने पाठिंबा दिला.  संगमनेर येथील बसस्थानकासमोर त्यासाठी आंदोलन करण्यात आले. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुलडाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संग्रामपूर तालुक्यातील बोडखा शिवारात झाडावर चढून आत्मक्लेष आंदोलन केले. विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.

 

.

Leave a comment