खानदेशातील वातावरणाचा शेतीकामांना फटका
खानदेशात गेले चार-पाच दिवस ढगाळ वातावरण आहे. यातच गारपीट, पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केळीची लागवड खानदेशात तापी, गिरणा, अनेर, सुसरी आदी नद्यांच्या लाभक्षेत्रात केली जाते. या भागातील शेतरस्त्यांची स्थिती बरी नाही.
केळीचे दर सध्या बरे आहेत. पण, वातावरण गेले दोन दिवस अतिशय खराब असल्याने केळीची काढणी अनेक भागात खरेदीदार टाळत आहे. कारण, खरेदीनंतर केळीचे गारपीट, पावसाळी स्थितीत नुकसान झाल्यास मोठी वित्तीय हानी येऊ शकते.
केळीची काढणी सध्या जळगाव जिल्ह्यातील यावल, पाचोरा,चोपडा, धुळ्यातील शिरपूर भागात अधिक सुरू होती. रोज १३० ते १३५ ट्रक केळीची आवक सुरू होती. परंतु, गेले दोन दिवस केळीची काढणी रखडत सुरू आहे.
फक्त मुख्य मार्ग, वाहतुकीची चांगली व्यवस्था असलेल्या भागात खरेदीदार केळीची काढणी करीत आहेत. यातच उत्तर भारतातही वातावरण खराब झाल्याने केळी वाहतूक, काढणीचा धोका खरेदीदार फारसा पत्करत नसल्याचे चित्र आहे. केळीचे दर काढणी कमी असली तरी किमान ८०० व कमाल ११६० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
प्रतिकूल वातावरणामुळे काढणी व इतर शेतीकामे रखडत सुरू आहेत. शेतकऱ्यांमध्ये गारपिटीचा धसका आहे. दर महिन्याला वातावरण खराब होत असल्याने रब्बीबाबतही निराशाजनक स्थिती तयार होत आहे. गेले दोन दिवस सूर्यदर्शन नाही. तसेच गेले सात ते आठ दिवस ढगाळ वातावरण आहे. थंडी गायब झाली आहे. यामुळे काकडी, कोबी, हिरवी मिरची या पिकांमध्ये रोगराई पसरण्याचीभिती आहे. फवारणी घेण्याचे नियोजन शेतकरी करीत आहेत.