‘कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करु नका’

0

काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आज विविध कारणांची चांगलीच गाजली. त्यात काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुकीचा मुद्दा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आनंद शर्मा आणि गुलाम नबी आझाद यांना सुनावलेले खडे बोल याचा समावेश आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शेतकरी आंदोलन ते अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. केंद्र सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशिलता आणि अहंकार दाखवत असल्याचा घणाघाती आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे.

काँग्रेस वर्किंग कमिटी अर्थात CWCच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या सोनिया गांधी यांनी कृषी कायद्यांवरुन सरकारवर जोरदार टीका आणि आरोप केले आहेत. 3 कृषी कायद्ये घाईगडबडीत तयार करण्यात आले आणि संसदेत त्यावर कुठलीही चर्चा करण्यात आली नाही, असं सोनिया यांनी म्हटलंय. कृषी कायद्याबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही त्या कायद्यांना सुरुवातीलाच विरोध केला आहे. कारण ते अन्न सुरक्षेला संपवणारे आहेत. अन्न सुरक्षा हा मुद्दा MSP, सार्वजनिक खरेदी आणि PDS वर आधारलेला आहे, असंही सोनिया म्हणाल्या. लसीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करु नका. त्यांच्या मागण्यांवर विचार व्हावा. आपल्या देशातील लोकांनी खूप कष्ट झेलले आहेत, असं सोनिया गांधी म्हणाल्या. त्याचबरोबर वर्तमान सरकारमध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ सुरु आहे. लष्करी कारवाईची गुपितं बाहेर काढणं हा देशद्रोह असल्याचंही सोनिया गांधी म्हणाल्या.

पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या चॅट प्रकरणावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अर्णव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी अर्णव यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. गेल्या काही दिवसात आपण धक्कादायक बातम्या वाचल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षेशी कशा पद्धतीने खेळल्या जातयं हे आपण पाहिलं आहे.

जे लोक दुसऱ्यांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्रं देत होते. त्यांचा पूर्णपणे पर्दाफाश झाला आहे, असा हल्ला सोनिया गांधी यांनी चढवला. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर विषय आहे. गेल्या काही दिवसात गोपनीय माहिती समोर आली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून केंद्र सरकारने मात्र त्यावर मौन बाळगलं आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. सरकारला खासगीकरण करण्याची प्रचंड घाई झालेली दिसतेय, असा टोला सोनिया गांधी यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या : –

शेतकरी आंदोलन : फडणवीसांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

‘हे तर पवारांचे स्वत: विरुद्धच आंदोलन’, भाजपची टीका

द्राक्ष हंगामास उशीर, काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता

जाणून घ्या औषधी वेल कलिहारीची लागवड कशी करावी

जनधन योजनेंतर्गत ४१ कोटीहून अधिक लोकांनी या खात्याचा घेतला लाभ

Leave a comment