बटाटा पिकावरील करपा रोग व त्याचे एकात्मिक व्यवस्थापन

0

शेतकरी बंधूंनो बटाटा पिकात प्रामुख्याने दोन प्रकारच्या करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो.

(१) उशिरा येणारा करपा : बटाटा पिकात उशिरा येणारा करपा हा रोग फायटोप्थोरा इन्फेस्टन्स या बुरशीमुळे होतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे बटाटा पिकात पानावर पानथळ फिक्कट तपकिरी गोलाकार ठिपके दिसून येतात. ढगाळ व पावसाळी थंड वातावरणात या रोगाचे प्रमाण जास्त वाढते आणि पाने करपून गळतात. ढगाळ हवामानात सर्वप्रथम पानाच्या खालच्या बाजूस बुरशीची पांढरट वाढ झालेली दिसून येते. बटाट्यावर सुद्धा हा रोग येऊन बटाटे तपकिरी जांभळट रंगाचे होतात आणि त्यामुळे बटाटे मलूल होऊन काढणीपूर्वी कुजतात. रोगाची बुरशी म्हणजे रोगग्रस्त बटाटे जमिनीत सुप्तावस्थेत राहते आणि यानंतर पाऊस वारा आणि पाण्याद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
(२) लवकर येणारा करपा : बटाटा पिकात लवकर येणारा करपा हा रोग अल्टरनेरिया सोलेनी या बुरशीमुळे होतो. बटाटा पिकात लवकर येणारा करपा या रोगाच्या बुरशीमुळे पानावर गोलाकार तपकिरी काळे रंगाचे वलयांकित ठिपके दिसतात. रोगाचे प्रमाण जास्त असल्यास पाने करपून गळतात. बटाटे तपकिरी काळे पडून कुजतात. या रोगाचा प्रादुर्भाव झालेले बटाटे साठवणुकीत सडतात. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे बटाट्याच्या उत्पादनात घट येते. रोग कारक बुरशी रोगग्रस्त बटाट्यामध्ये जमिनीत सुप्तावस्थेत राहते. यानंतर हवा पाणी यामार्फत या रोगाचा प्रसार होतो.

बटाटा पिकावरील करपा रोगासाठी एकात्मिक व्यवस्थापन योजना

(१) बटाटा पिकानंतर टोमॅटो किंवा टोमॅटो पिकानंतर बटाटा पीक घेणे टाळावे तसेच पिकांची फेरपालट करावी.
(२) लागवडीसाठी रोगमुक्त बियाण्याचा म्हणजे रोगमुक्त बटाट्याचा वापर करावा.
(३) लागवड करताना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रोगप्रतिकारक जातीचा वापर लागवडीसाठी करावा.
(४) पीक तणविरहित ठेवावे.
(५) बटाट्या वरील करपा या रोगाच्या व्यवस्थापनासाठी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच योग्य निदान करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खालील पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची निर्देशीत प्रमाणात फवारणी करावी आवश्यकतेनुसार पुन्हा एकदा बुरशीनाशक बदलून पंधरा दिवसांनी फवारणी करावी.
Chlorothalonil 75% WP 25 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी
किंवा
Probineb 70 % WP 30 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी
किंवा
Mancozeb 75% WP 25 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी
किंवा
Azoxystrobin 23 %SC 10 मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवा
Metalaxyl 8% + Mancozeb 64 WP संयुक्त बुरशीनाशक 25 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी
किंवा
Cymoxanil 8 % + Mancozeb 64% WP हे संयुक्त बुरशीनाशक 25 ते 30 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी
या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका बुरशीनाशकाची संबंधित रोगाचे निदान करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करावी आणि गरजेनुसार वन निर्देशीत बुरशीनाशक बदलून पुन्हा पंधरा दिवसांनी गरजेनुसार फवारणी करावी.

टीप

(१) रासायनिक बुरशीनाशके वापरण्यापूर्वी लेबल क्‍लेम शिफारशीची शहानिशा करावी व बुरशीनाशकाचा वापर लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे करावा
(२) बुरशीनाशकाचा वापर करताना अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी तसेच फवारणी करताना निर्देशीत प्रमाण व इतर लेबल क्‍लेम शिफारशीत बाबी पाळाव्यात
(३) रसायनाचा वापर करताना सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा अंगिकार करावा व सुरक्षा किट वापरावा.
(४) निर्देशित उपायोजना अंगीकार करण्यापूर्वी रोगाची योग्य निदान करून प्रत्यक्ष तज्ञाचा सल्ला घ्यावा.

राजेश डवरे,                                                                                                                     कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

 

Leave a comment