ढेमसे लागवड पद्धत

0

जमीन व हवामान :
सर्व साधारणपणे हलकी ते मध्यम काळ्या जमिनीत ढेमसे या पिकाची लागवड केली जाते. तरी हलकी जमीन या पिकास चांगली मानवते. या पिकाची बाराही महिने लागवड केली तरी चालते. अती उष्ण किंवा दमट हवामान या पिकास मानवत नाही. त्यासाठी कोरडे हवामान या पिकास चांगला प्रतिसाद देते.

जाती व बियाणे:
माहिको MTNH1, महोदया टिंडा, अन्नामलाई, इ. बियाणे वापरावे. एकरी २ किलो बी पुरेसे होते. या बियाचे कवच दोडका, घोसाळी, भोपळा या पिकाच्या बियांपेक्षा कडक असल्याने उगवण फार कमी होते. त्यासाठी १ लिटर पाणी कोमट करून त्यात ५०० मिली गोमूत्र टाकून १ किलो बी रात्रभर भिजत ठेवावे. नंतर सावलीत सुकवून लावावे.

लागवड :
जमिन हलकी असेल तर ३ x २ फूट अंतर ठेवावे. भारी जमिनीत ५ x २ फूट अंतर ठेवावे. भारी जमिनीत वेलांची वाढ भरपूर होते. साधारण जमिनीच्या प्रकारानुसार लागवडीतील अंतर ठेवावे. बी लावताना सुरुवातीला हुमिक ९८% सेंद्रिय खत १ – १ चमचा टाकून त्यात बी लावावे. त्याने जमीन भुसभुसीत होऊन जारवा व वेल वाढीस मदत होते.

खत व पाणी व्यवस्थापन :
या पिकास रासायनिक खत देऊ नये. त्याने या पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी शेणखत असेल तर ते वापरावे. उन्हाळ्यात ६ ते ७ दिवसाच्या अंतराने सकाळी ९ चे आत पाणी द्यावे. थंडीत ८ ते १० दिवसांच्या अंतराने सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत पाणी द्यावे. पाणी देताना भीज पाणी न देता, हलकेसे पाणी द्यावे. माल लागल्यावर मात्र (तोडे चालू असताना) पाण्याच्या पाळ्या लवकर द्याव्यात.

पीक संरक्षण :
या पिकामध्ये भुंगे, पांढरी माशी, फळमाशी, इ. किडींचा तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो. कारण हे पीक वेलवर्गीय असल्याने वेलची वाढ जमिनीलगत पसरत असते. तसेच पाने केसाळ लवयुक्त, मऊ असल्याने थंडीतील दव, धुके पानावर पडून बुरशी येते. तर उन्हाळ्यात वातावरण अती उष्ण असल्याने पाणी दिल्यानंतर जमीन तापलेली असते. त्यामुळे झाडाला उष्णतेच चटका बसतो. त्यामुळे बुरशी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव होतो. कीड व रोग नियंत्रणासाठी वेळो वेळी फवारणी करणे गरजेचे असते , कीड रोग याचे योग्य निदान करून फवारणी करावी.

तोडणी व ऊत्पादन :
साधारण ३५ ते ४५ दिवसात फुलकळी लागते. ५५ ते ६० दिवसांनी तोडणी सुरू होते. फळ साधारण लहान अमेरिकन सफरचंदाच्या आकाराचे झाल्यावर तोडणी करावी. या अवस्थेत मालाला फिकट हिरवा, पोपटी कलर येतो. नखाने दाबले असता, टोकले असता फळ मऊ असते. १ किलोमध्ये १० ते १४ फळे बसतात. फळे मोठी झाल्यावर वजन वाढते. परंतु फळे कडक बनतात व चवीला सपक लागतात. त्यामुळे भाव कमी मिळतो. त्यासाठी वेळेवर तोडणी करणे फायद्याचे ठरते. ढेमसे २ महिने सहज चालते. तीन दिवसानंतर तोडणी करावी लागते, अश्या १५ ते २० तोडण्या होतात. सर्वसाधारणपणे एकरी ५ ते १० टन ऊत्पादन निघते.

महत्वाच्या बातम्या : –

रब्बी ज्वारीची सुधारित लागवड पद्धत

नवीन तंत्रज्ञानाने शेती करुन तीन वर्षात फुलले शेतकऱ्याचे नशीब

नैसर्गिकरित्या करूयात पीकामधील कीड नियंत्रण

कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या ‘या’ दोन मागण्या सरकारने केल्या मान्य

शेतकऱ्यांना मिळतय माशांचे संवर्धन करण्याचे प्रशिक्षण

Leave a comment