उत्तर भारतातील काही राज्यांत थंडीची लाट

0

उत्तर भारतातील काही राज्यांत थंडीची लाट आली आहे. उत्तर भारतात असलेल्या थंडीच्या लाटेमुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे.  या भागांतील किमान तापमानाचा पारा खाली आला आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे.जम्मू- काश्मीर, लडाक, गिलगीत बाल्टीस्तान आणि मुझफ्फरबाद, ओडिशा, पश्‍चिम बंगाल या भागांत सरासरीच्या तुलनेत ३ ते ५ अंश सेल्सिअसने तापमानात घट झाली आहे. तर उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, पंजाब, दिल्ली, हरियाना, कराईकल, तमिळनाडू, विदर्भ या भागांत सरासरीच्या तुलनेत १ ते ३ अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

राज्यातही काही प्रमाणात थंडी वाढणार आहे. सध्या राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात थंडी आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे नीचांकी ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेशच्या पश्‍चिम भागातील चुर्क येथे २.६ अंश  सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंदविले गेले. एक ते दोन दिवसांत उत्तरेकडून थंड वारेचे प्रवाह वाहण्याची शक्यता असल्याने राज्यात थंडी वाढणार आहे.

रविवारी (ता. २७) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)ः मुंबई (सांताक्रूझ) २०.४ (३), ठाणे १८, रत्नागिरी २०.२ (१), डहाणू १९.९ (२), पुणे १३.६ (३), जळगाव १३.२ (२), कोल्हापूर १७.६ (२), महाबळेश्‍वर १५.३ (२), मालेगाव १४.४ (५), नाशिक १४.४ (४), निफाड १०.५, सांगली १५.४ (१), सातारा १४.७ (२), सोलापूर १३ (-३), औरंगाबाद १३.७ (२), बीड १५ (१), परभणी १३, परभणी कृषी विद्यापीठ ९.२, नांदेड १२ (-१), उस्मानाबाद १२ (-१), अकोला १३.८ (१), अमरावती १३.४ (-१), बुलडाणा १२.८ (-१), चंद्रपूर १०.६ (-३), गोंदिया ९ (-३), नागपूर ११.२ (-१), वर्धा ११.५ (-१), यवतमाळ ११ (-३).

तसेच हिंद महासागर आणि अंदमान समुद्राच्या दक्षिण भाग व बंगालचा उपसागर व परिसरात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. यामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळा तयार होत असल्याने राज्यातील काही भागांत हवामान किंचित ढगाळ आहे. यामुळे थंडीत चढ-उतार झाले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागात समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्रीवादळासाठी पोषक वातावरण आहे.

 

Leave a comment