देशात दिल्लीसह अनेक राज्यांत थंडी

0

देशात दिल्लीसह अनेक राज्यांत थंडी वाढली असून त्याची तीव्रता आणखी वाढणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. हिमाचल आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये आगामी तीन दिवस कडाक्याच्या थंडीचे असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

पंजाबमध्ये कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. राज्यातील अमृतसरमध्ये पारा सर्वात जास्त घसरल्याची नोंद करण्यात आली. या ठिकाणी तापमान 9.6 अंशापर्यंत खाली आले. अन्य जिल्ह्यांमध्ये तापमान 18 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.मागील काही दिवसांपासून असलेले ऊन, रविवारी झालेला पाऊस या सर्वांमुळे आज पंजाबमध्ये तापमानात घट झाली.

काश्मीरमध्ये सध्या थंडीची लहर आली आहे. येथे तापमान शून्य अंशाच्याही खाली गेले आहे. उत्तर काश्मीरमध्ये थंडीचा कहर जाणवत असून येतील गुलमर्ग भागात पारा -7.2 अंश सेल्सिअस पर्यंत घसरला आहे. तर रात्री गुलमर्ग येथील तापमान -6.5 अंश सेल्सिअस होते. दरम्यान, हवामानातील बदल आणि वाढती थंडी लक्षात घेऊन भारतीय हवामान खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मध्यप्रदेशमध्ये 22 ठिकाणी तापमान 4 ते 10 अंशादरम्यान नोंदवण्यात आले. राज्यतील होशंगाबाद येथे पारा 13 अंशापर्यंत घसरला. तर इंदौरमध्ये तापनान 12.5 अंशापर्यंत आले होते. भोपाळमध्ये तापमान 10 अंशापर्यंत घसरले असून येथे थंडीची तीव्रता जास्त आहे.

राजस्थानातील पर्वतीय वारे मैदानी प्रदेशाकडे वाहू लागल्यामुळे थंडी वाढली आहे. येथे तीन दिवसांपर्यंत थंडी वाढणार आहे. तसेच, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 30 डिसेंबर रोजी राज्यातील अनेक शहरांत पारा 3 ते 5 अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. हावामानातील हा बदल लक्षात घेऊन राजस्थानमधील काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a comment