
बायोचार निर्मितीचे तंत्र
बायोचार हा कोळशाचा एक प्रकार आहे. वनस्पतींची पाने, तण, लाकूड इत्यादी पदार्थ कमी हवेत ‘पायरोलिसिस’ या नियंत्रित ज्वलन पद्धतीद्वारे बायोचार तयार होतो. बायोचार सच्छिद्र असते.
बायोचार हा कोळशाचा एक प्रकार आहे. वनस्पतींची पाने, तण, लाकूड इत्यादी पदार्थ कमी हवेत ‘पायरोलिसिस’ या नियंत्रित ज्वलन पद्धतीद्वारे बायोचार तयार होतो. बायोचार सच्छिद्र असते. त्यामुळे कोणतेही द्रव स्वरूपातील खत यात जिरते. झाडाला ते दिल्यास त्याची हळूहळू उपलब्धता होते व झाडांची वाढ उत्तम होते. कंपोस्ट खत, सेंद्रिय खत, जिवाणू खत बायोचारमध्ये जिरवून वापरल्यास जिवाणूंची संख्या वाढते.
जमिनीत सेंद्रिय कर्ब २ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास ती जमीन सुपीक समजली जाते. शास्त्रज्ञांना अमेझॉनच्या खोऱ्यात काही ठिकाणी टेरा प्रेटा ही अत्यंत सुपीक जमीन आढळली. तेथे १० टक्क्यांपेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब आढळून आला. ही जमीन शेकडो वर्षांपूर्वी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी तयार केली होती. त्याच्या आजूबाजूच्या जमिनी मात्र नापीक आहेत. या सुपीक जमिनीत प्रामुख्याने बायोचार (सुपीक कोळसा) तसेच मासे व प्राण्यांची हाडे, मातीच्या भांड्यांचे तुकडे, कंपोस्ट खत आढळून आले. यामुळे बायोचारकडे जगातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले गेले आहे.
- विविध रसायनांच्या अनियंत्रित वापरामुळे जमिनींची प्रत खालवत आहे. पिकांच्या उत्तम वाढीसाठी जमिनीत १ टक्क्यापेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब असणे आवश्यक आहे. परंतु शेणखत व अन्न सेंद्रिय खतांचा वापर कमी झाल्याने जमिनीतील सेद्रिय कर्बाचे प्रमाण १ टक्क्यापेक्षा कमी झाले आहे.
- हवेतील कर्ब वायू सेंद्रिय कर्बामध्ये परावर्तित करून जमिनीत मिसळल्यास या दोन्ही समस्यांवर एकत्रित मात करता येईल.
- वनस्पतींचे अवशेष, पाने तण, काडीकचरा अनियंत्रित पद्धतीने जाळू नये. त्याऐवजी त्यापासून पावसाळ्यात कंपोस्ट खत आणि हिवाळा व उन्हाळ्यात बायोचार कोळसा शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविल्यास जमिनीसाठी सेंद्रिय कर्ब उपलब्ध होईल.
बायोचार
- बायोचार हा कोळशाचा एक प्रकार आहे. वनस्पतींची पाने, तण, लाकूड इत्यादी पदार्थ कमी हवेत ‘पायरोलिसिस’ या नियंत्रित ज्वलन पद्धतीद्वारे बायोचार तयार होतो.
- बायोचार सच्छिद्र असते. त्यामुळे कोणतेही द्रव स्वरूपातील खत यात जिरते. झाडाला ते दिल्यास त्याची हळूहळू उपलब्धता होते व झाडांची वाढ उत्तम होते. कंपोस्ट खत, सेंद्रिय खत, जिवाणू खत बायोचारमध्ये जिरवून वापरल्यास जिवाणूंची संख्या वाढते.
- बायोचार हे विम्लधर्मीय आहे. त्यामुळे आम्लधर्मीय व जांभा दगडाच्या लाल वरकस जमिनीत त्याचे अधिक चांगले परिणाम जाणवतात. अन्य प्रकारच्या जमिनीत कमी जास्त प्रमाणात चांगले परिणाम आढळतात.
- फक्त बायोचार जमिनीत वापरण्यापेक्षा त्यामध्ये इतर खते जिरवून वापरणे आवश्यक आहे. विशेषत: कर्बनत्र गुणोत्तराचा विचार करता बायोचार मध्ये गोमूत्र जिरविणे हा चांगला पर्याय आहे. गोमूत्र उत्प्रेरकाचे काम करते व खताची परिणामकारकता वाढवते.
- बायोचारमध्ये स्पंजप्रमाणे पाणी शोषले जाते. पाणी धरून न ठेवणाऱ्या वरकस जमिनीत त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. मात्र पाणी धरून ठेवणाऱ्या काळ्या जमिनीत त्याचा टप्प्याटप्प्याने मर्यादित वापर करावा.
पुणे येथील डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांच्या नेतृत्वाखाली बायोचार निर्मितीबाबत संशोधन सुरू आहे. त्यांनी बायोचार निर्मितीचे सोपे तंत्र विकसित केले आहे. त्यासाठी एक भट्टी आणि स्टोव्ह विकसित करण्यात आली आहे.
- आवश्यक मोजमाप घेऊन वर्कशॉप मधून ही भट्टी तयार करता येते. या भट्टीत बायोचार करताना धूर होत नाही. याशिवाय खाली निमुळत्या होत गेलेल्या शंकू आकाराच्या ५/३/२ खड्ड्यातही बायोचार करता येतो.
- खड्ड्याची वरील लांबी (व्यास) ५ फूट, खोली ३ फूट आणि तळाची लांबी (व्यास) २ फूट असावी.
- बायोचार तयार करतेवेळी सुरक्षिततेसाठी सोबत भरपूर पाणी ठेवावे.
- शक्यतो एका माणसाने बायोचार तयार करू नये.
- घरगुती चुलीतही काही प्रमाणात बायोचार तयार होतो.
बायोचार निर्मितीचे प्रयोग
- प्रवीण सावंत (पेंडूर, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) यांनी सोरटी या भात जातीची दोन आजूबाजूच्या शेतात लागवड केली. पहिल्या शेतात त्यांनी शेणखत व भाताच्या तुसापासून बनवलेला बायोचार वापरला. येथे ३० ते ३५ फुटवे आले. तसेच भात पडला नाही. शेजारच्या शेतात त्यांनी फक्त शेणखत वापरले. तेथे १० ते १५ फुटवे आले. तसेच अखेरीस भात पडला.
- तमिळनाडू राज्यात विलायती बाभूळ या काटेरी झाडामुळे जमिनीवर अतिक्रमण होत आहे. या झाडाचा बायोचार करून अन्य खत, पेंड यासोबत जिरवून वापरण्यात आले. हे मिश्र खत एकदा वापरल्यानंतर तीन हंगामांपर्यंत त्याचा चांगला परिणाम दिसून आला.
- कोकण प्रमाणेच नेपाळमध्ये रानमोडी वनस्पतीचा प्रादुर्भाव झाला आहे. पांढरी फुले येणारी ही त्रासदायक वनस्पती काढून त्याचा बायोचार तयार करण्यात आला. साधारणपणे ७५० किलो बायोचार मध्ये ७५० लिटर गोमूत्र जिरवून खत तयार करण्यात आले. एक हेक्टर जमिनीत हे १५०० किलो खत नियमित सेंद्रिय खतांबरोबर भोपळा पिकाला देण्यात आले. ज्या जमिनीत हे खत वापरले नाही, तेथे २० हजार किलो उत्पादन मिळाले. तर हे खत वापरलेल्या ठिकाणी सुमारे ८२ हजार किलो उत्पादन मिळाले.
(टीप ः प्रत्येक ठिकाणी एवढी वाढ मिळेलच असे नाही.)
कंपोस्ट खत
हे खत तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत. पालापाचोळा, गवत खड्ड्यात भरून किंवा जमिनीवर ढीग करून कंपोस्ट करता येते. वेस्ट डीकंपोजर हे उत्तम खत राष्ट्रीय सेंद्रिय शेती केंद्र, गाझियाबादने विकसित केले आहे. त्याची किंमत केवळ वीस
रुपये आहे. पोस्टाद्वारे हे खत घरपोच येते. याच्या वापराने ४० दिवसांत काडीकचरा कुजून उत्तम खत तयार होते.
निष्कर्ष
पालापाचोळा, तण, काडीकचरा अनियंत्रित पद्धतीने न जाळता शास्त्रशुद्ध पद्धतीने कंपोस्ट व बायोचार करणे आवश्यक आहे. यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होईल. तसेच हवेतील कर्ब वायूच्या प्रदूषणाला आळा बसेल.
कंपोस्ट, बायोचार करण्याच्या स्थानिक पद्धती
टाळ घालणे
ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी होतो. या काळात तळकोकणात पालापाचोळा, गवत काढून आंब्याच्या झाडाभोवती गोलाकार चर मारून पुरण्यात येते. पुढच्या २-३ महिन्यांत त्याचे उत्तम खत तयार होते. यामुळे हापूस आंब्याचा दर्जा व उत्पादन वाढते.
राब पद्धत
पालापाचोळा, गवत झाडाच्या लहान फांद्या इत्यादींचे ३ थर करावेत. त्यावर माती पसरून आग लावावी. माती पसरल्याने काही प्रमाणात बायोचार तयार होतो.
ढिगारा पद्धत
लाकडे रचून त्यावर माती टाकली जाते. त्याला आग लावून कोळसा तयार
केला जातो. यापद्धतीद्वारे देखील काही प्रमाणात बायोचार तयार होतो. परंतु या दोन्ही पद्धतींत धूर होतो.
– प्रमोद जाधव, ९४२३३७५२९२
(उपआयुक्त, समाज कल्याण विभाग, जि. सिंधुदुर्ग)