सातारा जिल्ह्यात आल्याच्या दरात मोठी घसरण

0

राज्यात सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यांत सर्वाधिक आल्याले पीक घेतले जाते. मागील सहा ते सात वर्षांत आल्याचे दर समाधानकारक मिळत असल्याने आल्याच्या पिक क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी सातारा जिल्ह्यात सरासरी २५०० हेक्‍टरवर आले लागवड झाल्याचा अंदाज असून, या वर्षी आले पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनचा इतर पिकांप्रमाणे आले पिकालाही फटका बसला होता. त्याचा फटका अजून शेतकऱ्यांना बसत आहे.

कोरोनाच्या काळापासून सुरू झालेली घसरण अजूनही कायम असून २० ते २२ हजार रुपयांवरून सध्या आल्याच्या प्रतिगाडीस पाच ते सहा हजार रुपये दर मिळत आहे. या दरातील घसरणीमुळे आले उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

मार्च महिन्यापासून देशभरात कोरोना विषाणूचे संकट आले. हा विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन सुरू केल्याने मुंबई, पुणे या प्रमुख बाजारपेठा बंद ठेवल्या होत्या. परिणामी, सर्व पिकांना फटका बसला आहे. यामध्ये आले या नगदी पिकाची भर पडली आहे. या काळात प्रति गाडीस (५०० किलो) २० ते २२ हजार रुपयांवरून प्रति गाडीस १२ ते १४ हजार रुपये दर आला होता. यामध्ये टप्प्याटप्प्याने दर कमी होत जाऊन आले पिकास प्रतिगाडीस (५०० किलो) पाच ते सहा हजार रुपये दर मिळत असल्याने हे पीक शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे.

साधारणपणे मार्च, एप्रिलमध्ये नवीन लागवडीसाठी बियाणे आले काढले जाते. या वर्षी आले पिकांचे मूळकुज झाल्याने चांगले प्लॅाट कमी राहिले आहेत. त्याच बरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन जनजीवन सुरळीत होण्याचा या काळात अंदाज आहे.चालू हंगामात जिल्ह्यातील जवळपास ५० ते ६० टक्के आले पिकांवर कमी अधिक स्वरूपात मूळकुज झाली आहे.

ही मूळकुज थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कीडनाशकांवर खर्च करावा लागला आहे. त्यातूनही काही प्लॅाट नियंत्रणात न आल्याने शेतकऱ्यांना काढून टाकावे लागले होते. मध्यावर आले काढण्यामुळे आल्याची योग्य वाढ न झाल्याने उत्पादनातही घट झाली आहे. उत्पादनातील घट व मिळणारा दर यामुळे शेतकऱ्यांचा भांडवली खर्चही निघत नाही.

यामुळे बियाण्यासाठी व बाजारपेठात आल्याची मागणी वाढल्याने दर वाढतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र असे न झाल्यास शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a comment