दुर्लक्षित बहुगुणी जवस

0

जवसाच्या तेलात 58 % ओमेगा-3 मेदाम्ले व अँटी ऑक्सीडंट्स आहेत. हे घटक हृदयरोगाला कारणीभूत असलेले विकार जसे उच्च रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, ट्रायग्लीसराईडचे रक्तातील उच्च प्रमाण यांना नियंत्रीत ठेवते तसेच संधीवात असलेल्या रूग्णांसाठी हे तेल उपयुक्त सिद्ध झालेले आहे. मधुमेही रूग्णांसाठी जवस उत्तम पर्याय आहे. जवस तेलाच्या सेवनाने कर्करोगास प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे दुर्लक्षित जवस पिकास पुनच्छ गतवैभव प्राप्त होत आहे.

जवसाच्या दाण्यांपासून खायचे तेल, वाळलेल्या झाडाच्या खोडापासुन उच्चप्रतीच्या धाग्याची निर्मिती केल्या जाते. जवसाच्या झाडापासून मिळणारा धागा मजबुत व टीकाऊ असल्याचे आढळून आले आहे.
जवस रबी हंगामातील महत्वाचे तेलबीया पिक असून वेळेवर पेरणीसाठी ऑक्टोंबरचा दुसरा पंधरवाडा तर ओलीताची सोय असल्यास उशिरा पेरणीच्या स्थितीत लागवड 10 नोव्हेंबर पर्यंत करता येते.
पेरणीसाठी प्रति एकर साधारणतः दहा किलो बियाणे लागते. पेरणीचे अंतर साधारणत: 30 सें.मी. (दोन ओळीतील) या प्रमाणे राखल्या जाते. दोन झाडातील 10 से.मी. एवढे अंतर राखण्यासाठी 1 भाग बियाणे : 2 भाग माळुची बारीक रेती मिसळून पेरणी पाभरीने करावी.

जवस दाण्यांसाठी प्रति एकर 1,60,000 पर्यंत तर धाग्यासाठी प्रति एकर 2,00,000 पर्यंत झाडांची संख्या राखावी. पाभरीने पेरणी करतांना पेरणीची खोली साधारणतः 3-4 सें.मी. राखावी. धाग्यासाठी जवसाची पेरणी करतांना दोन झाडातील अंतर कमी करावे. जेणे करुन एकरी 2,00,000 झाडांची संख्या राखण्यास मदत होईल.

मर व करपा या रोगांसाठी जवसाचे पिक संवेदनशिल असते त्यामुळे प्रति किलो बियाण्याला 3 ग्रॅम थायरम व 2 ग्रॅम कार्बेनडॅझिम याप्रमाणे बुरशीनाशकची प्रक्रिया बियाण्याला पेरणीपुर्वी करावी. वरिल रोगांसोबतच जवस पिकावर प्रामुख्याने गादमाशीचा प्रादुर्भाव दिसुन येतो.

जवसाचे पिक पाण्याचा ताण सहन करू शकते त्यामुळे भारी जमिनींमध्ये कोरडवाहू परिस्थितीत या पिकाची लागवड करता येते. मध्यम ते भारी जमीनीत जवस पिकाची लागवड करावयाची असल्यास संरक्षित सिंचनाची सुविधा असणे क्रमप्राप्त ठरते.

कोरडवाहू परिस्थितीत लागवड करण्यासाठी किरण, शितल, श्वेता, पुसा-3 या वाणांची शिफारस करण्यात आलेली आहे तर बागायती पिकासाठी जवाहर-23, एनएल-112,एनएल – 97, एनएल-165, पीके एनएल-260 या वाणांची शिफारस करण्यात आली आहे. दाण्यांसाठी तसेच उत्तम प्रतीच्या धाग्यासाठी सौरव, जीवन या वाणांची शिफारस करण्यात आली आहे. देशी वाणांऐवजी सुधारीत वाणांची लागवड केल्यास उत्पादनात शाश्वत वाढ शक्य झाल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्यांनी वाणाची निवड करतांना आपल्या परिसरात उपलब्ध वाणाची निवड करावी.

जवस पिकासाठी रासायनिक खतांचे व्यवस्थापन करतांना कोरडवाहू पिकासाठी 10 किलो नत्र + 20 किलो स्फुरद + 10 किलो पालाश प्रति एकर या प्रमाणात शिफारस करण्यात आली आहे. म्हणजेच साधारणतः अर्धा बॅग युरीया, सव्वा बॅग सिंगल सुपर फॉस्फेट व अर्धा बॅग म्युरेट ऑफ पोटॅश दिल्यास शिफारशीनुसारची अन्नद्रव्यांची पुर्तता होते, यासोबतच साधारणतः 5-6 किलो झिंक सल्फेट प्रति एकर द्यावे. रासायनिक खतांची मात्रा, शक्यतोवर शेणखतात मिसळून पेरणीसोबतच द्यावी.

बागायती जवस पिकासाठी 24 किलो नत्र, 12 किलो स्फुरद व 12 किलो पालाश प्रति एकर देण्याची शिफारस आहे. याकरिता पेरणीच्या वेळी साधारणतः अर्धा बॅग युरीया, दिड बॅग सिंगल सुपरफॉस्फेट तसेच साधारणत: अर्धा बॅग पोटॅश व 5 किलो गंधक प्रति एकर देण्याची शिफारस आहे. उरलेली नत्राची अर्धी मात्रा (12 किलो नत्र) म्हणजेच साधारणत: अर्धा बॅग युरिया पेरणीनंतर दिड महिन्यांनी ओलीतासोबत अथवा जमीनीत ओल असतांना द्यावयाची शिफारस आहे.

जवस पिकास संवेदनशिल अवस्थेला ओलीत दिल्यास उत्पादनात दिडपट ते दुप्पट वाढ होतांना दिसते. त्याकरिता आवश्यकतेनुसार पिक फुलोऱ्यात येतांना (पेरणीपासून साधारणतः 45 दिवसांनी) व बोंड धरण्याच्यावेळी (पेरणीपासून साधारणतः 65 दिवसांनी) याप्रमाणे पाण्याच्या दोन संरक्षीत पाळ्या द्याव्या.

जवसाचे पिक व त्यामधील तणे यांच्या दरम्यान तीव्र स्पर्धेचा कालावधी सुरूवातीचे 30 दिवस समजण्यात येते. त्यामुळे पिक 30 दिवसाचे होतांना यादरम्यान गरजेनुसार एक किंवा दोन वेळा निंदन देऊन शेत तणमुक्त ठेवावे व तणांचे अवशेष दोन ओळींमधील जागेत टाकावे. जवसाचे पिक भुरी या रोगास तसेच गादमाशी ( बड फ्लाय) या किडीस संवेदनशिल असते त्यामुळे भुरी रोगासाठी 25 ग्रॅम गंधक भुकटी तर गादमाशीसाठी 10 मि.लि.डायमेथोएट 10 लिटर पाण्यात याप्रमाणे पिक बोंड धरण्याच्या अवस्थेत येतांना फवारणी करावी. पिकाची पाने व बोंडे पिवळी झाल्यानंतर पिक काढणीस तयार झाल्याचे समजावे.

प्रा. जितेंद्र दुर्गे
प्रा. सविता कणसे
सहयोगी प्राध्यापक (कृषि विद्या)
श्री शिवाजी कृषि महाविद्याल, अमरावती
मो.नं. 9403306067

Leave a comment