अण्णा हजारे जानेवारीच्या अखेरीस करणार शेतकऱ्यांसाठी शेवटचे उपोषण

0

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी घेऊन गेली एक महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेकदा चर्चा होऊन देखील अद्याप तोडगा निघालेला नाही. या शेतकऱ्यांना देशभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील उपोषणाचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या समर्थनात अण्णा हजारे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात दिल्ली येथे शेवटचे उपोषण करणार आहे. उपोषणासाठी रामलीला मैदानाची मागणी नवी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

अण्णा हजारेंनी उपोषणचा इशारा दिल्यानंतर गिरीश महाजन यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेत, प्रकृतीच्या कारणास्तव उपोषण न करण्याची विनंती केली होती. मात्र अण्णा हजारे ठाम राहिले आहेत.

एक महिना केंद्र सरकार काय भूमिका घेते, याची आपण वाट पाहू. शेतकरी हिताचा काही निर्णय झाला तर ठीक, नाही तर जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात नवी दिल्ली येथे शेवटचे उपोषण करु असा इशारा हजारे यांनी दिला.

Leave a comment