शेती विश्वात ‘या’ पिके मॉडेलची चर्चा
शेतकऱ्याचा उल्लेख बळीराजा म्हणून केला जातो याचे मुख्य कारण म्हणजे लोकांना अन्नधान्य पुरवण्याचे काम शेतकरी इमानेइतबारे करत असतो. ऊन, वारा,पाऊस, दुष्काळ, बाजारपेठ या सर्वांशी संघर्ष करत शेतकरी एका अर्थाने लोकांसाठी स्वतःचे आयुष्य अर्पण करत असतो. हे करताना बऱ्याच वेळा आपल्या कुटुंबाच्या आरोग्य आणि पोषणाच्या गरजा तो विसरून जातो.याचा परिणाम बऱ्याच वेळा कुटुंबाचे आरोग्य आणि कुटुंबावरील खर्चाचे नियमन करण्यामध्ये होताना दिसून येतो. अनेक वेळा जास्त उत्पादन तेही आर्थिक स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी शेतकरी नगदी पिकांच्या पाठीमागे लागतो आणि दुसरीकडे त्याच्या कुटुंबाच्या पोषण गरजांना मात्र नकळत तो विसरून जातो.
एक सुदृढ व्यक्ती म्हणून माणसाच्या दररोजच्या आहारात कमीत कमी 200 ग्रॅम हिरव्या पालेभाज्या, 300 ग्रॅम तृणधान्य, 100 ग्रॅम फळे, 300 मिली दूध हे कमीत कमी अपेक्षित असते. वरील सर्व गोष्टी एक शेतकरी म्हणून स्वतःच्या शेतात उत्पादित करता येऊ शकतात.परंतु आजही 80 टक्के पेक्षा जास्त शेतकरी हे करताना दिसून येत नाही आणि दुसऱ्या बाजूला 50 टक्के पेक्षा जास्त स्त्रिया कुपोषित श्रेणीमध्ये असल्याचे दिसून येते. छोट्या-मोठ्या आजारांनाही लढण्याची ताकत कमी होताना दिसून येते. पालेभाज्या, फळ विकत आणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खाण्याची मानसिकता दिसत नाही. याचे दीर्घकालीन होऊ शकणारे परिणाम विसरून जातात.
पाच सदस्यांच्या एका कुटुंबात साधारणपणे वार्षिक दोन क्विंटल फळे चार क्विंटल हिरव्या पालेभाज्या एक क्विंटल डाळी आहारामध्ये येणे अपेक्षित आहे परंतु दुर्दैवाने असे स्वतःला दिसून येत नाही. यातही जो काही थोड्या प्रमाणामध्ये भाजीपाला फळे बाजारातून आणली जातात ती अनेकदा रासायनिक उत्पाद ने वापरून निर्माण झालेले असतात आणि त्याचा परिणाम अनेक नवनवीन आजारांचे स्वरूपात दिसून येतो. यामुळे अब्जावधी रुपयांचा खर्च आरोग्य व्यवस्थेवर होताना दिसून येत आहे. लाखो शेतकरी यामुळे दरिद्रयाच्या चक्रात अडकून पडतात याला पर्याय काय यादृष्टीने अनेक पर्याय शेतकरी स्वतः शोधत असतात. यातीलच एक अनोखे मॉडेल खैरे वाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील महिला शेतकरी मनीषा भागवत भांगे यांनी स्वतःच्या अनुभवावर आधारित निर्माण केले आहे सध्या या मॉडेलची चर्चा सुरू आहे.
शाळेचा उंबरठा न ओलांडलेल्या 60 वर्षीय मनीषा भागवत भांगे यांनी विठ्ठलवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे तीन गुंठा जागेत 75 प्रकारच्या विविध फळपिके, भाजीपाला, औषधी वनस्पती व वन झाडे यांची लागवड केली आहे. 2011 पासून सुरू केलेल्या या शेती प्रयोगाचे आता मूर्त स्वरूप घेतले आहे. काय आहे हे मॉडेल.
साठ फूट लांब व 50 फूट रुंद जागेमध्ये जागेचा परिणामकारक वापर करून विविध पिकांची लागवड.
1. फळझाडे- या तीन गुंठे क्षेत्रामध्ये 20 प्रकारच्या फळझाडांची लागवड साधारणपणे दहा फूट अंतरावरती एक झाड याप्रमाणे केलेली आहे यामध्ये पेरू चिकू, सिताफळ, आंबा, अंजीर, लिंबू, पपई, आवळा, नारळ, केळी, मोसंबी, खारीक, बदाम या फळ झाडांची लागवड केली आहे.
2. भाजीपाला- या मॉडेल मध्ये पाच सदस्यांच्या कुटुंबाला पुरेल एवढा भाजीपाला येण्यासाठी पश्चिमेला साठ फूट बाय दहा फूट जागेमध्ये सात वाफे तयार करून या वाफ्यांमध्ये वर्षभराच्या चक्रामध्ये फळभाज्या मूळ भाज्या व पालेभाज्या यांची लागवड केली जाते यामध्ये रताळ्या पासून ते मेथी शेपू सुका पालक भेंडी गवार वांगी टोमॅटो मुळा याची लागवड केली जाते तसेच दोडके, भोपळा, कारले,पावटा, घेवडा या वेलवर्गीय भाज्या फळझाडांवर चढवल्या जातात.
3. औषधी वनस्पती- जुन्या काळात पारंपारिक आजीबाईच्या बटवा च्या माध्यमातून औषधी वनस्पतींचा वापर आजार नीट करण्यासाठी केला जायचा. हाच मुद्दा समोर धरून मनिषा ताई यांनी त्यांच्या मॉडेल मध्ये पुदिना, कोरफड, तुळस, इन्सुलिन,शतावरी, अश्वगंधा, शेवगा, कढीपत्ता, अक्कलकारा, आवळा, अडुळसा यांची लागवड फळझाडांच्या मध्ये असणाऱ्या रिकाम्या जागेमध्ये केलेली आहे. आज घडीला 13 प्रकारच्या औषधी वनस्पती त्यांनी या मॉडेलमध्ये लावल्या आहेत.
4. फुलझाडे- घर आणि मंदिरातील वापरासोबतच परागीभवन करण्यामध्ये फुलझाडे सर्वात मोठा रोल निभावतात. हे लक्षात घेऊन विविध 15 प्रकारच्या फुलझाडांची लागवड या तीन गुंठे क्षेत्रात करण्यात आलेली आहे. यामध्ये झेंड, निशिगंधा,मोगरा,गुलाब, मधुमालती, चिनी गुलाब, लीली,कोरांटी यांच्या विविध प्रजातींची लागवड केलेली आहे. यामुळे या तीन गुंठ्यातील झाडांवर मोठ्या प्रमाणात मधमाश्या पोळ्या करून राहतात. त्या माध्यमातून कुटुंबाला लागणारा मध मिळत राहतो.
5. वनझाडे- पक्ष्यांचा अधिवास या क्षेत्रात रहावा म्हणून तीन गुंठ्याच्या बॉर्डर वरती अशोक लिंबार हसपड, चिंच काटेसावर,बांबू त्यांची लागवड केली आहे आज घडीला दीडशेपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे चिमण्या, बुलबुल भोरड्या, पोपट, कोकिळा, खाटीक पक्षी इथे वास करून आहेत.
सोबतच या मॉडेल मध्ये झाडांच्या दोन लाईन मधील जागांचा ही प्रभावी वापर केलेला आहे यामध्ये दोन टन क्षमतेचे गांडूळ खत युनिट उभारण्यात आलेले आहे तसेच जीवामृत दशपर्णी वेस्ट डी कंपोजर याचीही निर्मिती या झाडाखाली ड्रम वापरून केली जाते.
अर्थकारण- संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने उत्पादने या प्रयोगात घेतली जात आहेत यांनी या माध्यमातून वार्षिक चार क्विंटल पेक्षा जास्त फळे आणि पाच सदस्यांच्या कुटुंबाला पुरेल एवढा भाजीपाला उत्पादन होत आहे अतिरिक्त शिल्लक राहणाऱ्या फळांना प्रक्रिया करून त्याची विक्रीही त्या बाजारात करत आहेत यामध्ये आवळा कॅन्डी, चेरी टोमॅटो बी झेंडूचे बी, भाज्यांचे बी रताळे यांचा समावेश आहे. कुटुंबाची होणारी बचत आणि विक्री यांचा हिशोब जर काढला तर साधारण वार्षिक पंचवीस ते तीस हजार रुपयां ची बचत या मॉडेल मधून होताना दिसून येते तसेच नैसर्गिक पद्धतीने उत्पादन होत असल्याने आरोग्याचा दर्जाही उत्तम राहताना दिसून येतो. नऊ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या प्रयोगाची विविध पातळ्यांवर दखल घेण्यात आलेली असून महाराष्ट्रभरातून शेतकरी तसेच शहरातील जाणकार प्रत्यक्ष भेटीद्वारे हे मॉडेल जाणून घेऊन बहुपीक पद्धती स्वीकारताना दिसून येत आहेत.
स्वतःच्या कुटुंबाची पोषण सुरक्षा निश्चित करणारा हा शेती प्रयोग कोरोना च्या पार्श्वभूमीवर निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याने करायलाच हवा आणि आपल्या कुटुंबाचा बाहेर जाणारा पैसा तर थांबवावा सोबतच कुटुंबाचा आरोग्याचा दर्जाही उंचवावा असे मनिषाताई भांगे प्रत्येकाला आवर्जून सांगतात.
गुरु भांगे 8888421666
महत्वाच्या बातम्या : –
‘कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करु नका’
शेतकरी आंदोलन : फडणवीसांनी घेतली अण्णा हजारेंची भेट
‘हे तर पवारांचे स्वत: विरुद्धच आंदोलन’, भाजपची टीका
द्राक्ष हंगामास उशीर, काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता