प्रयोग अन् नियोजनातून शेती विकासावर भर

0

महाविद्यालयात पंचवीस वर्षांपासून गणित शिकविणाऱ्या प्रा. सोमनाथ घुले यांनी गिरणारे (जि. नाशिक) येथील वडिलोपार्जित शेतीचे गणित फारसे चुकू दिले नाही. दर रविवारी त्यांची कुटुंबासोबत शेतातील वारी मागील तीन दशके सुरूच आहे. शेतीतून मिळणारी ऊर्जा त्यांना शैक्षणिक उपक्रमासाठी बळ देणारी ठरली आहे.

प्रा. सोमनाथ तुकाराम घुले हे नाशिक शहरातील सिडको येथील वावरे महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नाशिकपासून अठरा किलोमीटर अंतरावरील गिरणारे हे त्यांचे मूळ गाव. या गावात त्यांच्या एकत्रित कुटुंबाची बारा एकर शेती. त्यापैकी सहा एकर शेतीचे नियोजन सोमनाथ घुले यांच्याकडे आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार सोमनाथ घुले वर्षभर भाजीपाल्याची लागवड करतात. सध्या त्यांच्या शेतीत चार एकर टोमॅटो, एक एकर वांगी, एक एकर वालपापडी, घेवडा आणि चारापिकांची लागवड आहे. याशिवाय हंगामानुसार कोबी, फ्लॉवर, गहू या पिकांची लागवड ते करतात.

पीक बदलावर भर शेती नियोजनाबाबत प्रा. घुले म्हणाले की, मी २०१० पासून प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार सोनाका या द्राक्ष जातीची लागवड केली. पाच वर्षे उत्पादन घेतले. सुरवातीची दोन वर्षे एकरी १२ टनाचे उत्पादन मिळाले, परंतु पुढे नंतर द्राक्षशेतीतील समस्या वाढत गेल्या. हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे द्राक्ष पीक मला परवडेनासे झाले. त्यामुळे गेल्या वर्षी मी द्राक्षबाग काढून हंगामनिहाय भाजीपाला पिकांच्या लागवडीकडे लक्ष केंद्रित केले. बाजारपेठेची मागणी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या चर्चेतून मी खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात विविध प्रकारच्या भाजीपाला लागवडीचे नियोजन करतो.

बहुपीक पद्धती ठरते फायद्याची बहुपीक पद्धतीच्या नियोजनाबाबत प्रा. घुले म्हणाले, की हवामानातील बदलांचे मोठे आव्हान शेतीपुढे आहे. या स्थितीत एकपीक पद्धती फारशी फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे मी मागील दोन वर्षांपासून बहुपीक पद्धतीकडे वळलो. बाजारभावात सातत्याने चढ उतार होत असतो. बहुपीक पद्धतीमध्ये काही पिकांना चांगला दर मिळतो, काही पिकांना अपेक्षित दर मिळत नाही. मागील वर्षी मी कोबी लागवडीचे नियोजन केले होते. त्या काळात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने कोबीला बाजारात चांगला दर मिळाला. त्या अनुभवाने शेतीतील उत्साह वाढला. बाजाराचा अभ्यास करून लागवडीची वेळ ठरविण्यावर भर दिला आहे. याचबरोबरीने आंतरपीक पद्धतीच्या अवलंबावर माझा भर आहे. मला टोमॅटोपासून एकरी पंचेचाळीस हजार तर वांग्यातून एकरी सत्तर हजाराचा नफा मिळाला. त्यामुळे पीक नियोजनाचा हुरूप वाढला. आमचा गिरणारे परिसर टोमॅटो उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावालगत असलेल्या मार्केटमध्ये देशभरातील व्यापारी खरेदीसाठी येतात. त्यामुळे वाहतूक खर्च वाचतो. त्यामुळे मी गेल्या दोन वर्षांपासून टोमॅटो लागवड करतो. आॅगस्ट महिन्यात लागवड पूर्ण करतो. आॅक्टोबर शेवटीपासून फळांच्या उत्पादनास सुरवात होते. पुढे बाजारपेठेनुसार चार ते पाच महिने तोडा चालतो. एकरी मला ३५ टनांपर्यंत सरासरी उत्पादन मिळते, परंतु आता पिकाच्या व्यवस्थापनाचा खर्च वाढतो. गतवर्षी मला उत्पादन चांगले मिळाले. परंतु टोमॅटोच्या क्रेटचे दर वीस रुपयांपर्यंत घसरले होते. या स्थितीत पूर्ण उत्पादन खर्च वाया गेला, परंतु बाजारपेठेचा अंदाज घेत काही क्षेत्रावर टोमॅटो लागवड मी करतोच. यंदा मी चार एकरावर टोमॅटो, एक एकर वांगी, एक एकर वाल, घेवडा लागवड केली आहे. तसेच गिलक्याची काही क्षेत्रावर लागवड आहे. द्राक्षाचा मांडव तसाच ठेवल्याने वेलवर्गीय भाजीपाला लागवडीसाठी फायदा होत आहे.

शेतीचा ताळेबंद महत्त्वाचा सोमनाथ घुले हे गणिताचे प्राध्यापक असल्यामुळे शेतीतील गणिताकडेही त्यांचे बारकाईने लक्ष असते. प्रत्येक पिकाचे अंदाजपत्रक करण्यावर त्यांचा भर आहे. बाजारभावावर आपले नियंत्रण नसले तरी पीकनिहाय जमा खर्चाचा हिशेब नीट ठेऊन अनावश्‍यक खर्च ते टाळतात. शेतीतील आर्थिक व्यवस्थापन हे सर्वात महत्त्वाचे असते. शेतातून आलेल्या उत्पन्नाचा खर्च हा उत्पादक कामांसाठीच झाला पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष असतो.

नोकरी आणि शेतीची कसरत सोमनाथ घुले हे नोकरीनिमित्ताने नाशिक शहरात राहत असले तरी त्यांचे शेतीतील कामांवर सतत लक्ष असते. दर रविवारी ते शेतीवर जाऊन पुढील आठवड्याचे नियोजन करतात. शेती नियोजनात त्यांना मोठे बंधू हरिभाऊ व निवृत्ती तुकाराम घुले यांचे मार्गदर्शन मिळते. पुतणे भाऊराज व संदीप हे पीक व्यवस्थापनात सहकार्य करतात. या सहकार्यामुळेच ही कसरत सुसह्य होत असल्याचे ते सांगतात. नाशिकमध्ये असताना ते फोनवरून वेळोवेळी पुतण्यांशी संपर्कात असतात. गरजेनुसार आठवड्याच्या मधील दिवसांतही शेतीकडे फेरी असते. त्यामुळे वेळेवर निर्णय घेणे शक्य होते.

एकात्मिक व्यवस्थापनावर भर प्रा. घुले हे प्रयोगशील शेतकरी, तज्ज्ञांच्या कायम संपर्कात असतात. त्यांच्याकडून शेतीतील नवीन तंत्रज्ञानाची ते माहिती घेतात. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला ते भेट देतात. यासाठी त्यांना ॲग्रोवनचा चांगला फायदा होतो. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने त्यांनी पीक नियोजन, आंतरपीक पद्धती, ठिबक सिंचन आणि विद्राव्य खत वापरावर भर दिला आहे. जमिनीची सुपिकता जपण्यासाठी शेणखत आणि शेणस्लरीचाही जास्तीतजास्त वापर करतात. याचबरोबरीने प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केल्यामुळे पाण्याची बचत आणि तण नियंत्रण होते. एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रणावर त्यांचा भर आहे. एकात्मिक पद्धतीने रासायनिक आणि सेंद्रिय कीडनाशकांच्या वापराबरोबरच सापळा पिके, चिकट सापळ्यांचा ते वापर करतात. यामुळे योग्य प्रमाणातच निविष्ठांचा वापर होतो. खर्चात बचत होते.

तंत्रज्ञान प्रसाराचा ध्यास नियोजन आणि तंत्रज्ञानाचा योग्य समन्वय ठेवला तर शेती व्यवसाय किफायतशीर होऊ शकतो, यावर प्रा. घुले यांचा ठाम विश्‍वास अाहे. तरुण शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्याच प्रेरणेतून गिरणारे गावात तरुण शेतकऱ्यांचा ‘गिरणारे ग्रामविकास मंच” स्थापन झाला. या माध्यमातून सातत्याने प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव कथन, तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. चांगले प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी दिल्या जातात. वारकरी संप्रदायाचा त्यांचा चांगला अभ्यास असून त्या माध्यमातूनही ते शेतीच्या संदर्भात प्रबोधन करतात. राष्ट्रीय सेवा योजनेत त्यांनी पंधरा वर्षे कार्यक्रमाधिकारी म्हणून काम केले. यादरम्यान पाच वर्षे ते राष्ट्रीय सेवा योजनेचे नाशिक जिल्हा समन्वयक होते. या काळात शहरी महाविद्यालयीन तरुणांमध्ये शेतीविषयी आस्था निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांमध्ये शेतीशास्त्र आणि ग्रामविकास या विषयावरील तज्ज्ञांची व्याख्याने अधिकाधिक घेण्यावर त्यांचा भर होता.

– सोमनाथ घुले, ९८२२१११८२९.

Leave a comment