
अॅस्टर लागवड तंत्रज्ञान
ॲस्टरची फुले सजावट, फुलदाणी, हार-गुच्छ तयार करण्यासाठी वापरतात. या फुलांना सण समारंभामध्ये चांगली मागणी असते.
लागवड हंगाम :
- लागवड वर्षभरात कधीही करता येते. तरीही हंगाम, लागवडीसाठीची जात आणि स्थानिक हवामान याचा विचार करून बाजारातील मागणीनुसार लागवडीचा हंगाम निवडावा.
- खरीपमध्ये जून- जुलै, रब्बीमध्ये ऑक्टोबर- नोव्हेंबर आणि उन्हाळी हंगामासाठी फेब्रुवारी- मार्च महिन्यात लागवड करावी.
- बीजोत्पादनासाठी खरीप हंगामामध्ये लागवड करावी. अन्यथा वाढणाऱ्या तापमानाचा बी पोषणावर परिणाम होतो.
जाती :
- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले गणेश व्हाईट, फुले गणेश पिंक, फुले गणेश व्हायोलेट आणि फुले गणेश पर्पल हे पांढऱ्या, गुलाबी, निळ्या आणि जांभळ्या रंगाची फुले आणि अधिक उत्पादनक्षमता असलेल्या जाती प्रसारित केल्या आहेत.
- भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने कामिनी, पौर्णिमा, शशांक आणि व्हायलेट कुशन या जाती प्रसारीत केल्या आहे.
- डॉर्क क्विन, अमेरिकन ब्युटी, स्टार डस्ट, सुपर प्रिन्सेर या परदेशी जाती आहेत.
रोपवाटिका :
- रोपनिर्मितीसाठी दोन मीटर बाय एक मीटर आकारामध्ये गादीवाफे तयार करावेत. वाफ्याची उंची १० सें. मी. ठेवावी.
- वाफे बारीक माती आणि वाळलेले शेणखतापासून बनवावेत. तयार वाफ्यावर १० ते १२ सें. मी. अंतरावर ओळीत बी पेरावे. बी पेरण्यासाठी लांबीला आडव्या ओळी ओढाव्यात.
- बी एक सें. मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बी हलक्या हाताने खत माती मिश्रणाने झाकावे. नंतर झारीने हलके पाणी द्यावे. बी उगवणीनंतर रोपांची काळजी घ्यावी.
- रोपवाटिकेत रोग नियंत्रणासाठी २५ ग्रॅम कॅप्टन किंवा २५ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दहा दिवसांच्या अंतराने दोन वेळा या द्रावणाची आळवणी करावी.
- साधारणत: ३० ते ४० दिवसांत रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात.
लागवड तंत्र :
- लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची, मध्यम ते भारी जमीन निवडावी. जमीन नांगरून- वखरून भुसभुशीत करावी. जमीन तयार करताना हेक्टरी २५ टन शेणखत जमिनीत मिसळावे. माती परीक्षणानुसार प्रतिहेक्टरी ९० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश ही खते लागवडीच्या वेळी मिसळावीत.
- लागवडीसाठी ६० सें. मी. अंतराने सरी वरंबे तयार करावेत. काही ठिकाणी सपाट वाफ्यावर लागवड करतात. अशा प्रकारे ३० सें. मी. बाय ३० सें. मी. किंवा ३० सें. मी. बाय ६० सें. मी. अंतरावर रोपांची लागवड करावी.
- लागवडीचे अंतर हे जात, हंगाम आणि जमीन यावर अवलंबून असते.
- बाजारातील मागणी लक्षात घेऊन लागवडीचे नियोजन करावे. एकदम लागवड न करता १५ दिवसांच्या अंतराने थोडी थोडी लागवड करावी.
आंतरमशागत :
- लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली खुरपणी करावी. नंतर प्रतिहेक्टरी नत्राचा दुसरा हप्ता ५० किलो या प्रमाणात द्यावा.
- रोपाला मातीची भर द्यावी. त्यामुळे रोपाच्या खोडाला चांगला आधार मिळतो. परिणामी फुले लागल्यानंतर झाड कोलमडत नाही. झाड सरळ वाढते. फुले खराब होत नाहीत.
Related Posts
पाणी व्यवस्थापन :
- जमिनीचा प्रकार, वातावरण आणि हंगाम यानुसार पाणी व्यवस्थापन करावे.
- या पिकाच्या मुळ्या जमिनीत जास्त खोल जात नाहीत. त्या मातीच्या वरच्या थरात असतात. त्यामुळे रोपाच्या मुळाजवळील माती कायम वापसा अवस्थेत राहील याची काळजी घ्यावी. पिकाला साधारणत: ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
- कळ्या धरू लागल्यापासून ते फुले काढणीपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये, अन्यथा फूल उत्पादनावर परिणाम होतो.
काढणी तंत्रज्ञान :
- लागवडीपासून अडीच ते चार महिन्यांत फुले लागतात. फुले पूर्ण उमलल्यानंतर ती काढावीत.
- पूर्ण उमललेल्या फुलांची तोडणी दोन-तीन दिवसांच्या अंतराने करावी. अशाप्रकारे काढणी केल्यास ३० दिवसांत काढणी पूर्ण होते.
- लांब दांड्यासाठी पूर्ण वाढ झालेली आणि उमललेली फुले १० ते २० सें. मी. दांड्यासह कापून घ्यावीत.
- साधारणपणे ४ ते ६ दांड्यांची मिळून एक जुडी बांधून विक्रीसाठी पाठवावी.
- तोडल्यानंतर फुले उन्हात ठेवू नयेत किंवा फुलांवर पाणी शिंपडू नये.
- हेक्टरी एक लाख जुड्यांचे उत्पादन मिळते, ४०-४२ लाख फुलांचे उत्पादन मिळते.
पीक संरक्षण :
- या पिकावर मावा, फुलकिडे, पाने खाणाऱ्या आणि फुले-कळ्या पोखरणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसतो.
नियंत्रण : किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट १० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पुढील फवारणी अन्य शिफारशीत कीटकनाशकाची सल्ल्यानुसार करावी.
रोग नियंत्रण :
मर :
- लागवडीस निचऱ्याची जमीन निवडावी. शेतात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.
- रोग नियंत्रणासाठी एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रतिलिटर पाण्यात मिसळून झाडाच्या मुळाशी ओतावे. किंवा एक टक्का बोर्डो मिश्रणाचे द्रावण झाडाच्या मुळाशी ओतावे.
पानावरील ठिपका :
रोगाच्या नियंत्रणासाठी मँकोझेबची शिफारसीनुसार फवारणी करावी.
संपर्क : डॉ. सतीश जाधव ,०२०- २५६९३७५०
(लेखक राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथे कार्यरत आहेत.)