क्षयरोग हा कमकुवत शारीरिला होणारा आजार आहे, सोबतच तो मानसिक दृष्ट्या ही व्यक्तिला कमकुवत करतो. त्यामुळे याच्या निर्मूलनासाठी जेवढी वैद्यकीय उपचाराची गरज असते तेवढीच कौटुंबिक आणि सामुदायिक पद्धतीने बळ देण्याची आवश्यकता आहे. यावर काम करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या स्तरावर आरोग्य केंद्र स्थापलेल्या आहेत मात्र उणीव जाणवते ते समुपदेशन आणि स्थानिक स्तरावर चालणार्या स्वयंसेवी संस्थांची व एनजीओ. यासंबंधी गावपातळीवर, निम्नशहरी स्तरावर काम होणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात क्षयरोग आणि बिगर सरकारी संस्था याचा अभ्यास करताना, मागास आणि विकसित प्रादेशिक भाग यांमध्ये असणारी विषमता प्रकर्षाने जाणवली.
क्षयरोगाविरोधातील लढ्यामध्ये एनजीओ चे देश पातळीवरील योगदान उल्लेखनीय आहे . मात्र हिंगोली जिल्ह्यात टीबी विरोधात ठोस काम करणारी एक ही एनजीओ (NGO) सापडली नाही. एनजीओ हे एक स्थानिक पातळीवर पोहचण्याचा उत्तम मार्ग आहे. या संस्थांद्वारे कॉर्पोरेट कंपन्यांचा सीएसआर (CSR) निधी आरोग्यव्यवस्था सुधारण्याच्या कामात चांगल्या रीतीने वापरता येतो. त्यातही क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी एनजीओ ची भूमिका किती महत्वाची आहे हे एका उदाहरणादाखल समजू शकतो. बिहार येथील एका एनजीओ ने सहकारी दूध संघांच्या सीएसआर निधीचा उपयोग टीबीची विविध उपकरणे घेण्यासाठी, क्षयरोग्यांना पौष्टिक आहार पुरवणे अशा दुहेरी कारणांसाठी करत आहे. याच धर्तीवर हिंगोली चा विचार करता अशा प्रयोगांना वाव आहे कारण हिंगोलीत पशुपालन हा शेतीला प्रमुख जोडधंदा आहे.
तसेच स्वयंसंस्थांद्वारे महिला सक्षमीकरणाचेही महत्वाचे काम होते. सक्षम महिला आरोग्यसंदर्भातील निर्णय खंबीरपणे घेऊ शकते . जिल्ह्यातील महिलांच्या स्वयं साह्यता समूहांची (SHG) असणारी कमी संख्या स्त्रियांना आर्थिक सक्षम होण्याच्या एका नामी संधीपासून वंचित ठेवते. आर्थिक सक्षमीकरण झाल्यास पैशाच्या निकडीमुळे होणारे आरोग्यवरील दुर्लक्ष कमी होईल. पर्यायाने आपल्या मुलांना पौष्टिक आहार, उत्तम आरोग्य, योग्य शिक्षण मिळेल जेणेकरून देशाची तरुणपिढी सक्षम होऊ शकते.
संस्थांद्वारे तरुण तरुणींना क्षयरोगाविरोधातील लढ्यात समाविष्ट करता येऊ शकते. अशा उपक्रमाचे जिल्ह्यात दुहेरी फायदे आहेत . एक म्हणजे सरकारी व्यवस्थेला पूरक ठरेल असे अतिरिक्त मनुष्यबळ मिळेल; दुसरे म्हणजे तरुणाईमध्ये रोगाबाबद्दल जागरूकता वाढवण्यास मदत होईल. दुसर्या मुद्याच्या आधारे हिंगोली जिल्हयाबद्दल बोलायचे झाल्यास हिंगोलीत क्षयरोगबद्दल तरुणांमध्ये जागरूकता असणे का गरजेचे आहे हे खालील बाबींवरून समजू शकते.
हिंगोली इथे 85% लोक ग्रामीण भागात राहतात. त्यातही 15-29 या वयोगटातील 27.5 % तरुण आहेत. म्हणजे जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केल्यास सर्वात जास्त लोकसंख्या या वयोगटात मोडते. परंतु हाच वर्ग जर आरोग्याच्या विळख्यात अडकत असेल तर एकूणच गाव, शहर, राज्य आणि पर्यायाने देशाच्या एकूणच आर्थिक, सामाजिक, राजकीय, संस्कृतिक विकास तळाला जाण्याची शक्यता आहे.
आधीच मानव विकास निर्देशकांत हिंगोली तळाला टेकला आहे. त्यात भरीस भर म्हणजे 15-30 या वयोगटातील वाढते क्षयरोग रुग्ण. क्षयरोगसंबंधी अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, वय वर्ष 15 ते 30 या वयोगटातील वर्गात क्षयरोग रुग्णांची संख्या तुलनात्मक दृष्ट्या जास्त आढळली. मागील वर्षाचा अभ्यास करता जवळपास एकूण रुग्ण संख्येच्या 40% रुग्ण हे 15 ते 30 या वयोगटातील आढळली. त्याच खालोखाल वय वर्ष 30 ते 44 आणि 45 ते 59 या दोन्ही वयोगटाचा एकत्रित रित्या विचार केल्यास एकूण 30.3% लोक या वयोगटातील सापडतात आणि याच वयोगटात म्हणजे 31-45 व 46-60 सरासरी एकूण रुग्णासंखेच्या 42% रुग्ण या वयोगटातील आढळतात.
साधारणतः वरील लोकसंख्या आणि क्षयरोग रुग्णसंख्येचा विचार करता, नेमकं ज्यांच्या भरवशावर पुढच्या पिढीचे भवितव्य अवलंबून आहे असे लोकच या क्षयरोगच्या विळख्यात अडकत असतील तर एकूणच गरीबीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच तरुण वर्ग या चक्रात अडकत असल्याने ते शालेय जीवनात मागे राहून पर्यायाने बहुआयामी गरीबी (Multidimensional Poverty) वाढण्यास कारणीभूत ठरण्याची दाट शक्यता जाणवते. बहुक्षेत्रीय आणि समुदायाद्वारे चालणाऱ्या दृष्टिकोनाचा उपयोग करून 2025 पर्यंत टीबीचे उच्चाटन करण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी देशातील युवा आणि अशा युवांची शक्ती विधायक कारणांसाठी वापरण्याची क्षमता असणाऱ्या एनजीओ यात महत्वाचं योगदान देऊ शकतात.
-पुजा नायक
(Survivors Against TB Organization)
लेखिका या संस्थेद्वारे क्षयरोगावर संशोधन व माहिती संकलन करत आहे
लेखिकेचा संपर्क-+919960129947